ग्रीक कलेच्या आर्ष काळातील प्रगती व विस्ताराचा गोंधळ इ.स.पू. ४८० ते इ.स.पू. ३२३ या काळात कमी होऊन त्याची जागा परिपक्वतेने घेतली. या काळाला ‘अभिजात ग्रीस’ या नावाने ओळखतात. इ.स.पू. ४७९ मध्ये इराणी सम्राटाच्या पराभवानंतर ग्रीसमध्ये अथेन्सने राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या आपले वर्चस्व राखले. इतर संस्कृतींबरोबर झालेल्या युद्धानंतर प्रथम अथेन्स नंतर स्पार्टा आणि मेसोडोनियाचा ग्रीसमधील प्रबळ सत्ताकेंद्र म्हणून उदय झाला. बरोबरच इतर नगरराज्यांपैकी मायलीटस (Miletus), थीब्झ (Thebes), कॉरिंथ आणि सिरॅक्यूझ (Syracuse) सारख्या नगरराज्यांनी अभिजात ग्रीसच्या सांस्कृतिक कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली. अभिजात काळात ग्रीकांनी सांस्कृतिक आणि शास्त्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दिसते. ह्या काळातील विचारवंतांच्या विचारांनी हजारो वर्षे, अगदी वर्तमानापर्यंत वर्चस्व राखल्याचे दिसते; ग्रीक विचारवंतांपैकी सॉक्रेटीस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांची शिकवण पाश्चिमात्त्य विचारवंतांनी गेली दोन हजार वर्षे प्रत्यक्षपणे, विरोधात अथवा उत्परिवर्तन अशा स्वरूपात संदर्भ म्हणून वापरलेली दिसते.

अभिजात काळातील कलेची सुरुवात अधिकच नैसर्गिक व वास्तववादी चित्रणपद्धतीने सुरू झाल्याचे दिसते. ज्यात तत्त्वज्ञानातील बदल दाखवणारे, अमूर्त ते अतींद्रिय ते आसन्न ऐहिक पर्व व्यक्त करणारे असे जगाचे चित्रण अधिक आदर्शवादी स्वरूपात केलेले आढळते. या काळात प्रथमच कलाशाळा प्रस्थापित केल्या गेल्या. पेलोपनीससमधील सिक्योन यांसारख्या कलाशाळेत कलेचे संकलित ज्ञान, कलेतिहासाचा पाया यांवर अधिक भर दिला गेला.

कलाकारांनी मानवाकृती केवळ ‘सूचित करणारी’ दाखवणे बंद करून अचूकतेने ‘वर्णन करणारी’ दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसते. या काळात विशेषत: ‘पुरुष’ आकृतींवर लक्ष केंद्रीत केले गेले. लोकशाही राजकारण आणि सांस्कृतिक जीवनातील ‘सर्व गोष्टींची मोजमापे’ दैनंदिन स्वरूपात दर्शविली गेली. भावनांचा पसारा आणि आवेग असलेल्या या सांस्कृतिक क्रांतीमागे बुद्धिनिष्ठ विचार आणि संयुक्तिकपणा अशा प्रेरक शक्ती होत्या. याच काळात शिल्प प्रतिमांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याचे दिसते. ह्या काळातील सर्वोत्तम मंदिरांमध्ये अथेन्सचे पार्थनॉन आणि ऑलिंपिया येथील झ्यूसच्या मंदिरांचा समावेश होतो.

ऑलिंपिया येथील शिल्पाकृतींमध्ये फिडीयस या शिल्पकाराने दाखविलेले झ्यूस देवाच्या मंदिरातील शिल्पांच्या चेहऱ्यांवरील स्तब्ध भाव म्हणजे भावनात्मक तर्कबुद्धीचे उत्तम उदाहरण मानले जाते. पाचव्या शतकातील सृजनशील आणि राजनीतिकुशल पेरिक्लिझने (Perikles) नव्याने स्थापलेल्या राजकीय व आर्थिक सामर्थ्य असलेल्या अथेन्सच्या अक्रॉपलिसचे रूपांतर एका चिरस्थायी स्मारकात केले. पेरिक्लिझच्या वास्तूंच्या प्रयोजनांचे माहात्म्य नगराची आश्रयदाता असलेली देवी अथीनाला समर्पित असलेल्या संगमरवरातील पार्थनॉन (Parthenon) मंदिराच्या वास्तुशास्त्रीय व शिल्पांवरून समजून येते.

टेट्राड्रॅकम (चांदीचे नाणे), डावीकडे शिरस्त्राणधारी अथेना व उजवीकडे घुबड.

