ऑपरेशनल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (स्थापना – १९५७) दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाचे लष्करी प्रश्न सोडण्यासाठी विशेष गट इंग्लंड आणि अमेरिकेच्या संरक्षण खात्यांनी स्थापन केले ज्यांना क्रमश: ऑपरेशनल आणि ऑपरेशनस रिसर्च ग्रुप असे नाव दिले गेले होते. त्या बहुशाखीय गटांनी अभिनव प्रारूपे आणि पद्धती विकसित करून युद्ध व सैनिकी समस्या सोडवण्यात भरघोस योगदान केले. महायुद्धानंतर त्या तंत्रांचा वापर गैरलष्करी कार्यांत करणे उपयुक्त ठरले. त्यामुळे प्रवर्तन संशोधन (ऑपरेशनल रिसर्च) या विषयाचा इंग्लंड, अमेरिका आणि अन्य विकसित देशांत विकास होत गेला आणि या विषयाला वाहिलेल्या संस्था १९५० च्या दशकात त्या त्या देशात स्थापल्या गेल्या. या विषयाचे महत्त्व ओळखून भारतात प्रवर्तन संशोधन (ऑपरेशनल रिसर्च) या विषयाचा सैद्धांतिक विकास, प्रसार आणि उपयोजन करण्यासाठी ऑपरेशनल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (ओआरएसआय) या संस्थेची स्थापन दिल्ली येथे १९५७ साली झाली. भारतात सांख्यिकी विषयाची मुहूर्तमेढ रचणारे आणि त्यावेळी राष्ट्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस हे तिचे पहिले अध्यक्ष होते. पुढे तिचे मुख्य कार्यालय कोलकताला स्थलांतरित झाले.

सध्या देशभरात ओआरएसआयचे १७ विभाग कार्यरत आहेत. हे विभाग वेळोवेळी व्याख्याने, परिसंवाद, परिषदा तसेच आभासी पद्धतीने तज्ञांची व्याख्याने आयोजित करून सभासदांना प्रवर्तन संशोधनातील नव्या घडामोडी तसेच उपयोजन याबाबत मार्गदर्शन करतात. संस्थेचे कार्य संचालन केंद्रीय समिती करते. तिचे सदस्य संस्थेच्या घटनेप्रमाणे विभागांतील पदाधिकाऱ्यांतून तीन वर्षासाठी निवडले जातात.

प्रवर्तन संशोधन विषयात रस असलेली आणि स्नातक पदवीप्राप्त कुठलीही व्यक्ती विहित अर्ज आणि शुल्क भरून ओआरएसआयचे साधारण सभासद होऊ शकते. आजीव सभासद, वरिष्ठ सभासद आणि अधिच्छात्र सभासद (फेलो) अशा अतिरिक्त सभासद श्रेणी उपलब्ध आहेत मात्र त्यासाठी विशिष्ट पात्रता अनिवार्य आहे. त्याशिवाय कमी शुल्क असलेली विद्यार्थी सभासद श्रेणीदेखील उपलब्ध आहे. कंपन्या आणि अन्य संस्थादेखील या सोसायटीच्या सभासद होऊ शकतात.

भारतात प्रवर्तन संशोधनाचा उपयोग भारतीय रेल्वे, स्टील उद्योग, बँकिंग क्षेत्र, नगर नियोजन आणि परिवहन क्षेत्र यात खास करून झालेला आहे. तसेच देशातील प्रमुख हॉटेल्स आणि विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी प्रवर्तन संशोधनाची प्रारूपे त्यांचे सेवादर किंवा भाडे गतिमान पद्धतीने ठरवण्यास वापरली आहेत. भारतीय सैन्य दलांशिवाय अनेक सल्लागार कंपन्यांत प्रवर्तन संशोधन विशेषतज्ञ मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. या सर्व उपयोजनांत ओआरएसआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हातभार लावत आलेली आहे.

