मोर्स, फिलीप एम. : (६ ऑगस्ट, १९०३ ते ५ सप्टेंबर, १९८५) अमेरिकेतल्या लुझियाना राज्यातील श्रेव्ह्पोर्ट या शहरात फिलीप एम. मोर्स यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण ओहायो राज्यातील क्लिव्हलॅन्ड येथील लेकवूड शाळेत झाले. त्यांनी अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व विद्यापीठातून भौतिकशास्त्रात बीएस पदवी मिळवली. त्यानंतर प्रिन्स्टन विद्यापीठातून एम.ए. आणि कार्ल टेलर कॉमटन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ए थिअरी ऑफ द इलेक्ट्रिक डिस्चार्ज थ्रू गॅसेस’ या प्रबंधावर पीएच्.डी. पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी मॅसेचुसेटस् इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलजी (एमआयटी) मध्ये अध्यापन सुरू केले.
मोर्स यांनी लेखन किंवा सहलेखन केलेली भौतिकशास्त्रातील प्रसिद्ध पुस्तके अशी आहेत: Quantum Mechanics, Methods of Theoretical Physics , Vibration and Sound, Theoretical Acoustics, आणि Thermal Physics. त्याशिवाय ते Annals of Physics या जर्नलचे एक संस्थापक संपादक होते. कंपन वर्णपटाचा (Vibration Spectrum) अर्थ लावण्यासाठी त्यांनी एक मापन तंत्र विकसित केले, जे ‘मोर्स पोटेन्शियल फंक्शन’ या नावाने ओळखले जाते.
मोर्स यांचे कंपन या विषयातील कार्य लक्षात घेऊन दुसऱ्या महायुद्धात अमेरिका उतरल्यावर तिच्या नौसेनेने तिला भेडसावत असलेल्या काही कळीच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांना पाचारण केले. सर्व प्रथम जर्मन पाणबुडी विरुद्ध रणनीती ठरवण्यासाठी मोर्स यांनी एक गट तयार केला आणि त्यात विविध विषयांतील तज्ञ एकत्र केले, कारण अशा प्रश्नांचे विविध पैलू तपासून त्या सगळ्यांना समर्पक असे उत्तर शोधणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या गटाला Anti-Submarine Warfare Operations Research Group (ASWORG) असे नाव दिले गेले. मोर्स यांनी सोनार या ध्वनीतरंगाचा वापर करून पाणबुडी शोधणे हे तंत्र अधिक प्रभावीपणे कसे वापरता येईल यादृष्टीने विचार सुरु केला. तरी यासंबधात त्यांनी त्यांच्या गटाचे एक महत्त्वपूर्ण सदस्य जॉर्ज इ. किंबल यांच्यासोबत सोबत जर्मन यू-बोट या पाणबुडींच्या हालचालींचा अभ्यास करून एक गणिती प्रारूप तयार केले, जे ‘मोर्स अँड किंबल यु बोट सर्क्युलेशन मॉडेल’ या नावाने ओळखले जाते. त्याच्या वापराने अमेरिकन नौसेनेला अटलांटिक महासागरात कार्यरत जर्मन यू-बोट पाणबुडींच्या संख्यांचा विश्वसनीय अंदाज मिळाला. तसेच शत्रूच्या पाणबुडी नष्ट करण्याचा दर पाच पटीने वाढला. पुढे या दोघांनी मेथडस ऑफ ऑपरेशन्स रिसर्च हे पुस्तक लिहिले. ते महायुद्धानंतर उद्योग आणि नागरी क्षेत्रांत प्रवर्तन संशोधन कसे वापरता येईल याचे मार्गदर्शन करणारे महत्त्वाचे पुस्तक ठरले.
दुसरे महायुद्ध संपल्यावर मोर्स एमआयटीत परतल्यावरही त्यांनी प्रवर्तन संशोधन हा एक स्वतंत्र विषय म्हणून प्रस्थापित करून तो शिक्षण, संशोधन आणि उपयोजन यामार्गे पुढे नेण्याचे प्रयत्न नेटाने सुरू ठेवले. त्यांनी एमआयटीमध्ये प्रवर्तन संशोधन केंद्र उभारले जेथून जॉन डी. सी. लिटल यांना प्रवर्तन संशोधनात पहिली पीएच्.डी. पदवी प्राप्त करण्याचा मान मिळाला. त्याशिवाय मोर्स यांनी संगणकाचे महत्त्व ओळखून एमआयटी संगणन केंद्र उभारले आणि त्याची धुरा त्यांनी संचालक म्हणून सांभाळली.
