वृक्षस्थ जीवनाचा संबंध बाहुसंचलन किंवा शाखन म्हणजेच वृक्षावर जीवन जगण्यास अनुकूल होणे असा आहे. या दोन्ही शब्दांचा परस्पर संबंध आहे. प्राणिमात्रांच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीचा अभ्यास करताना प्राण्यांचे वर्गीकरण महत्त्वाचे असते. पृष्ठवंशीय प्राण्यांतील सस्तन प्राणी आणि त्यांच्यातील प्रगत असा नरवानर गण (प्रायमेट्स) हा प्राणीवर्ग यांनी वृक्षस्थ जीवनाचा अधिक वापर केला आहे आणि आजही ते करताना दिसतात.
वृक्षस्थ जीवनाला अनुकूल अशी हालचालीची पद्धत म्हणजे ‘शाखन’ पद्धत होय. जमिनीवरील शत्रुंपासून संरक्षण मिळविण्याच्या दृष्टीने या प्राण्यांच्या शरीरात योग्य असे अनुकूल बदल झाले. त्यामुळे त्यांना पुढच्या आणि मागच्या दोन्ही पायांचा किंवा हातपायांचा वापर करून झाडावर चढणे, झाडावरून उतरणे, झाडावर पळणे, झाडावरून उड्या मारणे, झाडावरील फांद्यांवर लोंबकळणे अशा माकड आणि कपींमध्ये आढळणाऱ्या हालचाली त्यांच्या अनुकूल शरीररचनेमुळे शक्य होतात. त्यांना उत्क्रांतीच्या क्रियेत आवश्यक अशी शरीररचना प्राप्त झाली. यामध्ये लांबीरुंदीसहित खोलीचे ज्ञान असलेली त्रिमितीय दृष्टी, शिवाय वृक्षावर पकड येण्यासाठी रेषात्मक तळहात, तळपाय आणि त्यांची बदललेली रचना, स्पर्शज्ञान, नख्यांचे नखात झालेले रूपांतर, जत्रुकास्थींची (कॉलब बोन) रचना या त्यांच्या शरीररचनेतील महत्त्वाच्या बदलांतून त्यांचे वृक्षस्थ जीवन सुकर झाले. खार, माकडे आणि काही प्रमाणात कपी हे वृक्षस्थ जीवन जगतात.
पृष्ठवंशीय सस्तन प्राणी आणि त्यांच्यातील प्रगत नरवानर गणाची शरीराची अवस्था काहीशी उभी असते. चेहरा समोर असतो. त्यांचे हात हे पायापेक्षा लांब असतात. हाताचा पंजा आणि बोटे लांब असतात. ज्यामुळे हाताची रचना हूक किंवा आकडीप्रमाणे होते. त्यामुळे त्यांना फांदीवर लोंबकळणे, एका फांदीवरून दुसरीकडे जाणे सोपे होते.
संदर्भ : Srivastava, R. P., Morphology of the Primates and Human Evolution, New Delhi, 2009.
समीक्षक : पिसाळ हेमा