साळुंखे, गोविंदराव ज्ञानोजीराव : (९ जून १९१९–८ ऑगस्ट १९८७). महाराष्ट्रातील एक थोर शिक्षणमहर्षी. ‘बापूजी’ या नावाने परिचित. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर हे त्यांचे मूळ गाव. ज्ञानोजीराव आणि तानुबाई या दांपत्याचा गोविंद हा सर्वांत धाकटा मुलगा. बालपणीच ते मातृसुखाला आणि बारा वर्षांचे असताना पितृसुखाला मुकले.

बापूजी यांचे प्राथमिक शिक्षण रामापूर येथे झाले. सांगली  जिल्ह्यातील इस्लामपूर येथे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये दाखल झाले. त्यांनी १९४५ मध्ये बी. ए. आणि १९४९ मध्ये बी. टी. या पदव्या संपादन केल्या. इस्लामपूर येथे मित्रांच्या सहकार्याने शिकत असतानाच त्यांनी ‘श्रीराम समाजसेवा मंडळ’ स्थापन केले. त्यामार्फत त्यांनी ठिकठिकाणी पंधरा प्राथमिक शाळा आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. भावी शिक्षणप्रसाराच्या कार्याचे हे बीजारोपण होते. २५ डिसेंबर १९४० रोजी बेळगावचे नानासाहेब पाटील यांच्या कन्या सुशीला यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन मुलगे व एक मुलगी आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत आप्पासाहेब पवार यांनी बापूजींवर म्हैसूर राज्यातील संस्थानांतर्गत सोंडूर संस्थानच्या इतिहास-संशोधनाची जबाबदारी सोपविली. बापूजींनी या संशोधनकार्याबरोबरच सोंडूरच्या राजपुत्रांचे राजगुरुपद आणि सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली. भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या काळात महात्मा गांधीजींच्या चले जाव चळवळीत ते सहभागी झाले; तसेच सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीतही त्यांनी काम केले. सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तरुणांचे संघटन केले. तसेच त्यांनी सातारा जिल्ह्यातील क्रांतीवर इतिहासलेखन केले.

बापूजींनी कर्मवीर भाऊराव पाटील पायगौंडा (Bhaurao Patil Paygaunda) यांच्या रयत शिक्षण संस्थेत अध्यापक आणि मुख्याध्यापक म्हणून काम केले. या संस्थेचे ते आजीव सेवक होते. कर्मवीर भाऊराव पाटील गौरव समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गौरव निधी जमा केला. १९४८ मध्ये संत गाडगेबाबा यांच्या हस्ते हा निधी कर्मवीरांना अर्पण करण्यात आला.

स्वतंत्रपणे काम करता यावे, म्हणून बापूजींनी ३१ डिसेंबर १९५४ रोजी ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’ची नोंदणी केली. या संस्थेने ६ जून १९५५ रोजी कोल्हापूर, तासगाव, चाफळ, उंडाळे व तारळे या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू केल्या. कराड येथे अध्यापिका विद्यालय व वसतिगृहे सुरू केली. त्यांनी ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारासाठी शिक्षणप्रसार’ हे संस्थेचे ब्रीद निश्चित केले. महाराष्ट्रातील १८ आणि कर्नाटकातील १ अशा एकूण १९ जिल्ह्यांतील खेड्यापाड्यांत, आदिवासी दुर्गम भागांत, उपेक्षित आणि विस्थापित समाजघटकांपर्यंत ज्ञानप्रसार केला.

संत गाडगेबाबांचे शिष्य शिंदेमहाराज यांनी २३ डिसेंबर १९६८ रोजी ‘शिक्षणमहर्षी’ म्हणून त्यांना गौरविले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे आहे. या संस्थेची १७० माध्यमिक विद्यालये; ६६ कनिष्ठ महाविद्यालये; १८ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालये; ८ प्रशिक्षण महाविद्यालये; ३ बी. एड. कॉलेज; १ विधी महाविद्यालय; १ निवासी आश्रमशाळा आणि १९ वसतीगृहे अशी सुमारे ३३० शाखा आहेत (२०१९).

बापूजींच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. श्री. छ. राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतरावजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते २७ एप्रिल १९८२ रोजी त्यांना मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलित मित्र’ ही पदवी दिली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी दिली.

बापूजी यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष गेडाम

This Post Has One Comment

  1. Sachin Ashok pore

    Ya Nondi mule Govindrao Dnyanojirao Salunke yanchi savistr Mahiti uplabdh jhali….

प्रतिक्रिया व्यक्त करा