टेट्राड्रॅकम (Tetradrachm) सारख्या चांदीतील नाण्यांवरील बारकावे असो अथवा मोठ्या आकारातील शिल्पे असोत. मानवाकृती दाखवताना वस्त्रांसहीत वा नग्न, आरामदायी अवस्थेत वा गतिमान हालचाल करताना अशा विविधप्रकारे मानवाकृतींचे रेखाटन हे अभिजात काळाचे वैशिष्ट्य मानले जाते. म्हणूनच इ.स.पू. पाचव्या शतकाला तज्ज्ञांनी ग्रीसचा ‘सुवर्ण काळ’ असे संबोधिलेले दिसते. संगमरवर व कांस्य याव्यतिरिक्त अभिजात काळातील शिल्पकारांनी उच्च प्रतीचा चुनखडक, लाकूड, हाडे आणि हस्तिदंतावरही शिल्पकाम केल्याचे आढळते. ह्या काळातील लॉस्ट वॅक्स तंत्रात केलेली कांस्य शिल्पे ही सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली जातात. मिरोन (इ.स.पू. ४८०–४४४), पॉलिक्लीटस (इ.स.पू. ४५०–४३०), कालीमॅकस ((इ.स.पू. ४३२–४०८), स्कोपस ((इ.स.पू. ३९५–३५०), लायसिपस (इ.स.पू. ३९५–३०५), प्रॅक्सीटेलीझ (इ.स.पू. ३७५–३३५) या कलाकारांचा अभिजात काळातील महत्त्वाच्या शिल्पकारांमध्ये समावेश होतो.

पॉलिक्लीटस हा या काळातील ख्यातनाम शिल्पकार. त्याने क्रीडापटू व वीरपुरुष यांच्या अभिजात प्रतिमा निर्माण करून पुरुषमूर्तीची आदर्श प्रमाणे आणि नियम सिद्ध केले. त्याची शिल्पनिर्मिती कांस्यामध्ये असून द स्पिअर बेअरर, द फिलेटबाइंडर आणि ॲमेझॉन  (इ.स.पू. ४५o–४४o) या शिल्पांच्या रोमन प्रतिकृतींवरून त्याच्या शैलीचे वेगळेपण प्रत्ययास येते. स्कोपसच्या शिल्पनिर्मितीचे अवशेष टीजीयामधील अथीना एलियाच्या मंदिराच्या उत्खननात मिळाले. त्याच्या शिल्पांमध्ये फिडीयसच्या निर्मितीमधील शांत, सौम्य भावांपेक्षा वेगळेच दुःखमय व रौद्र भाव प्रकटले आहेत. पूर्ण उत्तर अभिजात काळात (इ. स. पू. ४०० – ३२३) लष्करी घडामोडी चालू असतानाही कलात्मक उत्पादन आणि विकास चालूच राहिल्याचे आढळते,  मुक्त-स्थायी शिल्पे आणि थडग्यांच्या स्मारकांवरून या काळातील कलानिर्मितीतील विचारांची भव्यता लक्षात येते. चौथ्या शतकात छोटे शीर, लांबट हात, पाय आणि धड असलेल्या नवीनच काल्पनिक पण सुंदर आणि सामान्य जीवनमानापेक्षा मोठ्या आकारातील ॲपॉक्सिओमिनॉस (Apoxyomenos) या आकृतींची निर्मिती करण्यात आली. कांस्यामध्ये निर्मिती करणारा लायसिपस हा त्याच्या शिल्पाकृतींना त्याने दिलेल्या कोमलपणामुळे अधिक परिचित आहे. त्याच्या द स्क्रेपर (the Scraper, इ.स.पू.सु. ३२o) ह्या क्रीडापटूच्या कांस्य पुतळ्याची एक संगमरवरी प्रतिकृती उपलब्ध आहे. तीमध्ये त्याच्या शैलीची निदर्शक अशी शरीराची सडपातळ प्रमाणबद्धता व केशरचनेचे सूक्ष्म तपशीलवार चित्रण दिसून येते. त्याने घडविलेल्या हेड ऑफ सॉक्रेटीसच्या (इ.स.पू.सु. ३५o) रोमन प्रतिकृतीवरूनही त्या कालखंडात ग्रीक कलेमध्ये व्यक्तिविशिष्ट घटकांच्या चित्रणावर जो भर दिला जात असे, त्याचा प्रत्यय येतो. या नामवंत शिल्पकाराला अलेक्झांडरच्या अनेक शिल्पप्रतिमा घडविण्याचे काम दिले होते. प्रॅक्सीटेलीझ हा नग्न स्त्रीमूर्ती शिल्पित करणारा पहिलाच अथेनियन शिल्पकार (द ॲफ्रोडाइटी ऑफ नाइडस इ.स.पू.सु. ३५o–३३o). त्याची हर्मीझ विथ द इन्फंट डायोनायसस (इ.स.पू.सु. ३५o–३३o) ही संगमरवरी मूर्ती तिच्या भावपूर्ण सौम्यतेमुळे तसेच तीत शिल्पप्रतिमानापेक्षा चित्रसंकल्पनेस प्राप्त झालेल्या प्राधान्यामुळे उठावदार दिसते.

