एक प्रचलित चित्रपट विधा (genre). या प्रकारातील दृक्-श्राव्य कलाकृतीचे पहिले ज्ञात उदाहरण म्हणजे जॉर्ज मेलिएस् या फ्रेंच चित्रपट दिग्दर्शकाचा इंग्रजीत द हॉन्टेड कॅसल (१८९६) या नावाने प्रसिद्ध असलेला अडीच मिनिटांचा लघुपट. भयपट या विधेतील चित्रपटांचा मुख्य उद्देश हा प्रेक्षकांच्या मनामध्ये भयाची भावना निर्माण करणे हा असतो. प्रेक्षकांच्या मनात भयाच्या भावनेसह दु:स्वप्ने, दहशत आणि धास्ती, अज्ञाताची भीती इत्यादी भावना जागृत केल्या जातात. भयपटांमधील कथानकात सर्वसामान्यपणे वाईट शक्ती, अभद्र घटना किंवा अभद्र व्यक्तिरेखा नायकाच्या विश्वात आगंतुक म्हणून येतात. कथानकावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांमध्ये भूत, पिशाच्च, परकीय शक्ती, काळी जादू, दृष्ट शक्ती, अक्राळविक्राळ प्राणी असतो.

चित्रपट या दृक्-श्राव्य कलेने जशी सुरुवातीच्या काळात आपली मुळे साहित्य, चित्रकला, नाटक या कलांकडून घेतली तसेच भयपटाबाबत घडले. १९१० च्या दशकात काही भयपटांची निर्मिती झाली असली, तरी अनेक चित्रपट समीक्षक आणि इतिहासकारांच्या मते रॉबर्ट वाइ याने दिग्दर्शित केलेला द कॅबिनेट ऑफ डॉ. कॅलिगरी (१९२०) हा जर्मन चित्रपट म्हणजे सर्वार्थाने पहिला पूर्ण लांबीचा भयपट होय. याला ‘जर्मन अभिव्यक्तिवादी चित्रपट चळवळी’तील (जर्मन एक्स्प्रेशनिस्ट सिनेमा) महत्त्वाच्या कलाकृतींपैकी एक मानले जाते. याच चळवळीतून पुढे नोसफेरातू (१९२२) या व्हॅम्पायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्तपिपासू निशाचर जीवावरील पहिल्या चित्रपटाची निर्मिती झाली. नोसफेरातू हा चित्रपट म्हणजे ‘ड्रॅक्युला’ची अनधिकृत आवृत्ती. या चित्रपट प्रवाहाने पुढे जाऊन भयपट विधेत निर्माण होणाऱ्या अनेक कलाकृती आणि अमेरिकन लोकांच्या भयपटांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकला असे म्हणता येईल. १९२० च्या दशकात जर्मन आणि अमेरिकन चित्रपटकर्त्यांनी भयपट या विधेत बरंचसे काम केले असले तरी फ्रेंच, स्वीडिश आणि डॅनिश चित्रपटकर्त्यांनी देखील या काळात या विधेत काम केले आहे.

सुरुवातीच्या काळातील भयपटांचे उगमस्थान एडगर ॲलन पो, मेरी शेली यांसारख्या भयकथांकरिता लोकप्रिय असलेल्या साहित्यिकांच्या साहित्यात आढळते. नंतर चित्रपटांमधून ज्या राक्षस, अक्राळविक्राळ प्राणी आणि असुरांची निर्मिती झाली त्यामध्ये एडगर पोच्या साहित्यातील व्यक्तिरेखा, शेलीने निर्माण केलेला ‘फ्रँकेस्टाईन’ हा राक्षस अशा व्यक्तिरेखांचा समावेश होतो. मूक चित्रपटांची निर्मिती होत असलेल्या काळातील लघुपट, तांत्रिक करामतींचा वापर करून निर्माण केलेल्या कलाकृती, पुढे जाऊन रंगीत चित्रपटांच्या निर्मितीला सुरुवात झाल्यानंतर वापरलेल्या तांत्रिक युक्त्या अशा प्रकारचा प्रवास भयपटांनी केला.

