मानवाचे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र आणणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया. योग हा शब्द ‘युज’ या संस्कृत शब्दापासून बनला असून त्याचा अर्थ जोडणे असा होतो. आद्य व्याकरणकार महर्षी पाणिनी यांनी योग या शब्दाचा संयोग, संयमन व समाधी असे तीन अर्थ सांगितले आहे. महर्षी व्यास यांनीही योगाचा अर्थ समाधी असाच सांगितला आहे. समाधी म्हणजे समत्व  भावना, मनाची अविचल स्थिती, सम अशी बुद्धी म्हणजे समाधी असा मुलार्थ होतो.

योग ही आदि-अनादी काळापासून चालत आलेली भारतीय विद्या आहे. भारतवर्षातील ऋषीमुनी, संत, अध्यात्मिक गुरू यांनी आपल्यातील शक्तीचा विकास करून परम चैतन्य आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून पूर्ण आनंदाची प्राप्ती करण्यासाठी योगक्रियांचा उपयोग केला. अनुकूल-प्रतिकूल, सिद्धी-असिद्धी, यश-अपयश, जय-पराजय इत्यादी भावनांत समत्व राखून निष्काम कर्म करणे; दिव्य प्रेरणेने प्रेरित होवून चित्त एकाग्र करणे; आत्मस्थ होणे याला गीता या धर्मग्रंथामध्ये योग म्हटले आहे. मोक्षपदापर्यंत पोहोचण्यासाठी योग हा एकमेव मार्ग असल्याचे अध्यात्मशास्त्र सांगते. वेद, पुराण, उपनिषद, बौद्ध तत्त्वज्ञान इत्यादींमध्येसुद्धा योगसाधनेला महत्त्व देण्यात आले आहे. जैन दर्शनामध्ये मन, वाणी आणि शरीराच्या वृत्तींना योग असे संबोधले आहे. वेगवेगळ्या दर्शनशास्त्रांमध्ये योग अपरीमित, अनादी, अनंत रूपांत व्यक्त करण्यात आलेला आहे. भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतील षडांगदर्शन या सर्वश्रेष्ठ ग्रथांत योग दर्शनशास्त्राचा अंतर्भाव होतो. योगविद्या ही भारतीय ऋषीमुनींनी आपल्यातील चेतनशक्तीचा विकास करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवलेली साधना आहे. ही विद्या पुरातनकाळापासून गूढ अशी व्यक्तिगत साधना होती. गुरुकूल शिक्षण पद्धतीपासून योग शिक्षणास प्रारंभ झाला असून ऋषींनी आपल्या शिष्यांना योगविद्या शिकविण्यास सुरुवात केली.

उद्दिष्ट्ये :

  • शरीर व मन यांना एकत्र जोडणे.
  • योगचित्तवृत्ती निरोधभाव चित्तवृत्तींचा निरोध.
  • शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक उन्नती करणे.
  • शरीर व मनाचे व्यापार नियंत्रित करणे.
  • सुख-दु:ख, लाभ-नुकसान या द्वंद्वांतून मुक्त होवून समत्व भावनेचा विकास करणे.
  • योगिक प्रक्रियेद्वारे आहार, विहार, विचार व व्यवहार संतुलित करून सुस्वास्थ्य, संपूर्ण सुखाची प्राप्ती करणे इत्यादी.

