सभोवताली असलेल्या विविध आर्थिक घटकांमधील परस्परसंबंध म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास सभोवतालची आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. सर्वसाधारणपणे आर्थिक पर्यावरण ही संकल्पना व्यावसायिक पर्यावरण (बिजनेस इन्विरॉन्मेन्ट) या संकुचित अर्थाने वापरली जाते; मात्र आर्थिक पर्यावरण ही संकल्पना व्यावसायिक पर्यावरण या संकल्पनेपेक्षा व्यापक आहे. ज्याप्रमाणे वाणिज्य हा अर्थशास्त्राचा एक भाग आहे, त्याच प्रमाणे व्यावसायिक पर्यावरण हा आर्थिक पर्यावरणाचा एक भाग आहे. अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहार हे उत्पादन, वितरण आणि उपभोग या बाबींशी संबंधित असतात. या आर्थिक व्यवहारांचे स्वरूप व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अशा दोन  प्रकारचे असते. हे आर्थिक व्यवहार ज्या परिस्थितीत किंवा आर्थिक वातावरणात होतात, त्यास आर्थिक पर्यावरण म्हणतात. आर्थिक व्यवहारात सहभागी होणाऱ्या सर्व घटकांचा परस्परांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबध असतो.

अर्थव्यवस्थेतील कुटुंबांना व त्यांतील सदस्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी विविध वस्तू व सेवांची आवश्यकता असते. अर्थव्यवस्थेतील शेती, उद्योग व सेवाक्षेत्रांत त्यांचे उत्पादन केले जाते. वितरण व्यवस्थेमार्फत वस्तू व सेवा ग्राहकांना पुरविल्या जातात. सर्वसाधारणपणे आर्थिक व्यवहारांशी संबंधित असणाऱ्या उत्पादन, वितरण आणि उपभोग अशा क्षेत्रांपैकी कोणत्या ना कोणत्या क्षेत्राशी देशातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध असतो. या अर्थाने देशातील प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने आर्थिक पर्यावरण महत्त्वाचे आहे.

अर्थशास्त्राचा अभ्यास सूक्ष्म व समग्र अशा दोन दृष्टिकोणातून केला जातो. तसेच आर्थिक पर्यावरणाकडेही सूक्ष्म व समग्र दृष्टिकोणातून पाहता येते. अर्थव्यवस्थेतील कुटुंब, व्यवसायसंस्था अशा सूक्ष्म किंवा वैयक्तिक घटकांच्या बाबतीत उपलब्ध असलेले पर्यावरण म्हणजे सूक्ष्म पर्यावरण होय. सूक्ष्म आर्थिक घटकांच्या आर्थिक व्यवहारावर प्रभाव पाडणाऱ्या सूक्ष्म घटकांनी मिळून सूक्ष्म पर्यावरण निश्चित होते. उदा., व्यवसायसंस्थेच्या दृष्टीने असलेल्या सूक्ष्म पर्यावरणात व्यवसायसंस्थेस उपलब्ध असलेली आदाने, कामगारवर्ग, व्यवस्थापन, उत्पादनाला असलेली मागणी वगैरे घटकांचा समावेश होतो. समग्र किंवा अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील घटकांनी समग्र पर्यावरण निश्चित होते. अर्थव्यवस्थेची स्थिती, विकासाची अवस्था, आर्थिक धोरणे वगैरे घटक समग्र पर्यावरणात महत्त्वाचे असतात.

अर्थव्यवस्थेतील उत्पादन, वितरण आणि उपभोग या आर्थिक व्यवहारात सहभागी झालेल्यांच्या व्यवहारावर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. हे घटक म्हणजे आर्थिक पर्यावरणाचे घटक आहेत. प्रत्येक आर्थिक घटकाच्या दृष्टीने हे सर्वच महत्त्वाचे असतीलच असे नाही; परंतु अर्थव्यवस्थेतील एकूणच आर्थिक वातावरण चांगले असेल, तर आर्थिक घटकांच्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण होते.

आर्थिक पर्यावरणाचे घटक : संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करता आर्थिक पर्यावरणाचे प्रमुख घटक पुढील प्रमाणे आहेत.