१९३० च्या दशकात ‘युनिव्हर्सल पिक्चर्स’ या अमेरिकन चित्रपट निर्मितीसंस्थेने भयपट या विधेत अनेक चित्रपटांची निर्मिती करीत या प्रकाराला आपली मक्तेदारी बनवली. या दशकात या संस्थेने केलेले हे काम ‘क्लासिक युनिव्हर्सल मॉन्स्टर्स’ या नावाने प्रचलित आहे. गॉथिक साहित्य आणि देशीविदेशी संकल्पनांवर आधारित असलेल्या फ्रँकेस्टाईन, ड्रॅक्युला, ममी, द इनव्हिजिबल मॅन अशा जीवांवरील चित्रपटांची निर्मिती ‘युनिव्हर्सल पिक्चर्स’ने केली. या दशकानंतर लोकप्रिय भयपटांमधल्या जीवांवरील चित्रपटांचे पुढील भाग येण्यास सुरुवात झाली. १९४०-५० च्या दशकांमध्ये भयपट या मुख्य विधेसोबत विज्ञानपट, थरारपट, अलौकिक कल्पित चित्रपट या उपप्रकारांची सरमिसळ होऊन या विधेतील उपप्रकारांची निर्मिती होण्यास सुरुवात झाली. कर्ट न्यूमन दिग्दर्शित द फ्लाय (१९५८) हा वैज्ञानिक भयपट, मायकल पॉवेल कृत पीपिंग टॉम (१९६०) आणि आल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित सायको (१९६०) हे मानसशास्त्रीय भयपट हे या विधेतल्या उपप्रकारांतील चित्रपटांची उदाहरणे होत. याखेरीज भयपटांचे विडंबन करणारे किंवा या विधेतील कथनशैली विनोदी अंगाने मांडणाऱ्या विनोदी भयपटांचा उपप्रकारदेखील अस्तित्त्वात आला.

पीपिंग टॉम आणि सायकोमुळे स्लॅशर चित्रपट या एका महत्त्वाच्या उपप्रकाराच्या निर्मितीची मुळे रोवली गेली. यातूनच आधुनिक भयपटांच्या निर्मितीस सुरुवात झाली. वर्णात्मक हिंसा, रक्तपात, त्रासदायक दृश्ये आणि कथनशैली, प्रेक्षकास मानसशास्त्रीय स्तरावर प्रभावित करणारी दृश्यरचना इत्यादींचा समावेश या उपप्रकारातील चित्रपटांमध्ये होतो. १९७० आणि १९८० च्या दशकात जॉन कार्पेन्टरचा हॅलोविन, शॉन कनिंगहॅम दिग्दर्शित फ्रायडे द थर्टीन्थ, वेस क्रेवन दिग्दर्शित अ नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट  इत्यादी स्लॅशर भयपटांची निर्मिती झाली. यातील बऱ्याचशा कलाकृतींच्या नवनवीन आवृत्त्या आजही तयार होतात. जॉन कार्पेन्टर, जॉर्ज ए. रोमेरो, डेव्हीड क्रोननबर्ग हे काही महत्त्वाच्या आधुनिक भयपट दिग्दर्शकांमध्ये मोडतात. जॉर्ज ए. रोमिरोने आधुनिक भयपटांमध्ये ‘झॉम्बी’ (मृत्यूनंतरही कायिक पातळीवर सजीव राहणारे आणि मानवी रक्त तसेच मांसाची प्रबळ भूक असलेले – बहुतांशी वेळा – मानवी जीव) या जीवाला महत्त्व प्राप्त करून दिले.

