आर्ष काळाच्या शेवटी साधारण इ.स.पू. ६५० ते ५७० या काळात दक्षिण व पूर्व आयोनियन बेटांवरील कलाकारांनी मृत्पात्रांवर केलेल्या चित्रणाची शैली. भूमध्यसागराच्या अतिपूर्वेकडील आधुनिक तुर्कस्तानातील प्राचीन ग्रीक नगरी मायलीटस (Miletus), कीऑस (Chios) व इतर इजीअन भूबेटांवर साधारण इ.स. पू. ६५० ते ५७० या काळात ग्रीक ‘वन्य बकरी शैली’ ही मृत्पात्रांवरील चित्रण कला भरभराटीस आली. ह्या शैलीतील मृत्पात्री इतर ठिकाणी निर्यात केली जात होती, हे अनेक ठिकाणी मिळालेल्या उत्खननातून निदर्शनास आले. उदा., तुर्कस्तानातील प्राचीन शहर तार्सुस (Tarsus), लेवांत; बल्गेरिया; सिरियामधील अल्-मीना; इजिप्तमधील नाईल नदीच्या त्रिभूज प्रदेशात वसलेले ग्रीक शहर नौक्रातीस (Naukratis), रोड्झ ह्या भूबेटावरील थडग्यांमधून वन्य बकरी शैलीतील मृत्पात्रे व अवशेष प्राप्त झाले आहेत. आकृतीचे डोके बाह्यरेषेत दाखवून ते संपूर्ण आकृतीला जोडलेले दर्शविण्याच्या शैलीचे तंत्र पौर्वात्यीकरण काळात (Orientalizing Period) विकसित झाले. यापूर्वी जिथे आकृतीची छटा दाखविली गेली होती. तिथे ह्या वन्य बकरी शैलीने चित्रकारांना अधिक तपशील असलेली आकृती दाखविण्याचे तंत्र आत्मसात करून निसर्गावादाच्या प्रगतीमध्ये भर टाकण्यास मदत केली.

ओइनोकोइ, कारिया.

वन्य बकरी शैलीतील मृत्पात्रांच्या प्रमुख आकारांमध्ये ओइनोकोइ हे वाईन ठेवण्यासाठी वा ओतण्यासाठी वापरले जाणारे मृत्पात्र व वाडग्याचा समावेश होतो. सामान्यत: ह्या शैलीतील मृत्पात्रांसाठी वापरण्यात आलेली मृदा भाजल्यानंतर फिकट तपकिरी रंगाची होत असून त्यावर मलईसारख्या रंगाच्या राळेचा थर दिलेला दिसतो. मृत्पात्रांवर सर्वत्र प्राण्यांची चित्रे असणाऱ्या ह्या शैलीमध्ये प्रामुख्याने बकरीचे चित्रण केलेले दिसते. यावरूनच या चित्रण शैलीला ‘वन्य बकरी शैली’ असे संबोधले जाते. बकरीचे डोके चरण्यासाठी खाली वाकलेले असून तिची वेटोळे असलेली लांब शिंगे खांद्यावरती फिरत आहेत. प्रामुख्याने अशा अविर्भावातील बकरीचे चित्रण मृत्पात्रांवर केलेले आढळते. बकरीशिवाय चित्रांत चितळ, ससा, कुत्री, हंस व स्फिंक्स या प्राण्यांचाही समावेश दिसतो. मृत्पात्रांवरील सजावटीत प्रामुख्याने बाह्यरेखा बहुरंगात केलेली असून रिकाम्या जागा भरण्यासाठी साधारणतः त्रिकोण, तीव्र वक्र असलेले स्वस्तिक, अर्धगोल अशा आकारांचा वापर केलेला दिसतो. मृत्पात्राच्या पायाकडील भागावर आलटून पालटून दाखवलेल्या कमळाच्या पाकळ्या आणि कळ्या यांची साखळीने सजावट केलेली दिसते. तर काही ठिकाणी निर्देशित किरणांची श्रृंखला चित्रित केलेली आढळते. ह्या शैलीतील मृत्पात्रांवर दिसणारे नागमोडी वळणाचे चित्रांकन सातव्या शतकातील इतर शैलींतील मृत्पात्रांवर सहसा आढळत नाही.

नौक्रातीस येथील ॲफ्रोडाइटी या ग्रीक देवतेच्या देवालयातून मिळालेल्या मृत्पात्रांमध्ये विशिष्ट मुठ असलेले वाडगे उपलब्ध झाले. ज्याची निर्मिती ह्या देवालयासाठी निर्यात करण्याकरिताच केलेली होती. हे विशिष्ट वाडगे सोस्त्राटोस नावाच्या ग्रीक व्यक्तीने ॲफ्रोडाइटीला समर्पित केलेले होते. त्याने वाडग्यांच्या आतील बाजूस आपले समर्पण लिहून ठेवलेले दिसून आले.

नौक्रातीस येथील ॲफ्रोडाइटी वाडगे

तुर्कस्थानातील कारिया (Caria) येथून मिळालेल्या २८ सें.मी.च्या ओइनोकोइ मृत्पात्रावर मलईसारख्या राळेचा थर दिलेला असून त्यावर काळ्या झिलईने सजावट केलेली दिसते. पात्राच्या खांद्यावर मुठीच्या बाजूला ताडाच्या पानांच्या आकाराचे अलंकरण केलेले असून त्याच्यापुढे नागमोडी व सरळ रेषा, भरलेल्या चौकटी तसेच त्रिकोण या आकारांचे नक्षीकाम केलेले आढळते. खांद्यावर दोन्ही बाजूंना शेपटीमध्ये डोके खुपसलेला लांब मानेचा पक्षी, हंस दाखवलेला आहे. रॉबर्ट कूक या प्राचीन ग्रीक मृत्पात्री तज्ञाच्या मते, हे पात्र साधारण इ.स.पू. ५७५ ते ५५० या काळातील असून कारिया येथेच बनविण्यात आले असावे. त्याने हा निष्कर्ष पात्राची बोशुम (bochum) येथील चित्रकारांच्या शैलीबरोबर तुलना करून काढला. ह्या मृत्पात्रावरून हे लक्षात येते की, पूर्व भूमध्य सागराच्या किनारपट्टीवरील लोकांनी ह्या अत्यंत परिष्कृत अशा विशिष्ट शैलीचे अलंकरण तसेच भाजण्याच्या कलेत प्राविण्य मिळविले होते.

रोड्झ येथून सापडलेले कॅमिरूस (Camirus) या नावाने ओळखले जाणारे ओइनोकोइ मृत्पात्र इ.स.पू. साधारण ६२५ ते ६०० या काळातील आहे. ३४.४ सें.मी. उंचीचे हे मृत्पात्र रोड्झ येथे मिळाले असले, तरी प्रत्यक्षात दक्षिण आशिया मायनरच्या ग्रीक शहरातून बनविलेले होते. पात्राच्या पोटावरील आडव्या पट्टीमध्ये चरणाऱ्या वन्य बकरींचे व त्यामध्ये फुलांच्या रूपचिन्हांचे चित्रण केलेले असून त्यावरील प्राचीन पूर्वेकडील संस्कृतींचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. चित्रांतील वक्र रेषांचे आकृतिबंध, बाह्यरेखा आकार व दाट काळे आकार या शैलीचे वैशिष्ट्य दर्शवितात.

संदर्भ :

  • Cook, M. Robert, Greek Painted Pottery (Handbooks of archaeology) Methuen, 1960.
  • Stansbury-O’donnell, Mark,  A History of Greek Art, Wiley Blackwell, 2015.