विविध यांत्रिक साधनांचा उपयोग करून वेगवेगळ्या विषयांचे स्वयंअध्ययन अथवा अध्यापन करणे म्हणजे ई-शिक्षण होय. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शैक्षणिक तंत्रविज्ञानात मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे घडून आली. माणूस हा सर्वांत बुद्धीमान प्राणी असल्याने त्याने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर माहितीचा साठा करणारी, प्रसार करणारी उपयुक्त साधने शोधून काढली. त्यामुळे यंत्रपूर्व साधने, मुद्रणकलेचा शोध, छायाचित्रण, चित्रपट, ध्वनीमुद्रण इत्यादींबरोबरच शिक्षणात संगणक, भ्रमणध्वनी, विविध शैक्षणिक उपयोजक (ॲप), टॅब्लेट, आंतरजाल (इंटरनेट) इत्यादी यांत्रिक साधनांचा वापर ई-शिक्षणात होत आहे. हा शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या विकासाचा चौथा मानला जातो.
व्याख्या :
- ई-शिक्षणाच्या व्याख्या अनेक तज्ज्ञांनी केल्या आहेत. इलियट मॅसे यांच्या मते, ‘ई-शिक्षण म्हणजे, माहिती तंत्रज्ञानाचे असे जाळे आहे की, ज्यावर अध्ययनासाठी लागणारी माहिती भरणे, माहितीची रचना करणे, माहिती पाठविणे, माहिती शोधणे, माहिती मिळविणे व प्रदान करणे या बाबी साध्य होतात’.
- मानवसंसाधन विकास मंत्रालयाच्या मते, ‘अध्ययन-अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या माहिती तंत्रज्ञान साधनांचा समावेश ई-शिक्षणामध्ये होतो’.
शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या विकासाला १९६० नंतर सुरुवात झाली. १९५० पासून ते १९६७ पर्यंत शैक्षणिक तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर हा दृकश्राव्य माध्यमांच्या वापरापुरताच मर्यादित होता; मात्र त्यानंतर १९७० मध्ये ई-शिक्षणाची खरी सुरुवात ब्रिटनमध्ये महाजालीय (नेटवर्क) शिक्षणाच्या माध्यमातून झाली. विद्यार्थी संगणकाद्वारे शिकू लागले. १९६७ ते १९७५ या कालखंडात अध्यापन पद्धती, तंत्रे, साधने, सूत्रे यांचाही समावेश त्यात होऊ लागला. १९७५ नंतर शैक्षणिक तंत्रज्ञानाची वाटचाल पद्धती, तंत्रे यांकडून अध्यापनाची विशेष तंत्रे व पद्धती यांकडे झाली. २००० नंतर जग माहिती युगात प्रवेश केला. माहिती प्राप्त करणे, ती पुन्हा पुन्हा मिळविणे, माहितीचे जतन करणे, माहितीची योग्य मांडणी करणे, माहितीचे सादरीकरण करणे इत्यादींसाठी संगणकाचा वापर सुरू झाला. माहिती तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे जग एक छोटे खेडेगांव बनले आहे. शिक्षण प्रक्रियेत संगणकाबरोबरच व्हिडिओ कॅमेरा, स्कॅनर, छपाई यंत्र, झेरॉक्स, टेपरेकॉर्डर इत्यादींबरोबरच नवनवीन संगणकीय प्रणालींचा वापर होत आहे. संगणकाची उपयुक्तता, कार्यक्षमता, कामाचा वेग, माहिती साठविण्याची प्रचंड क्षमता यांमुळे संगणक आज सर्वमान्य झाला असून संगणकाच्या अनेक पिढ्या जन्माला आल्या आहेत. संगणाच्या साह्याने अध्ययनार्थी अध्यापकाविना आपले शिक्षण पूर्ण करीत आहे. वर्गात, प्रयोगशाळेत सर्वत्र संगणकीय प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. संगणक, भ्रमणध्वनी खेड्यापाड्यांत पोहोचले आहे. खडूफळा ते पांढराफळा, अंकीय (डिजीटल) वर्ग, स्मार्ट फलक, अंकीय शाळा, स्मार्ट शिक्षक यांसाठी शासन व एन. जी. ओ. यांमार्फत अनेक प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मिळणाऱ्या सेवा सुविधा, अंकीय वर्गखोल्या, ई-शिक्षण प्रणाली यांची उपयुक्तता व महत्त्व काळानुसार समाजाला पटत असल्यामुळे पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओघ मोठ्या महानगरातील आंतराष्ट्रीय शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