मोर्स यांचा रोख प्रवर्तन संशोधनाचे उपयोजन यावर अधिक राहिला. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी एमआयटीच्या सर्व ग्रंथालयांतील विविध प्रक्रिया अधिक गतिमान आणि इष्टतम पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रवर्तन संशोधनातील विविध तंत्रे वापरून सुचवलेले बदल. यावर आधारित त्यांचे लायब्ररी इफेक्टिव्हनेस: ए सिस्टिम्स ॲप्रोच हे पुस्तक प्रसिद्ध झाले. ते आजदेखील संदर्भ म्हणून वापरले जाते. या कार्यासाठी मोर्स यांना अमेरिकेन प्रवर्तन संशोधन सोसायटीने तिचे अतिशय मानाचे फ्रेड लँकेस्टर पारितोषिक प्रदान केले. त्याशिवाय क्यूज, इन्व्हेन्टोरीज अँड मेंटेनन्स हे त्यांचे दुसरे गाजलेले पुस्तक आहे. त्यात प्रवर्तन संशोधनाची अनेक तंत्रे प्रत्यक्षात वापरण्याबद्दल चर्चा केली आहे. तसेच अनेक खाजगी उद्योगांना त्यांनी प्रवर्तन संशोधनाचा वापर करून कार्यक्षमता वाढवण्याबाबत सल्लागार म्हणून भूमिका पार पाडली आहे.
अमेरिकेन प्रवर्तन संशोधन सोसायटीची स्थापना करण्यात मोर्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते तिचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले. पुढे त्यांनी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑपरेशनल रिसर्च सोसायटीज ही जागतिक शिखर संस्था विकसनशील देशांत प्रवर्तन संशोधनाचे उपयोजन करण्यात कशी मदत करू शकते याबाबत प्रयत्न केले. मोर्स यांचे भौतिकशास्त्र आणि प्रवर्तन संशोधन या दोन्ही विषयांत विपुल पुस्तके, शोधलेख आणि अन्य साहित्य उपलब्ध आहे.
मोर्स यांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले. त्यात अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांच्या दुसऱ्या महायुद्धात केलेल्या कार्याबद्दल दिलेले गुणवत्ता प्रशस्तीपत्र, अमेरिकेच्या प्रतिष्ठित नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासदपद, त्यांनी ॲकॉस्टिकल सोसायटी ऑफ अमेरिका (एएसए) आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स या संस्थांचे भूषवलेले अध्यक्षपद, एएसए संस्थेचे कंपन या विषयावरील कामासाठी दिलेले सुवर्ण पदक, प्रवर्तन संशोधनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अमेरिकेन प्रवर्तन संशोधन सोसायटीचे जॉर्ज इ. किम्बल पदक इत्यादी होत.
मोर्स यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुयोग्य व्यक्तीस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स रिसर्च अँड द मॅनेजमेंट सायन्सेस ही संस्था एक वर्षाआड दोन वर्षांसाठी फिलीप एम. मोर्स अध्यापन शिष्यवृत्ती देत आलेली आहे.
संदर्भ :
- Kimball G. E. & Morse P. M. Methods of Operations Research. New York: John Wiley & Sons, 1951.
- P. M. Library effectiveness: a systems approach. Cambridge, MA.: MIT Press, 1968.
- https://www.informs.org/Explore/History-of-O.R.-Excellence/Biographical-Profiles/Morse-Philip-M
- Feshback,Philip McCord Morse, 1903-1985. National Academy of Sciences: Washington D.C., 1994.
- Little, D. C., “IFORS’ Operational Research Hall of Fame: Philip McCord Morse.” International Transactions in Operations Research 10 (3), 2003: 307-309.
समीक्षक : विवेक पाटकर