बीअर, स्टॅफोर्ड : (२५ सप्टेंबर, १९२६ – २३ ऑगस्ट, २००२)बीअर स्टॅफोर्ड  यांचा जन्म लंडनमधील पुटनी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण दक्षिण लंडनमधील व्हीटगिफ्ट या शाळेत झाले. तत्वज्ञान विषयात पदवीसाठी त्यांनी लंडन विद्यापीठाच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला पण दुसऱ्या महायुद्धात रॉयल तोफखान्यात भरती होऊन  त्यांनी आपली सेवा दिली आणि त्यानंतर गोरखा रायफल्स या दलात सामील होऊन भारतात कामगिरी केली. भारताचे विभाजन होत असतानाची लष्करी परिस्थिती गणिती स्वरूपात मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला जो पुढे त्यांना प्रवर्तन संशोधन या विषयाकडे घेऊन गेला. पुढे त्यांनी सैन्यदलाची नोकरी सोडून युनायटेड स्टील या त्यावेळच्या इंग्लंडमधील सर्वात मोठ्या स्टील उत्पादन कंपनीत व्यवस्थापन अधिछात्र म्हणून प्रवेश घेतला. इथेच त्यांनी उत्पादन नियंत्रणासाठी एक स्वतंत्र प्रणाली तयार केली तसेच प्रवर्तन संशोधन गट स्थापून स्टील उद्योगासाठी विविध गणिती प्रारूपे मांडून संपूर्ण उत्पादन प्रक्रिया शक्य तितकी स्वयंचलित करून इष्टतम करण्याचे कार्य केले.

१९५० च्या दशकात त्यांनी सायबरनेटीक्स विषयाचा अभ्यास करून त्याचा व्यवस्थापनासाठी कसा उपयोग करता येईल हे त्यांच्या Cybernetics and Management या पुस्तकात मांडले. त्या पुस्तकाचा १३ भाषांत अनुवाद झाला आणि बीअर यांना व्यवस्थापन सायबरनेटीक्स याचे जनक म्हणून जागतिक ओळख मिळाली. हे काम करत असताना त्यांनी एका सादृश्य (ॲनेलॉग) संगणकाची (stochastic analogue machine – SAM) निर्मितीदेखील केली. त्यापुढे अंकीय संगणकाचा वापर त्यांनी हाती घेतला आणि के. डी. टोचर या गणितज्ञाच्या समवेत संगणकाचा उपयोग करून व्यापकपणे कुठल्याही प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी अनुरूपण (सिम्युलेशन) तंत्राचा पाया रचला.

पुढे बीअर यांनी नोकरी सोडून सिग्मा नावाची प्रवर्तन संशोधनाबाबत सल्ला देणारी कंपनी स्थापन केली. त्या कामात त्यांना दक्षिण अमेरिकेतील चिली देशातील सार्वजनिक स्टील उद्योग तसेच चिलीच्या रेल्वे व्यवस्थेबाबत सल्ला देण्याचे कंत्राट मिळाले. त्यासोबत त्यांनी समांतरपणे बरेच सैद्धांतिक कामही केले. हे जीवनक्षम प्रतिमान (Viable Model) या नावाने प्रसिद्ध झाले. जसे हृदय आणि मेंदू शरीराला कार्यक्षम ठेवातात त्याच धर्तीवर कंपनी किंवा उद्योगाने व्यवस्था विकसित करावी हा त्या प्रारुपाचा गाभा होता. या संदर्भात Brain of the Firm आणि The Heart of Enterprise ही त्यांची गाजलेली पुस्तके प्रसिद्ध झाली. त्याचा परिणाम म्हणजे एस. जी. ॲलेंदे हे डाव्या विचारसरणीचे नेते चिली देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी बीअर यांना चिलीमधील राष्ट्रीयकृत विविध प्रणालींचे उत्पादन आणि व्यवस्थापन त्यांच्या जीवनक्षम प्रतिमान आणि इतर संकल्पनांनी साकार करण्यासाठी आमंत्रण दिले. Project Cybersyn या नावाने ओळखला जाणारा तो प्रकल्प जगातील एक अभिनव उपक्रम मानला जातो. बीअर यांनी त्यात अगदी लघु उद्योग ते राष्ट्रव्यापी उद्योग यांचा मेळ घालून व लवचिकता ठेऊन कमाल उत्पादन कसे करता येईल याची मांडणी केली. त्यासाठी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्यासाठी टेलेक्स प्रणाली वापरणे आणि माहितीचे तत्काळ विश्लेषण करण्याच्या संगणकीय पद्धती विकसित करण्यावर भर दिला. दरम्यान दुर्दैवाने चिली सैन्याने बंड पुकारुन सत्ता काबीज केली व बीअर यांच्या प्रयत्नांची अखेर झाली.

बीअर हे इंग्लंडमधील प्रवर्तन संशोधन सोसायटीचे अध्यक्ष होते. प्रवर्तन संशोधन तज्ञांची व्यावसायिक कार्यक्षमता नोंदली जावी आणि वेळोवेळी तपासली जावी असा त्यांचा आग्रह होता. ही सोसायटी त्यांच्या नावाने दर वर्षी त्यांच्या जर्नल्समध्ये प्रकाशित होणाऱ्या सर्वोत्तम लेखाला बीअर पदक प्रदान करते. कुठलीही शैक्षणिक पदवी नसलेल्या बीअर यांना संडरलँड विद्यापीठाने त्यांचे प्रसिद्ध झालेले कार्य लक्षात घेऊन १९७३ साली डीएससी. ही तिची सर्वोच पदवी दिली. त्याशिवाय जगातील अनेक ख्यातनाम विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या प्रदान केल्या. अनेक नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते अध्यक्ष तसेच सदस्य होते आणि पारितोषिकांनी गौरवले गेले होते उदा., लँकेस्टर पारितोषिक,  मॅकुले पदक  इत्यादी.

त्यांनी १२ हून अधिक पुस्तके आणि २५० हून अधिक शोधनिबंध आणि इतर लेख प्रसिद्ध केले.

प्रवर्तन संशोधन हे केवळ गणिती मर्यादेत न राहाता बहुशाखांचा वापर करून वास्तवातील समस्या सोडवण्यासाठी वापरले गेले पाहिजे याचा बीअर यांनी निरंतर पुरस्कार केला. प्रवर्तन संशोधन आणि व्यवस्थापन सायबरनेटीक्स या क्षेत्रांवर त्यांचा निर्विवादपणे अमीट ठसा आहे.

संदर्भ :

  • Andrew, A. 1993. Stafford Beer — personal reminiscences and reflections. Kybernetes. 22(6) 60-73.
  • Beer, S. 1962. Towards the cybernetic factory. H. Foerster, G. Zopf, eds. Principles of Self-Organization. Pergammon Press, Oxford. 25-89.
  • Beer, S. 1984. The Viable System Model: its provenance, development, methodology and pathology. Journal of the Operational Research Society 35(2) 7-26.
  • Capey, R. 1996. Interview with Stafford Beer. Operational Research Society Archive (MSS.335), Modern Records Centre, University of Warwick, Coventry, December 10.

 समीक्षक : विवेक पाटकर