ई-शिक्षणामध्ये अध्ययन-अध्यापनाबरोबरच शैक्षणिक प्रशासन, व्यवस्थापन व मूल्यमापन यांचाही समावेश होतो. आंतरजालावरील विविध साईट्स आणि रेडीओ प्रसारण या माध्यमांद्वारे देशी व विदेशी शिक्षण घरबसल्या घेणे आता सहज शक्य झाले आहे. आभासी वर्गखोल्या, आभासी विद्यापीठ, अंकीय विद्यापीठ यांच्या माध्यमातून अनेक मॅसीव्ह मुक्त आंतरजालीय अभ्यासक्रमे आपल्या सोईनुसार घरबसल्या करता येतात. ई-शिक्षणाच्या माध्यमांमुळे आंतरजालावर परीक्षा देणे, शिकविण्या घेणे, निकाल पाहणे, गुणपत्रिका मिळविणे, शिक्षकांशी संवाद साधणे, विद्यार्थ्यांशी संवाद करणे, शिक्षण-प्रशिक्षण घेणे, परिसंवाद करणे इत्यादी शिक्षण प्रक्रिया आधिक सोपी व सोईस्कर झाली असून यामुळे वेळेची, पैशाची व श्रमाची बचत होते.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अनेक मानसशास्त्रीय संप्रदाय उदयास आले. वर्तनवाद, रचनावाद, मनोविश्लेषणवाद, समष्टीवाद, ज्ञानसंरचनावाद या संप्रदायांचा प्रभाव अभ्यासक्रम निर्मितीबरोबरच अध्ययन व अध्यापनावर झालेला दिसून येतो. अध्ययन-अध्यापनाची परिणामकारकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झाले. अलीकडे शिक्षणतज्ज्ञ, संशोधक व मानसशास्त्रज्ञ यांनी लावलेल्या शोधांच्या अभ्यासातून वेगवेगळ्या अध्ययन उत्पत्ती उदयास आल्या. शिक्षणक्षेत्रात मेंदूआधारित शिक्षण, सामाजिक अध्ययन, समूह अध्ययन, सहकार्यत्मक अध्ययन, सहयोगी अध्ययन, ज्ञानसंरचनावाद, ब्लेंडेड शिक्षण इत्यादींचा अलिकडे प्रसार आणि प्रचार सगळीकडे झाला आहे.
ई-शिक्षण कार्यपद्धती : ई-शिक्षण ही एक आधुनिक शिक्षण प्रणाली आहे. यूरोप, अमेरिका, भारत, चीन, जपान यांबरोबरच जगातील सर्वच देशांत ई-शिक्षण रुढ होताना दिसत आहे. या प्रणालीची उपयुक्तता पटल्यामुळे तिचा प्रचार व प्रसार जगात सर्वत्र होत आहे. आंतरजालाच्या मदतीने एखादा अभ्यासक्रम एकाच वेळी जगातील अनेक देशांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता येतो. ई-शिक्षणचा अभ्यासक्रम अनेक स्वयंघटक (मॉड्युल्स) व पाठांमध्ये विभागलेला असतो. त्यामुळे दररोज अर्धा-एक तास संगणकासमोर बसून अभ्यास करणे सोपे जाते. कोणत्याही विषयाचा कोणताही पाठ्यक्रम ई-शिक्षण पाठामध्ये रूपांतरित करता येतो. यामध्ये विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता, वय, क्षमता उत्सुकता, कौशल्य, पूर्वज्ञान व अभिरुची यांचा विचार करून आशयाची मांडणी केली जाते. आशयावर भाषा, संगीत इत्यादींचे संस्कार केले जातात. अशा प्रकारे तयार केलेला अभ्यासक्रम सेवा देणारी संस्था व यंत्रणा यांद्वारे आंतरजालावर प्रसारित केला जातो. ई-शिक्षण साहित्य संस्कारित झाल्यानंतर अभ्यासक्रम पुस्तकांप्रमाणे स्वाध्याय, गृहकार्य, चाचणीसह प्रसारित करता येतात. ज्ञान घेणारा व देणारा यांच्यामध्ये सहज संवाद शक्य होतो. विद्यार्थ्यांचा त्यांच्या सहकारी मित्र व शिक्षक यांच्याशी परस्पर संपर्क एकाच वेळी शक्य होतो. रोजच्या रोज आपल्या सोईने पाठ वाचणे, त्यावरील स्वाध्याय प्रश्न सोडविणे सोपे जाते. आपल्या चुका पडताळून योग्य उत्तरासाठी प्रत्याभरण घेता येते. विशिष्ट कालावधीनंतर विद्यार्थ्यांना आंतरजालावर परीक्षा देता येते. पेपर संगणाकाद्वारे तपासले जाऊन निकालही आंतरजालावरच मिळतो. ई-शिक्षणाचे पाठ्यक्रम सी. डी., पेनडाईव्ह, विविध शैक्षणिक उपयोजक (ॲप), संगणक, टॅब्लेट इत्यादी तंत्रसाधनांच्या माध्यमातून प्रत्यक्षात देता येते. भारतातील अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम दिला जात आहे.
