‘प्रत्याहार’  या  शब्दाची फोड प्रति + आ + हृ अशी आहे. ‘हृ’ या धातूचा अर्थ ‘हरण करणे’ असा आहे. प्रति आणि आ हे दोन उपसर्ग आहेत. प्रति म्हणजे ‘विरुद्ध’ तर आ म्हणजे ‘चारही बाजूंनी.’ यामुळे ‘प्रत्याहार’ या संज्ञेचा अर्थ सर्व बाजूंनी मागे वळविणे; ज्याचे (इंद्रियांचे) हरण झाले आहे त्याला परतविणे असा होतो. प्रत्याहार हे अष्टांगयोगाचे पाचवे अंग आहे. पतंजलींनी प्रत्याहाराची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे —

“पाच इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी संयोग नसताना त्या इंद्रियांनी निरुद्ध चित्त ज्याप्रमाणे असते तशा स्वरूपाचे अनुकरण करणे अर्थात निरुद्धावस्थेत राहणे म्हणजे प्रत्याहार होय” (स्वविषयासंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इवेन्द्रियाणां प्रत्याहार:|, योगसूत्र २.५४).

श्रोत्र (कान), त्वक् (त्वचा), चक्षु (डोळे), रसना (जीभ) आणि  घ्राण (नाक) ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गन्ध हे अनुक्रमे त्यांचे विषय होत. इंद्रियांचे विषय हा त्यांचा आहार मानला जातो. त्यापासून त्यांना परावृत्त करणे असा प्रत्याहार शब्दाचा अर्थ होतो.  ज्यावेळी बाह्य विषयांचे ज्ञान होते, त्यावेळी चित्त इंद्रियांच्याद्वारे त्या त्या विषयाचा आकार धारण करीत असते. इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी होणारा संबंध म्हणजे सम्प्रयोग होय. याउलट इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी संबंध नसणे म्हणजे असम्प्रयोग होय. प्रति या उपसर्गाचा एक अर्थ प्रत्येक असाही आहे. त्यामुळे प्रत्याहारामध्ये केवळ ज्या इंद्रियाचा विषयाशी संबंध आला त्याचाच नव्हे तर सर्व इंद्रियांचाही निरोध समाविष्ट आहे. चित्तनिरोध झाला असता इंद्रियांचाही सहज निरोध होतो आणि इतर मार्गाने साधल्या जाणाऱ्या इंद्रियजयाची योग्याला आवश्यकता भासत नाही.

प्रत्याहार कशाला म्हणावे याविषयी मतमतान्तरे आहेत. व्यासभाष्यात त्यापैकी काही आचार्यांची मते उद्घृत केली आहेत. त्यानुसार (१) शब्दादि विषयांविषयी आसक्ती नसणे (२)  स्वत:च्या  इच्छेनुसार शब्दादि विषयांशी संयोग झाला तरी त्या विषयांच्या आहारी न जाणे, विषयांचे गुलाम न होणे (३) शब्दादि विषयांशी संयोग घडला असतानाही त्यांच्याविषयी सुख, दु:ख, राग, द्वेष न वाटणे; त्याविषयी तटस्थ भाव ठेवणे, उदासीन राहणे (४) जैगीषव्यांच्या मते चित्त एकाग्र झाल्यामुळे जसे ते विषयात प्रवृत्त होत नाही त्याप्रमाणे इंद्रियांनी आपापल्या विषयात प्रवृत्त न होणे, कार्यरत न होणे म्हणजे प्रत्याहार. कारण चित्ताचा निरोध झाला असता इंद्रियनिरोध आपोआपच विनायास निष्पन्न होतो (व्यासभाष्य २.५४). भोजानेही जैगीषव्य यांचे मत स्वीकारले आहे (भोजवृत्ति २.५४).

शाण्डिल्य उपनिषदानुसार पाच प्रकारचा प्रत्याहार पुढीलप्रमाणे आहे. (१) विषयांमध्ये विहार करणाऱ्या इंद्रियांना बलपूर्वक विषयांपासून मागे ओढणे (२) जे जे दृष्टिपथास येईल ते ते सर्व आत्मरूप आहे असे जाणणे (३) प्रत्येक दिवशी करावयाच्या नित्य कर्मांच्या फळाचा त्याग करणे (४) लौकिक जगातील सर्व विषयांविषयी अनासक्ति बाळगणे (५) शरीराच्या निरनिराळ्या अवयवांवर चित्त एकाग्र करून बाह्यविषयांपासून आवरून घेऊन ते मागे घेणे असे ते पाच प्रकार होत (शाण्डिल्य उपनिषद् ८.१).

नारायणतीर्थ योगसिद्धान्तचन्द्रिका या ग्रंथामध्ये असे म्हणतात की, प्रत्याहारामध्ये इंद्रिये विरुद्ध दिशेला म्हणजेच त्यांच्या विषयांपासून मागे वळविली जातात म्हणून त्याला प्रत्याहार असे म्हणतात (इन्द्रियाणि विषयेभ्य: प्रतीपमाह्रीयन्तेऽस्मिन्निति |, योगसिद्धान्तचन्द्रिका २.५४).

इंद्रियांवर संयम  (धारणा, ध्यान, समाधी) करणे हाही इंद्रियजयाचा उपाय आहे. परंतु, तो प्रत्याहार नव्हे.