स्क्रेपर, रोमन संगमरवरातील प्रतिकृती – इ.स. पहिले शतक, उंची ६ फूट ९ इंच, पायो-क्लेमेंटिनो संग्रहालय व्हेटिकन.
स्टॅमनोस – झाकण व मुठी असलेली द्रवपदार्थ ठेवायची बरणी, लाल आकृत्यांची शैली -टेराकोटा, इ.स.पू. ४५०.

इ.स.पू. पाचव्या शतकातील उल्लेखनीय प्रगती म्हणजे ॲटीक शैलीतील मृत्पात्रांवरील काळ्या आकृत्यांची जागा लाल आकृत्यांच्या तंत्राने घेतली. या तंत्रामुळे मानवी शरीर अजून उत्तम पद्धतीने म्हणजे विश्रांती घेताना वा एखादी हालचाल करताना, कपडे घातलेले वा नग्न स्थितीत अशा विविध प्रकारे चित्रित करण्यात येऊ लागले. स्थानिक पातळीवर मृत्पात्रांवरील चित्रणासाठी ‘अथेन्सची नाट्य-दृश्ये’ विशेष प्रचलित होती. लाल आकृत्यांच्या तंत्राबरोबर सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झालेल्या पांढऱ्या पृष्ठावरील तंत्राला ५ व्या ते ४ थ्या शतकात अधिक महत्त्व मिळाले.

ग्रीक लेखक पॉसेनिअसच्या (इ.स.पू. १४३-१७६) लिखाणात कितीतरी भित्तिचित्रांचे वर्णन आढळते. सगळीच काळाच्या ओघात टिकाव धरू शकलेली नसली, तरीही अभिजात काळातील काही महत्त्वाच्या भित्तिचित्र रचनांमध्ये पेस्तुम येथील साधारण इ.स.पू. ४८० ते ४७० मधील ‘पाण्यात उडी मारणारा’ या थडग्यातील (Tomb of diver from Paestum) फिलॉक्सिनोस (Philoxenos) याने काढलेली चित्रे तसेच वेरजीना येथील शाही थडग्यांमधील (Royal tombs of Vergina) साधारण इ.स.पू. ३६६ ते ३४० मध्ये चित्रकार निकोमॅकोस (Nikomachos) याने काढलेल्या ‘हेडीस पर्सेफनचे अपहरण करताना’ या भित्तिलेपचित्रांचा समावेश होतो.

मृत्पात्री, भित्तिचित्र आणि फलक चित्रांशिवाय दगड, पक्वमृदा आणि लाकडाच्या शिल्पांवरील चित्रणात अभिजात ग्रीक चित्रकारांनी प्राविण्य मिळविलेले होते. ह्या काळात शिल्पांवरील चित्रण ही एक वैशिष्ट्यपूर्ण कला म्हणूनच पाहिली गेली. जरी शिल्पावर वस्त्र दाखविलेली असतील तरी सामान्यतः दगडांतील पूर्ण शिल्प त्वचा सोडून ठळक रंगात रंगविण्यात येत असे. शिल्पांकृतींची त्वचा नैसर्गिक दगडाच्या रंगातच ठेवली तरी प्रतिमांचे केस रंगविण्यात आलेले दिसतात.

पाचव्या शतकातील अभिजात उल्लेखनीय चित्रकारांमध्ये अपोलोडोरस (Apollodorus), हेराक्लीचा झ्यूक्‌सीस (Zeuxis of Heraclea), अगाथार्कस (Agatharchos), पाऱ्हासिस (Parrhasius) आणि स्त्री-चित्रकार तिमरेत (Timarete) यांचा समावेश होतो. चौथ्या शतकात मेसोडोनियाचा फिलिप दुसरा तसेच अलेक्झांडर द ग्रेट सारख्या राजांच्या कारकीर्दीत त्यांच्या आधी कोणीही जोपासली नसेल अशा प्रमाणात कला जोपासली गेली. त्याच्या कलाकारांच्या ताफ्यामध्ये निर्विवादपणे ह्या शतकातील महान कलाकार, चित्रकार किऑसचा पेलीझ (Apelles of Kos), लायसिपस, प्रोटॉजेनीझ (Protogenes), अँड्रोकाईड्स (Androkydes) सारखे अनेक कलाकार होते.

संदर्भ :

  • Neer, Richard T., Greek Art and Archaeology : A New History, c. 2500-c. 150 B.C.E. Thames and Hudson, 2011.
  • Norris Michael, Greek Art from prehistoric to classical a resource for educators, The Metropolitan Museum of Art, New York, 2000.
  • Osborne, Robin, Archaic and Classical Greek Art, 1988.
  • Pedley, John G., Greek Art and Archaeology, Pearson, 2011.
  • Pollitt, J.J., Art and Experience in Classical Greece, 1988.
  • Spivey, Nigel J., Greek Art, 1997.
  • Stewart, Andrew, Art, Desire, and the Body in Ancient Greece, 1997.
  • Whitley, James, The Archeology of Ancient Greece, United Kingdom, 2001.