(सिंघाला). एक लोकप्रिय खाद्यमासा. शिंगाळ्याचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या ब्रॅगिडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव मिस्टस सिंघाला आहे. हा मासा अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, भारत या देशांतील गोड्या पाण्यात आढळतो. भारतात गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा, कोयना या ऩद्यांमध्ये तसेच सरोवरे, तलाव, पाणथळ जागा, धरणाचे जलाशय यांत तो दिसून येतो.

शिंगाळा (मिस्टस सिंघाला)

शिंगाळ्याची लांबी ४०–१५० सेंमी. असते. त्याचे वजन सु. ११ किग्रॅ. असते. शरीराचा रंग वरच्या बाजूला तपकिरी, खालच्या बाजूला काळा आणि दोन्ही कडांना रुपेरी असतो. पृष्ठपर दोन आणि मांसल असतात; बुडाकडील पृष्ठपराच्या मागच्या टोकावर काळा वर्तुळाकार ठिपका असतो. अधरपर आखूड असतो. पुच्छपर विभागलेला असतो. मुखगुहेतील टाळूवर आणि जबड्यांवर दात असतात. शिंगाळ्याला मुखाभोवती स्पृशांच्या चार जोड्या असतात. या स्पृशा अथवा मिशा मांजराच्या मिशांसारख्या दिसतात. म्हणून या माशांना ‘मार्जारमीन’ (कॅटफिश) हे नाव पडले आहे. हा मासा प्रजननक्षम होतो, तेव्हा त्याच्या शरीराची लांबी सु. ४६ सेंमी. असते. खेकडे, कोळंबी इत्यादी संधिपाद प्राणी त्यांचे खाद्य असते. यांशिवाय चिखलात सापडणारे कीटक, मृदुकाय प्राणी यांचाही ते अन्न म्हणून उपयोग करतात.

शिंगाळ्याची वीण साधारणतः एप्रिल ते जून महिन्यात होते. वाळुयुक्त गाळात खडकाजवळ ४०–५० सेंमी. खोलीवर ते घरटे करतात. विणीच्या हंगामात एका वेळेला सु. १०० अंडी घातली जातात. नर अंडी उबवतो आणि पिलांची काळजी घेतो.

सायप्रिनिफॉर्मिस गणाच्या टॅचिसुरिडी कुलातील माशांनाही शिंगाळा म्हणतात, परंतु हे मासे समुद्री आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला मोठ्या प्रमाणावर टॅचिसुरिडी कुलातील टॅचिसुरस सोना जातीचे मासे आढळतात. त्यांच्यातही वाताशय असतो. मार्जारमीनांसारख्या माशांच्या वाताशयाचे तुकडे करून ते वाळवितात व त्यांपासून मिळविलेल्या पदार्थाला ‘आयसिंग ग्लास’ म्हणतात. आयसिंग ग्लासचा वापर शिर्का (व्हिनेगार) तसेच मद्ये (बीर, वाइन) नितळ करण्यासाठी होतो.