योग शब्दाची व्याख्या चित्तवृत्तींचा निरोध अशी पतंजलींनी केली आहे. चित्ताच्या क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र व निरुद्ध अशा पाच अवस्था आहेत. त्यांपैकी पहिल्या चार अवस्थांमध्ये चित्त निरुद्ध नसते. निरुद्ध चित्तामध्ये सत्त्व, रज आणि तम ह्या तीनही गुणांची साम्यावस्था असते. त्यामुळे ज्ञानरूप बोध करणारा सत्त्वगुण, कर्मासाठी प्रेरणा देणारा रजोगुण आणि ज्ञानावर आवरण घालणारा तमोगुण हे चित्ताच्या निरुद्ध अवस्थेत कार्यरत होऊ शकत नाहीत. या अवस्थेत चित्तात केवळ संस्कार शिल्लक असतात. चित्ताच्या अन्य अवस्थांत वृत्तिनिरोध शक्य असला तरी तो संपूर्ण वृत्तिनिरोध नसून आंशिक वृत्तिनिरोध होय.

ज्यावेळी साधक चित्ताच्या वृत्तींचा निरोध करतो त्या वेळी इंद्रियांचा विषयांशी संयोग असला तरीही चित्त विषयाचा आकार धारण करीत नाही. ही चित्ताची निरुद्ध अवस्था होय. या अवस्थेत अन्य विषयांचा आकार धारण न केल्यामुळे चित्त हे स्वरूपात (निरुद्ध) अवस्थित राहते. ज्याप्रमाणे विषयाशी संबंध नसल्यामुळे चित्त निरुद्ध होते, त्याचप्रमाणे विषयांशी संबंध नसल्यावर इंद्रियेही निरुद्ध असल्यासारखी होऊन जातात. यालाच प्रत्याहार असे म्हणतात. असम्प्रयोगामुळे इंद्रिये जणू निरुद्ध चित्ताप्रमाणे निरुद्ध होऊन जातात.

व्यावहारिक जीवनातही आपल्याला अनुभव येतो की चित्त व्यग्र असल्यास आपल्याला अन्य कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होत नाही. उदाहरणार्थ, अथांग सागराचे चित्र काढण्यात एकाग्रचित्त असलेल्या चित्रकाराला आजूबाजूने जाणाऱ्या वाहनांचे आवाज ऐकू येत नाहीत. म्हणजे येथे श्रोत्र इंद्रियाने शब्द विषयाशी संयोग साधला नाही, त्यामुळे त्याला त्या विषयाचे संवेदन झाले नाही. केवळ नेत्र हे इंद्रिय सागराचे रूप ग्रहण करण्यात गढले आहे. इंद्रियनिरोधासाठी इंद्रिये विषयांपासून परावृत्त होणे गरजेचे आहे. “कासव ज्याप्रमाणे आपले अवयव सर्व बाजूंनी आत ओढून घेतो त्याप्रमाणे संयमी पुरुष आपली इंद्रिये विषयांपासून परावृत्त करतो. त्याची बुद्धी स्थिर होते” (भगवद्गीता २.५८; बृहद्योगियाज्ञवल्क्यस्मृति ८.५३).

चित्ताच्या आणि इंद्रियांच्या परस्परांशी असलेल्या संबंधाला मधाच्या पोळ्यातील राणीमाशी आणि इतर माश्या ह्यांच्या संबंधाची उपमा दिली आहे (व्यासभाष्य २.५४). राणीमाशी उडाली तर इतर मधमाश्या तिच्या मागोमाग उडतात आणि ती बसली तर त्या बसतात. इंद्रिये देखील चित्त जिकडे जाईल तिकडे जातात. चित्ताचा निरोध झाला की इंद्रियांचा निरोध होतो. ह्यासाठी चित्तनिरोधाचा निरंतर अभ्यास करून इंद्रिये स्वाधीन राखणे आवश्यक आहे.

प्रत्याहारामुळे साधकाला इंद्रिये वश होतात. हीच इंद्रियांची वश्यता होय (तत: परमा वश्यतेन्द्रियाणाम् |, योगसूत्र २.५५). ही वश्यता धारणा, ध्यान आणि समाधि यांच्यासाठी आवश्यक आहे. ती साधल्यावर साधकाची इच्छा असेल तेव्हाच इंद्रिये विषयाभिमुख होतील अन्यथा नाही. धारणा, ध्यान, समाधीत इंद्रिये विषयाभिमुख झाली तर चित्त चंचल होईल आणि ही तिन्ही अंगे सिद्ध होणार नाहीत. कठ उपनिषदात इंद्रियांना घोड्यांची उपमा दिली आहे (कठ उपनिषद् १.३.४.). घोडे सारथ्याला वश असतील तर ते सारथ्याच्या इच्छेप्रमाणे रथाला त्या त्या ठिकाणी नेतात. परंतु, ते स्वत:च्या प्रेरणेने धावू लागले तर रथ भलत्या दिशेने जाईल. कठोपनिषदात इंद्रिये स्थिर ठेवणे यालाच योग असे म्हणतात (कठ उपनिषद्  २.३.१०-११).

सारांश, इंद्रिये स्वभावत:च बहिर्मुख, बाह्य विषयांकडे धावणारी असतात. त्यांच्या बहिर्मुख प्रवृत्तीला अंतर्मुख बनविणे, याला प्रत्याहार म्हणावे. प्रत्याहार हा बहिरंग योग आणि अंतरंग योग यातील महत्त्वाचा दुवा आहे.

                                                                                                                                                         समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर