भोसले, केशवराव : (९ ऑगस्ट १८९० – ४ ऑक्टोबर १९२१). मराठी संगीत रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध गायक नट. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलराव व आईचे नाव जनाबाई होते. त्यांचे वडील वैद्यकी करीत. या दांपत्यास दत्तात्रय, केशव, नारायण ही मुले व सर्वांत लहान एक मुलगी होती. केशवराव चार-पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील निवर्तले. त्यामुळे त्यांच्या आईवर घरची जबाबदारी पडली. परिस्थितीमुळे केशवरावांना शालेय शिक्षण घेता आले नाही. त्यांची आई ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’त स्वयंपाकाचे काम करीत असे. दत्तात्रय व केशव हे दोघे त्यांच्याबरोबर असत. ही मुलेही तेथे वरकाम करीत. दोनही मुले तिथल्या वातावरणात रंगून गेली. त्यायोगे केशवरावांच्या मनात नाट्यकलेचे बीज पेरले गेले व त्यातूनच त्यांच्या पुढील जीवनाची दिशा ठरली. नाटक मंडळीचे चालक जनुभाऊ निमकर यांसारख्या कुशल नाट्यदिग्दर्शकाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्याच काळात दत्तोपंत जांभेकरबुवा यांच्याकडून केशवरावांना शास्त्रीय संगीताची तालीमही मिळाली.

सुरुवातीस केशवरावांना नाटकांतून बालकलाकार म्हणून किंवा स्त्री पात्राच्या लहानसहान भूमिका मिळत असत. पण लवकरच त्यांना गोविंद बल्लाळ देवल यांच्या शारदा  या नाटकात शारदेची भूमिका करण्याची संधी मिळाली (१९०२). ही त्यांची भूमिका इतकी उत्कृष्ट वठली की एका रात्रीत या मुलाचे नाव सर्वतोमुखी झाले. यानंतर त्यांनी सौभद्र, मृच्छकटिक  इत्यादी नाटकांतही सुभद्रा, वसंतसेना या भूमिका केल्या. त्याही खूप गाजल्या. १९०७ साली त्यांनी स्वदेश हितचिंतक ही नाटक मंडळी सोडली आणि १ जानेवारी १९०८ रोजी हुबळी येथे ‘ललितकलादर्श संगीत नाटक मंडळी’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. त्याकाळी मराठी नाट्यसंस्था आपल्या जाहिरातींमध्ये त्यांना आश्रय देणाऱ्या संस्थानिकांचा उल्लेख करीत; परंतु केशवरावांनी मात्र ललितकलादर्श या आपल्या संस्थेचा उल्लेख ‘लोकाश्रयाखालील संस्था’ असा केला होता. नाटकाची निवड करताना ते लोकशिक्षणाचा हेतूही डोळ्यापुढे ठेवत. सुरुवातीस ही नाटक मंडळी शारदा, सौभद्र  वगैरे जुनी नाटके करीत असे; परंतु पुढे केशवरावांनी रामचंद्र आत्माराम दोंदे यांचे मदालसा आणि हिराबाई पेडणेकरांचे दामिनी  ही दोन नवी संगीत नाटके प्रेक्षकांसमोर आणली. या नाटकांना हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यांनी वीर वामनराव जोशी यांच्याकडून राक्षसी महत्त्वाकांक्षा  हे नाटक लिहून घेतले. जोमदार संवाद, कर्णमधुर संगीत आणि नावीन्यपूर्ण देखावे यांमुळे हे नाटक त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाले. यात केशवरावांनी मृणालिनी या स्त्री पात्राची भूमिका केली. यास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

केशवराव भोसले यांचे स्त्री व्यक्तिरेखेतील एक छायाचित्र

या नाटकाचे मुंबईतील प्रयोग झाल्यानंतर केशवरावांच्या स्नेह्यांनी व चाहत्यांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांना थैली अर्पण केली. ही थैली केशवरावांनी कृतज्ञतापूर्वक त्यांचे नाट्यगुरू दत्तोपंत जांभेकर यांना अर्पण केली (१९१३). याच साली गॅझेट ऑफ इंडियाचे संपादक गोर्डन यांनी केशवरावांचा महावस्त्र देऊन गौरव केला होता. या काळात त्यांनी गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून गाण्याची दीक्षा घेतली व गायनकलेतही प्रावीण्य मिळविले. कालांतराने त्यांनी स्त्री भूमिका सोडून पुरुषभूमिका करण्यास सुरुवात केली. १९१५ मध्ये त्यांनी संगीत मानापमान  या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत केला. या नाटकात त्यांनी धैर्यधराची तडफदार भूमिका केली. त्यातील त्यांची पदे त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाली. पुढे मामा वरेरकर लिखित हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार  (१९१९) ही दोन सामाजिक नाटके केशवरावांनी रंगभूमीवर आणली. हाच मुलाचा बाप  या नाटकाचा विषय हुंडाप्रथा हा होता. तर संन्याशाचा संसार  या नाटकाचा विषय धर्मांतर हा होता. यात डेव्हिडची भूमिका केशवरावांनी केली होती. नारायण ऊर्फ आप्पासाहेब टिपणीस यांचे शहाशिवाजी (१९२१) हे नाटक छ. शिवाजी महाराजांवर आधारलेले होते. यामध्ये केशवरावांनी महाराजांची भूमिका केलेली होती. या सर्व नाटकांतील त्यांच्या नायकाच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर त्यांनी रामराज्यवियोग या नाटकात मंथरेचे काम केले. टिळक स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी ‘गंधर्व’ व ‘ललितकलादर्श’ या नाटकमंडळ्यांतर्फे मानापमान नाटकाचा संयुक्त प्रयोग मुंबईतील बालीवाला नाट्यगृहात झाला (८ जुलै १९२१). त्यात केशवरावांकडे धैर्यधराची भूमिका आली. त्यांच्या जोडीला बालगंधर्व – भामिनी आणि गणपतराव बोडस – लक्ष्मीधर असा मातब्बर संच जमला. या प्रयोगास प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी बालगंधर्वांसोबत सौभद्र या नाटकाचाही संयुक्त प्रयोग केला. या दरम्यान ते विषमज्वराने आजारी पडले व पुणे येथे हा अद्वितीय नट वयाच्या बत्तीसाव्या वर्षी रंगभूमीबरोबरच जगाच्या पडद्याआड झाला.

टिपेच्या सुरांना सहज व स्वच्छपणे पोहोचणारा आवाज आणि अत्यंत प्रभावी तान हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. रंगभूमीवरील सजावटीबाबत नवनवीन प्रयोग करून केशवरावांनी त्यात अनेक सुधारणा केल्या. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा  या नाटकावेळी मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा मखमलीचा पडदा झळकला. केशवरावांनी त्या काळात राबवलेला आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ठरलेल्या वेळी नाटकाची सुरुवात करणे. त्यांना अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी संगीतसूर्य असे संबोधले होते.

केशवरावांचे दोन विवाह झाले. त्यांना दोन मुली होत्या.

संदर्भ :

  • चापेकर, शंकर निळकंठ (नानासाहेब), स्मृतिधन, मुंबई, १९६६.
  • पब्लिकेशन्स डिव्हिजन, माहिती व नभोवाणी मंत्रालय, भारत सरकार, दिल्ली, आठवणीतील आठ नट, पुणे, १९५८.
  • काळे, पुरुषोत्तम श्रीपाद, ललितकलेच्या सहवासात , मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१८.

समीक्षक : मा. ल. चौंडे