ई-शिक्षणाची वैशिष्ट्ये :
- एकापेक्षा जास्त स्रोतांच्या वापरामुळे अध्ययन व अध्यापन प्रभावी होते.
- व्यक्तीमध्ये उच्चविचार प्रक्रियेचा विकास होतो.
- कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अध्ययन करता येते.
- स्वगतीने शिक्षण घेण्याची सोय असते.
- पाठ्यघटकांचा पुन्हा पुन्हा सराव करण्याची संधी असते.
- विद्यार्थी अभिरुचीचा वापर करत असतो.
- विषय व आशय शोधणे व निवडण्याचे स्वातंत्र्य असते.
- विद्यार्थी व शिक्षक समूह आंतरक्रियेद्वारे सहकार्यात्मक अध्ययन घडते.
- गोलिक मर्यादा, वेळ, पैसा, श्रम इत्यादींची बचत होते.
- जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते.
- अध्ययनात किंवा अध्यापनात येणाऱ्या अडचणींचे ई-शिक्षणामुळे तात्काळ निरसन केले जाते.
- स्वयंमूल्यमापन व प्रत्याभरणाची सोय असते.
- विविध पद्धती व तंत्राचे एकात्मिकरण असते.
- अर्थपूर्ण आंतरक्रियेस चालना मिळते.
- प्रश्नोत्तर, गटचर्चा व सादरीकरणाद्वारे धारणा चांगली होते.
- क्षमता व कौशल्ये विकसनातून जागतिक संधी उपलब्ध होतात.
- अध्ययन व अध्यापन सरावांना चालना मिळते.
- तणावरहित अध्ययन घडते.
- ई-शिक्षण कोणीही घेऊ शकतो, तसेच ते कोठेही आणि केव्हाही उपलब्ध होते.
- स्मरण शक्ती, संप्रेषण क्षमता, साठवण क्षमता, गतीमानता यांच्यात जास्त वाढ होते इत्यादी.
ई-शिक्षणाचे प्रकार : पारंपरिक अध्ययन, अध्यापनातील त्रुटी कमी करण्याच्या हेतूने शिक्षणक्षेत्रात संगणक केवळ शिक्षकालाच मदत करून थांबत नाही, तर तो शिक्षकाचे कामही स्वतः करतो. त्याच बरोबर अध्ययनकर्तात्यालाही अध्ययन करण्यासाठी मदत करतो. संगणक सहायीत किंवा संगणक आधारित अध्ययन हे स्वयंअध्ययनच आहे. ई-शिक्षणाचे अनेक प्रकार उदयास आले आहेत.
- संमिश्र शिक्षण : संमिश्र शिक्षणामध्ये पारंपारिक अध्ययन, वर्गातील प्रत्यक्ष अध्ययन, आभासी आध्ययन-अध्यापन इत्यादी प्रकारांच्या एकत्रित शिक्षणाचा वापर केला जातो. यामध्ये शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (लर्निंग मॅनजमेंट सिस्टीम – एल.एम.एस.), भ्रमणध्वनीद्वारे शिक्षण इत्यादी प्रकारच्या तांत्रिक व प्रसारमाध्यमांचा वापर केला जातो.