स्वरूप व व्याप्ती : योगशास्त्र हे अतिशय व्यापक शास्त्र आहे. मुलभूत विज्ञान, मानव्यविद्या यांतील विद्याशाखांमध्ये मानवी जीवनाच्या कोणत्याही एका अंगाचा अभ्यास करून अनेक अभ्यासशाखा व विषय निर्माण झाले. योगविज्ञानात मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा विचार करून व्यक्तिमत्त्वाचा परमोच्च विकास करणे, हे या शास्त्राचे उद्दिष्ट आहे. योगशास्त्र हे अतिप्राचीन असल्यामुळे निरनिराळ्या कालखंडात वेगवेगळ्या योगिक क्रियांचा अभ्यास केला गेला. योगशास्त्रात अनेक तंत्र, मंत्र वापरले जाऊन असंख्य प्रवाह उदयास आले. त्यांचा सूत्रबद्ध अभ्यास न झाल्याने योगाचे ज्ञान विस्कळीत होते. त्यात एकसूत्रीपणा आणण्याचे कार्य महामुनी पतंजली यांनी आपल्या १९६ योगसूत्रांद्वारे केले. योग शिक्षणाचा खरा प्रारंभ पातंजल योगातूनच झाला. बाराव्या शतकाच्या आरंभास हठप्रदिपिका, घेरण्डसंहिता, सत्कर्मसंग्रह, शिवसंहिता, योगतारावली, योगशास्त्र, भक्तीयोग, राजयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग इत्यादी योगप्रवाह उदयास आले.

कालानुरूप योगातील संकल्पना बदलत गेल्या. एका योगग्रंथातील प्रक्रिया दुसऱ्या योगग्रंथात वेगळ्या रूपात मांडण्यात आल्यात. उदा., स्वात्मरामांनी योगाची ४ अंगे सांगितली; घेरण्डसंहितेमध्ये ७ अंगाचा उल्लेख आहे; तर हठयोगात शुद्धीक्रिया आसने, बंध, प्राणायाम, ध्यान, कुंडलीनी जागृती, मुद्रा यांचे वर्णन आहे. हठयोगात पतंजलीचा उल्लेख नाही, तर पातंजल योगाहठयोगातील मुद्रा, बंध, कुंडलीनी जागृती यांचा उल्लेख आहे. स्वामी विवेकानंदांनी राजयोगाचा प्रसार केला. यामध्ये कर्मयोग, भक्तीयोग, प्रेमयोग यांचा समावेश आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदींनी भक्तीयोगाचा पाया घातला. हठयोगामध्ये आसने, प्राणायाम, मंत्रजप, ध्यान यांद्वारे तंत्रयोग पुढे आला. गीता उपविषयामधून ज्ञानयोग, कर्मयोग यांचा पुरस्कार केला गेला. एकुणच योग हे परिसीमारहित अतिव्यापक दर्शन आहे. दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान योगामध्ये तत्त्वज्ञान व शास्त्र दोहोंतील गुण समाविष्ट आहेत.

जगात योगाचा प्रसार सर्वदूर करण्याचे कार्य महर्षी पतंजलीच्या अष्टांगयोगाने केले व पतंजली योगाला जगमान्यता मिळाली. आधुनिक काळात योग घराघरांत पोहोचला आहे. रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर, ऋषी प्रभाकर, विश्वास मंडलीक, प्रजपिता ब्रम्हाकुमारीज, स्वामी कुवलयानंद, मोरारजीभाई देसाई योग संस्थान, दिल्ली अशा हजारो संस्था व तज्ज्ञ योगाचा प्रचार व प्रसार करीत आहेत. त्यामुळे योगाला सामान्य माणसाच्या हृदयात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

योग शिक्षण पद्धती : अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांबरोबरच शिक्षण ही आधुनिक काळात मानवाची महत्त्वाची गरज बनली आहे. विज्ञान, गणित, समाजशास्त्र, भाषा यांबरोबरच शारीरिक व आरोग्य शिक्षणाचे महत्त्वाचे अंग म्हणून योग शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वीच्या काळी योगविद्या ही गूढ असून ती साधना व्यक्तिगतच होती. सामूहिक शिक्षणात योग शिकविणे हे योगशास्त्राला अमान्य आहे. ज्ञानसंरचनावादी शिक्षणात ज्ञान ही आदान-प्रदानाची वस्तू नसून ती प्रत्यक्ष इंद्रिय अनुभवातूनच मिळत असते.

अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात योग शिक्षणाची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. योग शिक्षकांची अपुरी संख्या आणि वाढत्या लोकसंख्येमुळे व्यक्तिगत योग शिक्षण देणे अशक्य होऊ लागले आहे. त्यामुळे सामान्य शाळा, महाविद्यालयांतील शिक्षणाप्रमाणेच सामुदायिक योग शिक्षणाची पद्धत रुढ झाली. आज जगभर योगशिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यापीठे, योगशिक्षक, योग पंडित, प्राध्यापक, सामूहिक योगशिबीरे इत्यादींच्या माध्यमांतून योगाचे धडे दिले जात आहे. योग शिक्षण देताना मुख्यत: तीन पद्धतींचा वापर केला जातो. त्यामध्ये भावनिक प्रक्षोबद्ध प्रेरणा निर्माण करणे, क्लेशदायी शारीरिक कष्ट देणे आणि कार्यकारण भाव योग्य व अयोग्य परिणाम स्पष्ट करून योगशिक्षण देणे होय. या तीन पद्धतींद्वारे योग शिक्षण दिल्यास ते परिणामकारक होते, असे काही योगगुरूंचे मत आहे.

अष्टांग योग : अष्टांग योग हा महर्षी पतंजली यांनी आपल्या योगसूत्रांद्वारे मांडलेला जगमान्य योग आहे. पतंजलींनी वेद, उपनिषदे, गीता इत्यादी ग्रंथांतील योगदर्शनास एकत्र गुंफले आणि योगशास्त्राची १९६ सूत्रांत सूत्रबद्ध मांडणी केली. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र सर्वांनाच वैश्विक सुख, शांती व समाधान हवे आहे. त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी अनेक पंथ, संप्रदाय, धर्म आपल्या विशिष्ट तत्त्वज्ञानाद्वारे विश्वशांतीचा संदेश देतात. ऋषी पतंजलीकृत योगसूत्रे ही परिपूर्ण जीवन जगण्याची पद्धती आहे. अष्टांग योगाचा मार्ग म्हणजे वैयक्तिक, सामाजिक व वैश्विक सुख-शांतीचा राजमार्ग. अष्टांग योगाद्वारे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक व बौद्धिक विकास, मन:शांती व आत्मिक आनंद मिळविता येतो. हे महर्षी पतंजलींनी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध केले. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही आठ अंगे पतंजली योग म्हणून नावारूपास आली. वैयक्तिक व सामाजिक नियमांचे पालन करून जीवनातील सामान्य व्यवहारापासून शरीर व मनाला स्थिरता प्राप्त करून दिल्यानंतर ध्यान व समाधी या उच्चतम पातळीपर्यंतचा प्रवास अष्टांगमार्गांद्वारे दृग्गोचर केला आहे. यम व नियम हे पतंजली योगाचे मूलाधार आहेत.

योगमहर्षी पतंजलींनी आपल्या योगसूत्रात योगरूपी शरीराची आठ अंगे सांगितले आहे. यम, नियम, आसन व प्राणायाम ही ४ अंगे व्यक्तीच्या बाह्यरूपाशी निगडित असल्याने त्यांना बाह्यांगे असे म्हणतात; तर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंगे आहेत. प्रत्याहार हे अंतरंगाचे प्रवेशद्वार आहे. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रियाच्या यातायातीवर नियंत्रण ठेवून संयमाने विचलित मनाला स्थिर करावे लागते. यम नियमांचे पालन करूनच योग करावा लागतो. अन्यथा त्याचे उचित फळ मिळत नाही. बाल्यावस्था (वय वर्ष १०) ओलांडल्यानंतर कोणीही योग करू शकतो, असे हठप्रदिपीका या योग ग्रंथांत म्हटले आहे.

यम : ज्याच्या अनुष्ठानातून मन व इंद्रियांना स्थिर व शुद्ध केले जाते, त्यास यम म्हणतात.