  • नैसर्गिक साधन सामग्री : उत्पादनासाठी जमीन, पाणी, खनिजे, कोळसा, नैसर्गिक तेल व वायू इत्यादी नैसर्गिक साधन सामग्रींची गरज असते. त्यांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात असेल, तर शेती, उद्योग व सेवाक्षेत्र यांचा विकास होऊन आर्थिक व्यवहारात वाढ होते.
  • मानवी साधन सामग्री : उत्पादन कार्यासाठी मानवी साधनसामग्रीची आवश्यकता असते. शेती, उद्योग, व्यापार इत्यादी क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध असेल, तर त्यांच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होते.
  • अर्थव्यवस्थेचे स्वरूप : अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावरून आर्थिक घटकांना मिळणारे स्वातंत्र्य निश्चित होते. समाजवादी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भांडवलशाही व मिश्र अर्थव्यवस्थेत खासगी उद्योजक, उपभोक्ते इत्यादींच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असते; कारण ते त्यांच्या दृष्टीने योग्य असे आर्थिक निर्णय घेऊ शकतात.
  • अर्थव्यवस्थेच्या विकासाची स्थिती : अविकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत अल्पविकसित अर्थव्यवस्थेत आणि अल्पविकसित अर्थव्यवस्थेच्या तुलनेत विकसित अर्थव्यवस्थेत आर्थिक वातावरण चांगले असल्याने उपभोक्ते, उद्योजक, व्यापारी यांची आर्थिक स्थिती चांगली असते. त्यांना आपली ध्येये अधिक चांगल्या प्रकारे साध्य करता येतात.
  • आर्थिक धोरणे : अर्थव्यवस्थेतील औद्योगिक, शेतमाल किंमत, कर, आयात-निर्यात, पतपुरवठा  इत्यादी बाबतींतील धोरणांचा आर्थिक व्यवहारावर परिणाम होतो. या बाबतीतील पोषक धोरणे अर्थव्यवहार वाढीस मदत करतात.
  • भांडवलाची उपलब्धता : बँका व विविध वित्तसंस्थांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला असेल, तर देशातील भांडवल पुरवठ्याची स्थिती चांगली राहून विविध आर्थिक क्षेत्राच्या वित्तपुरवठ्याच्या गरजा पूर्ण होतात. त्यामुळे आर्थिक क्षेत्रांचा विकास होऊन त्यांच्या व्यवहारात वाढ होते.
  • तंत्रज्ञानाची स्थिती : अलीकडील काळातील प्रगती ही तंत्राज्ञानाच्या विकासावर अवलंबून असते. देशात तंत्रज्ञानविषयक प्रगती मोठ्या प्रमाणात असेल, तर आर्थिक क्षेत्रांची वृद्धी वेगाने घडून येते. उत्पादन, व्यापार, उपभोग यांत वाढ होते.
  • पायाभूत सुविधांचा विकास : अर्थव्यवस्थेतील वाहतूक, दळणवळण, वीज इत्यादी पायाभूत सुविधांची स्थिती चांगली असेल, तर आर्थिक क्षेत्रांच्या वाढीच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची  प्रगती होते.
  • आंतरराष्ट्रीय घटक : जागतिक पातळीवरील आर्थिक वातावरण, जगातील विविध देशांमधील संबंध इत्यादींचा देशातील आर्थिक वातावरणावर परिणाम होतो. जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीमुळे देशातील आर्थिक व्यवहाराच्या पातळीत घट होते; तर तेजीच्या स्थितीत आर्थिक व्यवहारात वाढ होते.
  • इतर घटक : आर्थिक पर्यावरणावर सामाजिक व राजकीय घटकांचाही प्रभाव पडतो. देशात राजकीय स्थिरता आणि सामाजिक सलोखा असेल, तर विकासाच्या दृष्टीने योग्य वातावरण निर्माण होते.

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आर्थिक पर्यावरण हे अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे. आर्थिक पर्यावरण चांगले असेल, तर आर्थिक व्यवहारांत सहभागी असलेल्या घटकांना लाभदायक व्यवहार करण्याची संधी मिळते. उदा., व्यवसाय संस्थांना प्रगती करणे व महत्तम नफा मिळविणे शक्य होते, तर कुटुंबांना महत्तम समाधान मिळविणे शक्य होते. अर्थव्यवस्थेची वेगाने आर्थिक वृद्धी घडून येते.

संदर्भ :

  • Ahuja, H. L., Modern Economics, New Delhi, 2004.
  • Mahajan, Mukund, Economic Environment of Business, Pune, 2008.
  • Mathur, B. L., Economic Policy and Development, Jaipur, 2000.
  • Misra, S. K.; Puri, V. K., Economic Environment of Business, Mumbai, 2002.

समीक्षक : मुकुंद महाजन