- सहकार्यात्मक अध्ययन : ई-शिक्षणामुळे विद्यार्थी एकमेकांशी संवाद साधत एकत्रितपणे सहकार्यातून शिक्षण घेतात. इतरांबरोबर अध्ययन घडत असल्याने नेतृत्वगुण वाढीस लागतात. स्वत:मधील व इतरांमधील बलस्थाने व त्रुटी समजतात. विद्यार्थी गटाचे उत्तरदायित्व स्विकारून सर्वांचे यश हे आपले यश आहे, याची जाणीव होते. हे समजून घेऊन अध्ययन करतात व यशस्वी होतात. युग्मसहायीता, आंतरजाल, गटचर्चा, संवाद यांआधारे एकमेकांच्या सूचना व मार्गदर्शन घेऊन विविध कौशल्यांचे प्रशिक्षण ई-शिक्षणाद्वारे मिळते.
- अभिरूपता खेळ : ई-शिक्षणामध्ये खेळ व अभिरूपता आधारित तंत्रे वापरून अध्ययन केले जाते. या प्रकारात खेळाद्वारे समस्या निराकरण करणे सोपे जाते आणि विद्यार्थ्यांचे विचार कौशल्य सुधारते. खेळाच्या माध्यमातून शिकल्यामुळे बौद्धिक थकवा न येता अध्ययन ताणरहित होते. खेळाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे अध्ययन घडत असते. या तंत्राचा वापर अनेक कंपन्यांमध्ये कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जात आहे.
- सूक्ष्म शिक्षण : सूक्ष्म शिक्षण ही छोट्या छोट्या टप्प्यांद्वारे मोठमोठ्या घटकांचे अध्ययन करण्याची पद्धती आहे. विद्यार्थ्यांना हव्या असणाऱ्या माहितीचे रूपांतर लहान पाठ्यांशात केले जाते. यामध्ये ई-टपाल, आंतरजालावरील संदेश, ठळक बातम्या, बहुप्रसार माध्यमे, चित्रफित इत्यादी तंत्रसाधनांच्या माध्यमांतून ई-शिक्षणाचा वापर करून नोकरीदर्शक अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. सूक्ष्म शिक्षणाद्वारे आंतरजालावरील प्रशिक्षण घेता येते. उदा., कारमधील हवा शुद्धीकरण यंत्र (एअर फिल्टर) कसा बदलावा यासंदर्भातली चित्रफित पाहून सोप्या पद्धतीने प्रशिक्षण घेता येते.
- चित्रफित शिक्षण : भ्रमणध्वनी, संगणक, आंतरजाल इत्यादी तंत्रसाधनांद्वारे चित्रफित शिक्षण घेता येते. सध्या आंतरजालावर किंवा यूट्युबवर हजारो चित्रफिती उपलब्ध आहेत. ते पाहून आपल्याला हवे असलेले ज्ञान किंवा कौशल्य सहज रीत्या मिळविता येते.
- जलद ई-शिक्षण : उच्च क्षमतेच्या नेट कनेक्टिव्हिटी आधारे आंतरजालावरील अनेक अभ्यासक्रमांचा अभ्यास करता येतो. यामध्ये शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे पावर पॉईंट व चित्रफित यांच्या उपयोगाने मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जातात. पूर्वपुनर्मुद्रित साहित्य ऐकता येते व एकाच वेळी अनेक विद्यार्थी जलद गतीने शिकू शकतात.
- व्यक्तिगत ई-शिक्षण : ई-शिक्षणामध्ये एखाद्या अभ्यासक्रमाचे रूपांतर विद्यार्थीकेंद्री कार्यनितीमध्ये केले जाते. यामध्ये विद्यार्थीकेंद्री कार्यक्षमता, अभिरुची इत्यादींनुसार भिन्न भिन्न प्रणालींचा वापर करून व्यक्तिगत अनुदेशन प्रणाली तयार केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित दृष्टीकोन वापरला जातो. यामध्ये व्यक्तिगत प्रत्याभरण मिळत असल्यामुळे अध्ययनातील अडथळे तात्काळ दूर होऊन प्रभुत्व अध्ययन घडण्यास मदत होते.
- यू-शिक्षण : या प्रकारचे वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाची सर्वव्यापकता हे आहे. यामध्ये तारविरहित दूरसंदेशवहन, मुक्त आंतरजाल, उच्च क्षमतेची बॅटरी व माहितीचा साठा (डेटा स्टोअर) यांचा वापर अध्ययनसाठी केला जातो.