नियम : शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान हे योगसाधकाचे स्वत:विषयी नियम आहेत.

आसन : शरीराची हालचाल थांबवून स्थिर राहणे म्हणजे आसन. स्थिरता व सुखकारकता हे आसनाचे वैशिष्ट्ये आहे. आसनामध्ये स्थिरता, निश्चलता, सुखकारकता, प्रयत्नपूर्वक शैथिलता, शरीर बंधनमुक्त करून मन एकाग्रता या चार पातळ्या आहेत. आसन घेणे, स्थिरता टिकवून ठेवणे व आसन सोडणे या ३ टप्प्यांनी आसन करणे गरजेचे असते. आसन घेताना अंक मोजून आसन घेणे आणि सोडताना उलटे अंक मोजून आसन सोडावे लागते. बैठकस्थितीतील (ध्यानात्मक) आसने, शयनस्थितीतील (आरोग्यात्मक) आसने व दंडस्थितीतील (विश्रांतीकारक) आसने असे आसनांचे वर्गीकरण केले जाते.

योगामध्ये पद्मासन, योगमुद्रा, अर्धमत्स्येद्रासन, सेतूबंधासन, वक्रासन, चक्रासन, भुजंगासन, शवासन, त्रिकोणासन, ताडासन, हलासन, शलभासन, धनुरासन, शशकासन, गोमुखासन, मंडूकासन, गरुडासन, शिर्षासन इत्यादी आसनांचा समावेश होतो. कोणत्याही आसनात पाठीच्या कण्याची ताठ अवस्था पुढे, मागे हालचाल, ताण व दाब यांमुळे सुडोल शरीर व आरोग्य प्राप्त होण्यास मदत होते. आसने केल्याने शरीराच्या अंगप्रत्यांगांना क्रियाशिलता मिळते आणि शारीरिक व मानसिक आरोग्य लाभते.

प्राणायाम : श्वास आणि प्रच्छावासाच्या गतीला छेद देऊन प्राणाचा आयाम करणे म्हणजे प्राणायाम. श्वास घेणे (पुरक), श्वासाला रोखून धरणे (कुंभक-स्तंभ) आणि श्वास बाहेर सोडणे (रेचक) या प्राणायामाच्या तीन क्रिया असून यांद्वारे प्राणायाम सीमित होतो. हठप्रदिपीकेत ७८ श्लोकांतून, तर घेरंड सहितेत ९१ श्लोकांतून प्राणायामाचे वर्णन केले आहे. प्राणवायू व मन यांच्या साह्याने (प्राणायामाने) शरीराचे नियंत्रण करणे शक्य होते. सिद्धासनात किंवा पद्मासनात बसून श्वास बाहेर सोडून थांबणे (रोखने) म्हणजेच बाह्यवृत्ती प्राणायाम; श्वास आत घेवून आतच रोखून ठेवणे म्हणजे अभ्यंतरवृत्ती प्राणायाम; श्वास जेथे आहे, तेथेच रोखून ठेवणे म्हणजे स्तंभवृत्ती प्राणायाम आणि श्वास आत घेतल्यानंतर व बाहेर सोडल्यानंतर दोन्ही वेळा रोखून ठेवणे म्हणजे बाह्यांतर प्राणायाम होय.

दीर्घाकडून सूक्ष्माकडे प्रवास करणे ही प्राणायामाची प्रगत अवस्था आहे. हवेशिवाय कुंभक करता येणे ही प्राणायामाची प्रगत अवस्था होय. प्रगत अवस्थेतून शरीराला लागणाऱ्या उर्जेची गरज शुन्यावर आणणे ही प्राणायामाची आदर्श अवस्था होय. प्राणायामाचे सूर्यभेदन, उज्जायी, सित्कारी, शितली, भस्त्रिका, भ्रामरी, मुर्च्छा, प्लाविनी इत्यादी प्रकार आहेत.