ऐंशी आणि नव्वदोत्तर दशकांमध्ये आजही स्लॅशर चित्रपटांची लोकप्रियता टिकून आहे. याच प्रकाराचे विस्तारलेले रूप अतिशयोक्तीपूर्ण हिंसा असलेल्या सॉ, होस्टेल आणि द कलेक्टर या नावांनी लोकप्रिय असलेल्या चित्रपटांच्या मालिकांमध्ये पाहायला मिळतात. दरम्यानच्या काळात झॉम्बी आणि स्लॅशर चित्रपटांखेरीज ‘फाउण्ड फुटेज’ आणि भुताखेतांशी निगडित घडामोडी असलेल्या पॅरानॉर्मल कृतींवर आधारलेल्या चित्रपटांना समकालीन भयपटांमध्ये महत्त्व आले आहे.

दरम्यानच्या काळात भयपटांची व्याख्याही बदलली आहे. कारण, भयपटांचा संबंध हा नुसत्या काल्पनिकतेशी न उरता त्यात वास्तववादाने शिरकाव केला. परिणामी वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या भय उत्पन्न करणाऱ्या संकल्पनांचा विचार भयपट निर्माण करत असताना होऊ लागला. याखेरीज भयपटांची मांडणी करीत असताना त्यात प्रतीकात्मकतेचा समावेश केला जाऊ लागला. त्यातून भयाला नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक कंगोरे प्राप्त होऊ लागले. भयपटांनी वंशद्वेष, लोभ, लालसा, वसाहतवाद, इत्यादी गोष्टींकरिता रुपकांची निर्मिती करत भयाविष्कार केला. ज्यामुळे भयाच्या आणि भयपटांच्या पारंपरिक साच्यापेक्षा नवीन मांडणी दिसू लागली आहे. जेम्स वान, ॲरी ॲस्टर, जॉर्डन पील हे अमेरिकन चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेले महत्त्वाचे दिग्दर्शक आहेत. अमेरिकेत ‘ब्लमहाऊस प्रॉडक्शन्स’सारख्या भयपटांच्या निर्मितीवर भर देणाऱ्या निर्मिती संस्था अस्तित्त्वात आहेत. चीन, दक्षिण कोरिया इत्यादी आशियाई देशांमध्ये काही महत्त्वाच्या भयपटांची निर्मिती झाली आहे.

भारतातील भयपट :

जगभरात या विधेत ज्या संकल्पना हाताळल्या जातात, त्या संकल्पना भारतात निर्माण होणाऱ्या भयपटांमध्येही दिसतात. मात्र, भारतातील चित्रपटकर्त्यांचा भर हा मुख्यत्वे भूतपिशाच्च, झपाटलेली माणसे आणि घरे, चांगल्या-वाईट शक्तींमधील संघर्ष या संकल्पनांवर असतो. हिंसेला स्थान असणाऱ्या स्लॅशर चित्रपटांच्या धर्तीवरील चित्रपटांचा भारतीय भयपटांत अभाव आहे.

कमाल अमरोही यांचा महल (१९४९) हा हिंदी भाषिक चित्रपट भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भयपट म्हणून प्रचलित आहे. बंगालीतील कंकाल (१९५०), मलयाळममध्ये भार्गवी नीलायम (१९६४) हे प्रादेशिक भाषांमधील सुरुवातीच्या काळातील चित्रपट. त्यानंतरच्या काळातील गुमनाम आणि भूत बंगला (१९६५) हे ही प्रसिद्ध आहेत. याच काळात पाश्चिमात्य कलाकृतींपासून प्रेरणा घेणाऱ्या काही चित्रपटांची निर्मिती झाली. ज्यांपैकी बिरेन नाग दिग्दर्शित दोन चित्रपट बीस साल बाद (१९६२) आणि कोहरा (१९६४) हे अनुक्रमे द हाउन्ड ऑफ द बास्करविल्स आणि रिबेका या कलाकृतींवर बेतलेले आहेत. तर, राज खोसला दिग्दर्शित वह कौन थी? (१९६४) हा चित्रपट वुमन इन व्हाईट यावर बेतलेला होता.