- दूरशिक्षण : या प्रकारात संगणकाधारित प्रशिक्षण आणि आभासी वर्गखोल्यांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विद्यापिठांचे अभ्यासक्रम हे ई-शिक्षणाद्वारे चालतात.
ई-शिक्षणाचे महत्त्व :
- जगातील सर्व देशांमध्ये पारंपरिक शिक्षण शाळा व महाविद्यालयांतून चालूच आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ई-शिक्षण व तंत्रज्ञानाद्वारे बदलणे शक्य नाही; परंतु जे विद्यार्थी नोकरी करतात, ज्यांना बढतीची गरज आहे, जे विद्यार्थी वर्गात उपलब्ध राहू शकत नाहीत, ज्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण-प्रशिक्षण हवे आहे अशा अध्ययनार्थ्यांसाठी ई-शिक्षणाद्वारे शाळा व महाविद्यालयांतील शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होते.
- ई-शिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक सी. डी., चित्रपट, दस्तऐवज, खेळ यांमुळे अध्ययन रुचीपूर्ण होण्यास मदत होते. (३) ई-शिक्षणामुळे भाषिक, तांत्रिक, संगीतविषयक, शारीरिक, अवकाशविषयक, व्यक्ती-आंतरक्रियात्मक, व्यक्ती–व्यक्ती आंतरक्रियात्मक इत्यादी बुद्धीच्या सर्वच घटकांना कार्यान्वित केले जाते.
ई-शिक्षणाचे शैक्षणिक उपयोजन : शैक्षणिक तंत्रविज्ञानातील एडगर डेल यांच्या अनुभव शंकूनुसार ई-शिक्षणाद्वारे कान, डोळे, मन व बुद्धी या चारही इंद्रीयांना कार्यप्रवृत्त करण्यास मदत होते. पारंपरिक अध्यापन पद्धतीतील उणीवा दूर करण्यासाठी तंत्रसांधनांचा ई-शिक्षणासाठी वापर केला, तरी शिक्षणात शतप्रतिशत बदल होईलच असे नाही. शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी, व्यवस्थापक, अभ्यासक्रम तज्ज्ञ, प्रशासन अधिकारी, शिक्षक यांना प्रथम ई-शिक्षणाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानंतर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ई-शिक्षणाचे योग्य धडे मिळतील. जोपर्यंत शिक्षक व विद्यार्थी पूर्णतः प्रशिक्षित होऊन आपल्या भुमिकेत बदल करणार नाही, तोपर्यंत ई-शिक्षणाचा अपेक्षित फायदा होणार नाही. विद्यार्थ्यांने स्वयंप्रेरणेने आणि स्वयंअध्ययनासाठी सदैव तयार असायला हवे. शासन व प्रशासकांनी माहिती तंत्रज्ञान, प्रयोगशाळा, आंतरजाल सुविधा व अन्य उपकरणांबरोबरच प्रशिक्षित तंत्रज्ञ, भौतिक सुविधा यांसाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना सतत स्वयंमूल्यमापन, प्रत्याभरण यांवर भर द्यायला हवा.
ई-शिक्षणाचा वापर :
- ई-शिक्षणाचा स्वयंनिर्देशित अध्ययन साधन म्हणून वापर होतो.
- ज्ञान मिळण्याचा स्रोत म्हणून वापर होतो.
- विद्यार्थी गट व तज्ज्ञ संवादासाठी वापर होतो.
- पारंपरिक शैक्षणिक पद्धतीला साह्य करण्यासाठी वापर केला जातो.
- विद्यार्थ्यांच्या अध्ययन अडचणींचे विमोचन करण्यासाठी वापर केला जातो.
- शिकवणी, उजळणी, सराव, गृहकार्य इत्यादींसाठी वापर होतो.
- चाचणी व परीक्षेसाठी वापर होतो.
- शैक्षणिक मूल्यमापन व मूल्यनिर्धारण यांसाठी वापर होतो.
- शैक्षणिक संशोधनासाठी वापर होतो.
- विद्यार्थी व शिक्षक यांना विषय अभ्यासासाठीही ई-शिक्षणाचा वापर होतो.
