प्रत्येक रुग्णाला किंवा व्यक्तीला सर्वसमावेशक अथवा व्यक्तिगत परिचर्या देऊन पद्धतशीरपणे त्यांची समस्या सोडविण्याचा दृष्टिकोन म्हणजे परिचर्या प्रक्रिया होय. रुग्णालयात दाखल झालेला प्रत्येक रुग्ण हा स्वतंत्र असून त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. एकाच आजाराने त्रस्त असणाऱ्या दोन भिन्न रुग्णांना त्यांच्या शारीरिक व मानसिक स्थितीनुसार परिचर्या द्यावी लागते. रुग्णाच्या सर्व गरजांचा सारासार व चिकित्सक अभ्यास करून परिचारिका त्याच्या परिचर्या सेवेचा आराखडा तयार करते व त्याप्रमाणे त्याला सेवा दिली जाते. या प्रक्रियेद्वारे रुग्णाच्या समस्यांचे टप्प्याटप्प्याने निदान व निराकरण केले जाते. ही लक्ष्य साध्य करणारी, परिणामांचे निकष तयार करून राबविलेली तसेच आवश्यकतेनुसार बदल होणारी लवचिक परंतु शास्त्रशुद्ध पद्धत आहे.
परिचर्या प्रक्रियेमध्ये रुग्णाची समस्या ओळखण्याकरिता त्याची आवश्यक ती सर्व माहिती गोळा केली जाते व त्यानुसार समस्येच्या निराकरणासाठी गृहितक (Hypothesis) ठरविले जाते. या गृहितकाची चाचणी करून, परिणामांचा अर्थ लावून शेवटी निष्कर्षांचे मूल्यांकन केले जाते.
परिचर्या प्रक्रियेचे फायदे :
- रुग्णाचा सक्रिय सहभाग असल्याने परिचारिका व आरोग्य संघातील प्रत्येक घटकासोबत प्रभावी संवाद साधला जातो.
- परिचारिकेला व्यक्तिकेंद्रित सेवा देणे शक्य होते, त्यामुळे रुग्णसेवेत सातत्य राखले जाते.
- रुग्ण समस्येचा स्पष्ट आणि प्रभावी आराखडा तयार करण्यास मदत होते व त्यानुसार शुश्रूषा दिल्याने आरोग्यात सुधारणा दिसते.
परिचर्या प्रक्रियेतील पायऱ्या : परिचर्या प्रक्रिया मुख्यत्वे तपासणी, निदान, नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन या पाच पायऱ्यांमध्ये विभागली जाते.
- तपासणी (Assessment or data collection) : प्रक्रियेच्या या पहिल्या पायरीवर परिचारिका प्राथमिक व दुय्यम स्रोतांच्या आधारे रुग्णाच्या आजाराविषयीची माहिती गोळा करते. स्वत: रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व रुग्णाची सर्वसाधारण आणि आजाराविषयीची माहिती यांचा समावेश प्राथमिक स्रोतांमध्ये होतो. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णाची शारीरिक तपासणी, प्रयोगशाळा तपासणी अहवाल, रोग निदान चाचणी अहवाल, डॉक्टरांच्या निरीक्षण नोंदी, आरोग्य संघातील इतर सदस्यांकडून प्राप्त माहिती आणि रुग्ण कक्षातील इतर कार्यरत परिचारिका इत्यादींकडून मिळालेली माहिती म्हणजे दुय्यम स्रोत होय. या दोन्ही स्रोतांचा उपयोग करून प्राप्त झालेली माहिती अनुक्रमे व्यक्तिनिष्ठ (Subjective) व वस्तुनिष्ठ (Objective) या दोन भागांत विभागली जाते. सर्वसमावेशक तपासणी, रुग्ण केंद्रित तपासणी, सतत चालणारी तपासणी व अत्यवस्थ तपासणी अशा चार प्रकारांत तपासणीची विभागणी केली जाते. सर्वसमावेशक तपासणी ही तपासणी रुग्णाच्या आजाराचे निदान करण्यास साहाय्यभूत ठरते. यामध्ये रुग्णाची मुलाखत घेणे आणि शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक बाबींचा विचार केला जातो. रुग्ण केंद्रित तपासणीत रुग्णाच्या विशिष्ट आरोग्य समस्येकडे लक्ष दिले जाते. उदा., आई व वडील यांना मधुमेह असेल, तर त्यांच्या मुलांची मधुमेहासाठी तपासणी केली जाते.
एखाद्या आजारात रुग्णाच्या शारीरिक स्थितीत होणारे बदल ओळखून उपचारादरम्यान त्याची वेळोवेळी पुनर्तपासणी करून नोंद करून ठेवली जाते. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाची जीव वाचविण्यासाठी तातडीने आवश्यक तपासणी करण्यात येते व उपचार सुरू केले जातात.
- पारिचारिक निदान (Nursing Diagnosis) : परिचर्या प्रक्रियेच्या या पायरीवर रुग्णाची शारीरिक ताकद, आजाराशी लढण्याची ताकद आणि त्याची आरोग्य समस्या यांची सांगड घालून NANDA (North American Nursing Diagnosis Association) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारिचारिक निदान केले जाते. त्यानुसार रुग्णाच्या वास्तविक व संभाव्य समस्येवर त्याचा प्रतिसाद कसा आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, यांचा उपचार प्रक्रियेत समावेश केला जातो. पारिचारिक निदानासाठीच्या विधानाचे रुग्णातील आरोग्य समस्या, समस्येची कारणे व त्यातील गंभीरता असे तीन महत्त्वाचे भाग पडतात. यांचा उपाययोजनांचे नियोजन करताना उपयोग होतो.
- नियोजन (Planning) : पारिचारिक निदानंतर रुग्ण समस्येच्या गंभीरतेनुसार प्राथमिकता ठरविणे व कृती आराखडा तयार करणे यांचा समावेश प्रक्रियेच्या तिसऱ्या पायरीत होतो. नियोजन करताना रुग्णाच्या शारीरिक अवस्थेत काय सुधारणा अपेक्षित आहे त्यानुसार कमी कालावधीत साध्य करावयाचे लक्ष्य (काही तास ते एक आठवडा इतका कालावधी) आणि दीर्घ कालावधीत साध्य करावयाचे लक्ष्य (एक आठवडा ते काही महिने इतका कालावधी) असे दोन प्रकारचे लक्ष्य ठरविले जातात. रुग्णाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व ठरविलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी रुग्ण दाखल झाल्यावर, उपचार सुरू असताना व सर्व उपचारअंती प्रकृतीत सुधारणा होऊन रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर अशा तीन स्तरावर परिचारिका नियोजन करतात. यामध्ये औषधोपचारांबरोबरच व्यायाम, आहार इत्यादींविषयीचे नियोजन केले जाते.
नियोजन करताना तयार करण्यात येणारा परिचर्या कृती आराखडा हा रुग्ण केंद्रित व सकारात्मक असावा. तसेच रुग्णाच्या शारीरिक स्थितीत होणारे बदल, वेळेची मर्यादा, परिचारिकेची कृती व शुश्रूषेची यशस्विता, वास्तविक स्वरुपात अंमलबजावणी यांचा विचार करुन केलेला असावा. नियोजन करताना मॅझ्लो श्रेणीबंधाचा (Maslow’s Hierarchy) म्हणजेच मानवाच्या मूलभूत गरजांचा क्रम विचारात घेवून प्राथमिकता ठरविली जाते.
- अंमलबजावणी (Implementation) : परिचर्या प्रक्रियेतील चौथी व महत्त्वाची पायरी. यामध्ये परिचर्या कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जाते. रुग्णाच्या समस्येला अनुसरून केलेल्या नियोजनानुसार पारिचारिक कृती प्रत्यक्षात केल्या जातात. उदा., ताप असेल तर थंड पाण्याने अंग पुसणे, ऑक्सिजन सुरू करणे, औषध देणे, शारीरिक स्थिती बदलणे, रुग्णाला सल्ला देणे, त्याचे समुपदेशन करणे, रुग्णाला व्यायाम शिकविणे इत्यादी . कृती करत असताना परिचारिका कृती करा, कृती आता करा व कृती आता लगेच करा या बाबी लक्षात ठेवते. कृती करताना वेळोवेळी रुग्णाच्या शारीरिक अवस्थेमध्ये होणारे सकारात्मक आणि नकारात्मक बदल लक्षपूर्वक पाहते व आवश्यकतेनुसार परिचर्या कृती आराखड्यात बदल करते.
- मूल्यमापन (Evaluation) : आराखड्याप्रमाणे कृती केल्यानंतर रुग्णाच्या समस्येच्या अनुषंगाने जे नियोजन केले होते ते किती प्रमाणात साध्य झाले आहे हे ठरविणे म्हणजे मूल्यमापन होय. मूल्यमापन ही रुग्णाच्या उपचरादरम्यान सतत चालणारी प्रक्रिया आहे. रुग्णाच्या सुरवातीच्या किंवा दाखल होतानाच्या चिन्हे व लक्षणांमध्ये होत असलेला सकारात्मक किंवा नकारात्मक बदल पाहून त्याच्यावर उपचारांचा होत असलेला परिणाम दिसून येतो. सकारात्मक परिणाम असतील तर, रुग्ण आजारातून लवकर बरा होईल याची खात्री देता येते. नकारात्मक बदल असतील तर उपचार पद्धती बदलण्याची गरज तत्काळ ओळखली जाते. परिचारिका तसे तज्ज्ञांना कळवितात आणि मूल्यमापन करण्यासाठी पुन्हा परिचर्या प्रक्रियेतील प्रथम पायरी म्हणजे पुनर्तपासणी (Re-Assessment) केली जाते. म्हणूनच परिचर्या प्रक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.
संदर्भ :
- Potter; Perry, Fundamentals of Nursing: Second South Asia Edition.
- Sr. Nancy, Principles & Practice of Nursing, Vol 1.
समीक्षक : कविता मातेरे