प्रत्याहार : प्रत्याहार म्हणजे पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये यांवर मनाने नियंत्रण मिळविणे; कारण इंद्रिये आपल्या इच्छेप्रमाणे विषयाकडे धावतात व मनालाही आपल्याबरोबर ओढून नेतात. प्रत्याहारात मनाने इंद्रियांवर ताबा मिळविणे आवश्यक असते. प्रत्याहाराद्वारे चंचल व अस्थीर मन स्थिर होते व काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या शत्रुंचा नाश होतो. प्रत्याहारातून मन इंद्रियांच्या ताब्यातून मुक्त होते. योगसाधक विवेकी, वैराग्यी, इंद्रियांवर विजय मिळवून जितेंद्रीय बनतो. प्रत्याहारात मोह नियंत्रण करणे आवश्यक असते.

धारणा : धारणा म्हणजे चित्ताला एका विशिष्ट बंधनात गुंतवून ठेवणे. मनाला ओंकाराचे आलंबन देवून नाभिचक्र, हृदपुंडरिक, मुर्धाज्योत, भूमध्य, नासिका इत्यादी शरीर स्थानांपैकी कोणत्याही एका स्थानावर एकाग्र करणे म्हणजे धारणा होय. धारणा, ध्यान व समाधी या एकाग्रतेच्या प्रगत अवस्था आहेत.

ध्यान : ध्यान म्हणजे चित्त एकाग्र करणे. धारणेशिवाय ध्यान होत नाही. ध्यानातून आनंदमय व शांतीमय जीवन जगता येते. ध्यान ही एक मोठी यौगिक क्रिया आहे. प्रत्येक श्वासासोबत साक्षीभाव व ओंकार जप केल्याने ध्यान सहजसाध्य होते.

समाधी : समाधी म्हणजे ध्यानाची परिपक्व अवस्था, त्रयम, संयम आणि आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होय. समाधी हे अष्टांग योगाचे अंतिम अंग आहे. समाधी साधनेत प्रज्ञेचा आलोक (प्रकाश) संपूर्ण शरीरात व बाह्यरूपात पसरतो व पंचमहाभूतांवर विजय मिळविता येतो.

योग शिक्षण अभ्यासक्रम : भारतात प्राचीन काळापासून योगाचे अध्ययन व अध्यापन करण्याची परंपरा आहे. योगाचा प्रसार व प्रचार करणारे संत, योगपुरूष, ऋषी, सन्यासी, महर्षी, साधू हे भारतामध्ये होते. वैदिक काळामध्ये योग शिक्षण हा गुरूकूल शिक्षण पद्धतीचा पाया होता. स्वातंत्र्यपूर्व काळात मेकालेच्या मिनिटपासून ते सार्जंट रिपोर्टपर्यंत आणि स्वातंत्र्योत्तर काळात विद्यापीठ शिक्षण आयोग, माध्यमिक शिक्षण आयोग, कोठारी आयोग इत्यादी आयोग व समित्यांद्वारे शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण यांचे व्यक्तिमत्त्व विकासातील स्थान अधोरेखित केले आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठीय स्तरावर शारीरिक व आरोग्य शिक्षणात योग शिक्षणाला महत्त्व दिले आहे. सर्व स्तरावर मानवी मूल्ये, जीवन कौशल्ये व अभ्यासक्रम निर्मितीच्या घटकांद्वारे योग शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. एन.सी.ई.आर.टी.च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा १९८८, २०००, २००५ या शालेय अभ्यासक्रमामध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शरीर व मनाचे संतुलन साधणारे शारीरिक व आरोग्य शिक्षण योगाच्या माध्यमातून देण्यासाठी विशेष पाठ्यक्रमाची आवश्यकता स्पष्ट केली आहे. १९८१ पासून केंद्रीय विद्यालये व नवोदय विद्यालयांमध्ये योगशिक्षण अभ्यासक्रम लागू केला.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, हरयाणा राज्य इत्यादी राज्यांमध्ये योग शिक्षण अनिवार्य केले आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) तयार केलेल्या नवीन अध्यापक शिक्षण आराखड्यात अध्यापक शिक्षणाच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये योग शिक्षण विषयाचा समावेश करण्यात आला आहे. परिषदेने योग शिक्षणाचे १५ अभ्यासक्रम तयार केले असून देशातील १७ हजारांपेक्षा जास्त संस्था व १४ लाखांपेक्षा अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. एम.एच.आर.डी., यु.जी.सी., एन.सी.ई.आर.टी., ए.आय.सी.टी.ई., एस.सी.ई.आर.टी, युनिसेफ, युनेस्को इत्यादी शिखरसंस्थांद्वारे जीवनकौशल्ये, मानवीमूल्ये, पर्यावरण शिक्षण, शांतता शिक्षण, आरोग्य शिक्षण, शारीरिक शिक्षण यांसह योग शिक्षण हे मानवी विकासाचे मुलभूत अंग म्हणून पुढे येत आहे.

भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये सर्वच स्तरावर व्यायाम, खेळ, योगासने, योगिक क्रिया, प्राणायाम, सूर्यनमस्कार, विहार नियंत्रण, आयुर्वेद इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. एन.सी.टी.ई. २०१४ नुसार शिक्षक प्रशिक्षणामध्ये योगशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या प्रात्यक्षिकातून मी कोण? माझ्या जीवनाचा हेतू काय? या योगातील मूलतत्त्वांचा स्वीकार शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात केलेला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये युनायटेड नेशनमध्ये भारत सरकारने मांडलेल्या योगविषयक ठरावाला जगातील १७७ देशांनी मान्यता देऊन योग हे भारतवर्षाचे परमतत्त्वज्ञान व परमशास्त्र असल्याचे मान्य केले. त्यामुळे दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास मान्यता मिळाली. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या माध्यमातून भारतीय योग परंपरेचा प्रसार व प्रचार करण्याचे सुवर्णयुग सुरू झाले. वेद, उपनिषद, पुराण, गीता इत्यादी प्राचीन वाङ्मयामध्ये योगाचे तात्विक अधिष्ठान पाहायला मिळते. त्यामुळे योग ही भारतवर्षाची अमूल्य देणगी आहे, हे सर्वमान्य झाले आहे.

योगा हे व्यक्तिमत्त्व विकासाचे अत्यंत प्रभावी शास्त्र आहे. योगीक क्रिया या व्यक्तिगत अनुभूतीचे शास्त्र आहे. योगाद्वारे शारीरिक, मानसिक व आत्मिक विकासातून व्यक्तीविकास होतो. समाज उभारणीसाठी, जीवन जगण्याची, विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी अष्टांग योग हा महत्त्वपूर्ण ठरतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांद्वारे व्यक्तीला आपल्या अस्तित्वाचा पूर्णबोध होऊन जीवनाचे अंतिम सत्य समजते व व्यक्ती अष्टावधानी बनते.

संदर्भ :

  • आचार्य बालकृष्ण्, योगशिक्षण पाठ्यक्रम, हरिद्वार, २००९.
  • पावगीशास्त्री, वे. शां. सं.; रघूनाथ भास्कर, योगवसिष्ठ, पुणे, २०१४.
  • मंडलिक विश्वास, योगसिद्धांत, नाशिक.
  • स्वामी रामदेव, योगचिकित्सा रहस्य, हरिद्वार, २००७.
  • स्वामी रामदेव, प्राणायाम, हरिद्वार, २००७.
  • Digambar Swami; Kokaje, R., Hath Pradipika, Lonavala, 1971.
  • Karambelkar, P. V., Patanjali yoga Sutra, Lonavala, 1984.
  • Kuvalayanada Swami, Asanas, Lonavala, 1933
  • Johan, G, Peace by Peaceful Means, New Delhi, 1996.

समीक्षक : के. एम. भांडारकर