सत्तरच्या दशकात रामसे बंधूंनी भयपटांच्या निर्मितीस सुरुवात केली. जी पुढे २००० च्या दशकापर्यंत सुरू राहिली. दो गज जमीन के नीचे (१९७२), दरवाजा (१९७८), और कौन? (१९७९), पुराना मंदिर (१९८४), वीराना (१९८५), तहखाना (१९८६), पुरानी हवेली (१९८९), बंद दरवाजा (१९९०) इत्यादी चित्रपट प्रसिद्ध आहेत. रामसे बंधूंच्या चित्रपटांखेरीज राजकुमार कोहली या दिग्दर्शकाचे नागीण (१९७६) आणि जानी दुश्मन (१९७९) हे दोन भयपट भारतीय चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाच्या आणि लोकप्रिय कलाकृतींमध्ये मोडतात.

नव्वदोत्तर कालखंडात राम गोपाल वर्मा दिग्दर्शित रात (१९९२), भूत (२००३), वास्तू शास्त्र (२००४) तसेच विक्रम भट दिग्दर्शित राज (२००२), हॉन्टेड (२०११) इत्यादी चित्रपट लोकप्रिय भयपट ठरले. भूत या भयपटाने चित्रपटात मोठी हवेली, तळघर आणि एकूणच घराच्या भूगोलाचे अस्तित्व असायला हवे, हे गृहीतक मोडीत काढले. रागिणी एमएमएस (२०११) हा फाउण्ड फुटेज प्रकारातील चित्रपटदेखील या काळात प्रसिद्ध झाला. विनोदी भयपटांमध्ये राज निदीमोरू आणि कृष्णा डी. के. या चित्रपट दिग्दर्शक द्वयीचे गो गोवा गॉन (२०१३) आणि स्त्री (२०१८) हे हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत.

भयपट या मुख्य चित्रपट विधेचे काही प्रमुख उपप्रकार :

१. मानसशास्त्रीय भयपट – यात आशयसूत्रामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोन, परकीय शक्ती किंवा जीवांपेक्षा मानवी मन, मेंदू यांच्या प्रभावातून निर्माण होणाऱ्या भयनिर्मितीवर भर दिला जातो.

२. स्लॅशर भयपट – रक्तपात, अतिशयोक्तीपूर्ण आणि वर्णात्मक हिंसा, इत्यादी घटकांचं अस्तित्त्व या प्रकारच्या भयपटांमध्ये असतं.

३. वैज्ञानिक भयपट – वैज्ञानिक संकल्पना, नवकल्पना आणि आविष्कार या प्रकारच्या भयपटांच्या आशयसूत्रात महत्त्वाचे ठरतात.

४.फाउण्ड फुटेज भयपट  – एखादी दृक्-श्राव्य चित्रफीत सहजपणे सापडली आहे, अशा प्रकारचा आभास निर्माण करून अशा चित्रफितीच्या आधारे कथानक उलगडत नेलं जातं.

५. गॉथिक भयपट – अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील गॉथिक संस्कृती, साहित्य, अलौकिक शक्ती, घटना, इत्यादींपासून प्रेरणा घेणारे घटक वापरून निर्माण केलेले भयपट.

६. विनोदी भयपट – भय आणि विनोद या विरोधाभासी संकल्पनांचे सहअस्तित्त्व या प्रकारात आढळते. बहुतांशी वेळा भयपट या प्रकारातील चित्रपटांचे, त्यातील कथनशैलीचं विडंबन करणे, हा अशा चित्रपटांचा उद्देश असतो.

७. लोककथांवर आधारित भयपट – स्थानिक स्तरावरील प्रचलित भयकथा तसेच सांस्कृतिक, प्रादेशिकदृष्ट्या विशिष्ट अशा संदर्भांवर आधारित भय निर्माण करणाऱ्या लोककथांवर आधारलेले चित्रपट.

समीक्षक : गणेश मतकरी