भारतातील शिक्षणप्रणालीत दृकश्राव्य साधनांचा वापर पूर्वीपासूनच केला जात आहे. इ. स. १९४५ मध्ये संगणकाचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर मानवी जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रात होऊ लागला. त्यातूनच पुढे जागतिक किंवा देशांतर्गत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी महाजाल व आंतरजाल यांचा उपयोग प्रशासकीय, व्यावसायिक व शिक्षणक्षेत्रात होऊ लागला. भारतामध्ये १९९५ मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड कंपनीद्वारे देशात आंतरजाल सुविधा पुरविण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने ई-शिक्षणाला सुरुवात झाली. त्याआधी सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत इंडो-अमेरिकन प्रकल्पामध्ये टी. व्ही. व उपग्रहांच्या माध्यमांतून १९७५-७६ मध्ये तंत्रज्ञानाचा वापर ई-शिक्षण म्हणून केला गेला. भारतीय आवकाश संशोधन संस्थेद्वारेही (इस्रो) दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून ई-शिक्षण देण्याच्या प्रयत्नास चालना मिळाली. दूरदर्शन, आकाशवाणी, नॅशनल इन्फोमेट्रिक्स सेंटर नेटवर्क, एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क, सॅटेलाईट इन्स्ट्रक्शन व कम्युनिकेशनल नेटवर्क, इंडियन नॅशनल सॅटेलाईट, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट चॅनल या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ई-शिक्षण व प्रशिक्षण देण्यात आले. २००१ मध्ये केंद्र शासनाने स्कूल नेट हा उपक्रम सुरू केला. त्याद्वारे देशातील ६० हजार शाळांना १२८ केबीचे महाजाल कनेक्शन पुरविण्यात आले आणि दुसऱ्या टप्प्यात ४० हजार शाळांना महाजालाद्वारे जोडण्यात आले. १९८५ ते १९९० या काळात काम्प्युटर लिटरसी अँड स्टडिज इन स्कुल क्लास अंतर्गत देशातील नवोदय विद्यालये व शासकीय विद्यानिकेतन यांना संगणक पुरविण्यात येऊन त्याद्वारे ई-शिक्षण दिले जात होते. आज देशातील बऱ्यापैकी शाळा-महाविद्यालयांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट टी. व्ही., टॅब्लेट, भ्रमणध्वनी यांसारख्या तंत्रसांधनांद्वारे ई-शिक्षण दिले जात आहे.
सध्या ज्ञानात्मक अर्थव्यवस्थेला महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक महानगरांमध्ये बी. पी. ओ., के. पी. ओ., कॉल सेंटर्स, मॉल्स यांठिकाणी नोकरीसाठी वेगळी कौशल्ये लागतात. त्यामुळे रिटेलमध्ये ग्राहकसंवादाला किंवा भ्रमणध्वनी संभाषणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ई-शिक्षणाद्वारे असे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये कागद विरहित बनले आहेत. सर्वच क्षेत्रात संगणक व आंतरजालाचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ई-शिक्षणाचा प्रसार गतीने होत आहे. ई-पायाभूत माहिती, ई-संसाधने, ई-प्रिंट, अंकीय शिक्षण इत्यादी शब्द सर्वत्र रूढ झाले आहेत.
कोरोनासारख्या साथीमुळे काही काळ प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन बंद होते. त्या वेळी व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्युब, गुगलमीट, झूम इत्यादींसारख्या माध्यमांतून ई-शिक्षण मोठ्या प्रमाणात घेण्यात आले, देण्यात आले आणि आजही ते घेतले जात आहे. ई-शिक्षण, ई-वाणिज्य, ई-ट्रान्सर्फर, ई-गव्हर्नन्स, ई-प्रकाशन, ई-जर्नलस, ई-मॉनिटरींग इत्यादींद्वारे आपल्या जीवनाचे सर्वच पैलू ई-कारात बदलत आहेत.
संदर्भ :
- ओक, सुमन, शैक्षणिक तंत्रविज्ञान, पुणे, १९८४.
- जगताप, ह. ना., प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती तंत्रविज्ञान, पुणे, २००७.
- पवार, यु. व्ही., अध्ययन अध्यापन व मूल्यमापनात नवोपक्रमांचा वापर इनसाईट, नाशिक, २०११.
- पाटील, बी. एम.; शिखरे, व्ही. पी., शैक्षणिक तंत्रविज्ञान व महिती तंत्रविज्ञान, कोल्हापूर, २०११.
- भोसले, र. अ.; डोणे, उ. म., शिक्षणातील बदलते विचार प्रवाह, कोल्हापूर, २००९.
समीक्षक : अनंत जोशी