सोसायटीने १९७३ पासून प्रवर्तन संशोधनाचा स्नातक पदविका पाठ्यक्रम (Graduate Diploma in Operational Research) चालवणे सुरू केले. या पाठ्यक्रमाला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची  मान्यता आहे. हा पाठ्यक्रम दोन वर्षांचा असून दूरस्थ-शिक्षण माध्यम या पद्धतीने राबवला जातो. त्यामुळे प्रवर्तन संशोधनात रस असलेल्या स्नातक पदवी प्राप्त व्यक्तीला दुसरे काम सांभाळूनदेखील त्याचे शिक्षण घेता येते.

ओआरएसआय १९६४ पासून नियमितपणे स्वत:चे ‘ऑपसर्च’ (OPSEARCH) नावाचे जर्नल प्रकाशित करत आलेली आहे. या त्रैमासिक जर्नलचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावाजलेला आहे.  ओआरएसआय १९६८ पासून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर देशाच्या विविध भागात परिषद भरवत आलेली आहे. त्याशिवाय स्वत: किंवा संयुक्तरित्या इतर संस्थांसोबत आंतरराष्ट्रीय परिषदा आणि परिसंवाद घडवत असते. १९९२ साली तिचा रौप्यमहोत्सव आणि २०१७ साली हीरकमहोत्सव साजरा करण्यासाठी सोसायटीने खास आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या होत्या. ही संस्था १९५९ पासून प्रवर्तन संशोधन सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या शिखर संस्थेची  म्हणजे International Federation of Operational Research Societies (IFORS) आणि १९८५ पासून आशिया पॅसिफिक क्षेत्रातील प्रवर्तन संशोधन सोसायटी यांच्या संघटनेची (Asia Pacific Operational Research Societies (APORS) सभासद आहे. ओआरएसआयतर्फे दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. ते तिच्या वार्षिक परिषदेत प्रदान केले जातात. अ) प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबीस पुरस्कार – १) प्रवर्तन संशोधन/गणित/संख्याशास्त्र किंवा इतर विज्ञानशाखा, २) अभियांत्रिकी आणि ३) व्यस्थापनशास्त्र या तीन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीला      आ) प्राध्यापक एम. सी. पुरी पुरस्कार – भारतात प्रवर्तन संशोधन विषयाचा लक्षणीय प्रसार केलेल्या एका व्यक्तीला    इ) एम. एन. गोपालन पुरस्कार – प्रवर्तन संशोधन या विषयात सर्वोत्तम पीएच्.डी. प्रबंध सादर केलेल्या एका व्यक्तीला     ई) एन. के. जयस्वाल स्मृती पुरस्कार – वार्षिक परिषदेत सर्वोत्तम सैद्धांतिक शोधलेख सादर करणाऱ्या एका व्यक्तीला    ए) बी. जी. राघवेंद्र स्मृती पुरस्कार – हे दोन पुरस्कार असून त्यातील एक पुरस्कार वार्षिक परिषदेत सादर केलेल्या सर्वोत्तम उपयोजन असलेला शोधलेख सादर करणाऱ्या एका व्यक्तीला आणि दुसरा पुरस्कार वार्षिक परिषदेत सर्वोत्तम शोधलेख सादर करणाऱ्या एका विद्यार्थ्यास दिला जातो    ऐ) पी. आर. एस. रेड्डी पुरस्कार – वार्षिक परिषदेत विशेष व्याख्यान देण्यासाठी निवडलेल्या एका व्यक्तीला

डेटा सायन्स या उभारून येत असलेल्या क्षेत्रात प्रवर्तन संशोधनाची प्रारूपे आणि पद्धती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या विषयात शिक्षित आणि प्रशिक्षित व्यक्तींची मागणी भविष्यात वाढणार आहे. तरी ओआरएसआय त्यादृष्टीने अनेक उपक्रम हाती घेत आहे.

संकेतस्थळ : https://orsihq.org/

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर