शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित उपनिषद्. या उपनिषदात एकूण पाच ब्राह्मण आहेत. येथे ब्राह्मण हा शब्द अध्याय किंवा भाग या अर्थी वापरला आहे. या उपनिषदात महर्षी याज्ञवल्क्य आणि भगवान् आदित्य (सूर्यनारायण) या दोघांमधील संवादातून आत्मतत्त्वाचे विवेचन प्रश्नोत्तर स्वरूपात केलेले आहे. या उपनिषदामध्ये आलेल्या महत्त्वपूर्ण विषयांचे सारांशरूपाने वर्णन पुढीलप्रमाणे आहे —

(१) प्रथम ब्राह्मण : यामध्ये एकूण चार खंड आहेत. प्रथम खंडामध्ये महर्षी याज्ञवल्क्य यांनी आदित्यलोकात जाऊन सूर्यनारायणाला आत्मतत्त्वाचे ज्ञान देण्याची विनंती केली. त्यावर उत्तर देताना त्यांनी ज्ञानपूर्वक अष्टांगयोगाचे आचरण करण्यास सांगितले व त्याविषयी विवेचन केले. या उपनिषदात (१) शीत-उष्ण, आहार-निद्रा यांच्यावर विजय प्राप्त करणे, (२) शांत (संयमित) राहणे, (३) (मन) निश्चल ठेवणे व (४) इंद्रियांवर ताबा मिळवणे हे चार यम सांगितले आहेत; तसेच (१) गुरूभक्ती, (२) सत्यमार्गाची ओढ, (३) ब्रह्मतत्त्वाच्या आनंद स्वरूपाचा अनुभव, (४) त्या अनुभवाने मिळणारा अवर्णनीय आनंद, (५) नि:संगता (सर्वांपासून अल्पित राहणे), (६) एकांतवास, (७) मनोनिवृत्ती, (८) फळाची अपेक्षा नसणे व (९) वैराग्य हे नऊ नियम सांगितले आहेत. महर्षी पतंजलींनी योगसूत्रात सांगितलेल्या यम-नियमांपेक्षा या उपनिषदात सांगितलेली यम-नियमांची संकल्पना वेगळी आहे. कोणत्याही सुखकारक स्थितीमध्ये दीर्घकाळ राहता येऊ शकणे म्हणजे आसन होय. पूरक, कुंभक व रेचक हे प्राणायामाचे तीन प्रकार आहेत. स्वत:च्या मनाला इंद्रिये व त्यांच्या विषयांपासून दूर करून त्यावर नियंत्रण प्राप्त करणे म्हणजे प्रत्याहार होय. चैतन्यस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी मन स्थिर करणे म्हणजे धारणा होय. सर्व जीवांच्या शरीरामध्ये समान रूपाने राहणाऱ्या चैतन्यावर चित्ताची एकाग्रता म्हणजे ध्यान आणि ध्यानाच्या अवस्थेत एकरूप झाल्यावर ‘मी ध्यान करत आहे’ याचीही जाणीव न राहणे म्हणजे समाधी होय. अशा प्रकारे जो अष्टांगयोगाच्या सूक्ष्म अंगाना जाणतो, तो मुक्त होतो असे वर्णन पहिल्या खंडामध्ये आले आहे.

द्वितीय खंडामध्ये काम, क्रोध, नि:श्वास, भय, निद्रा असे देहाचे पाच दोष सांगितले असून अनुक्रमे संकल्परहित होणे तसेच क्षमा, अल्प आहार, अप्रमाद आणि तत्त्वचिंतन यांद्वारे वरील दोषांचे निराकरण करावे असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे निद्रा (अज्ञान), भय, हिंसा, तृष्णा, कामवासना यांनी युक्त अशा संसाररूपी सागराला तरून जाण्याकरिता सूक्ष्म साधनेच्या मार्गाचा अवलंब करून सत्त्वादि गुणांच्या पलिकडे जाऊन तारक ब्रह्माचे ध्यान करावे असे सांगितले आहे. या खंडामध्ये कुंडलिनी विद्या व तिचे ध्यान याविषयीचे वर्णन आलेले आहे. आत्मरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याकरीता अंतर्लक्ष्य, बहिर्लक्ष्य आणि मध्यलक्ष्य अशा तीन स्थानांवर ध्यान करावे, याविषयीचे विवेचन केले गेलेले आहे. या खंडात आकाश, पराकाश, महाकाश, तत्त्वाकाश आणि सूर्याकाश यांचेही वर्णनआले आहे.

तृतीय खंडामध्ये तारकयोग व अमनस्कयोग असे योगाचे दोन प्रकार सांगून मूर्तितारक व अमूर्तितारक असे तारकयोगाचे दोन प्रकार वर्णिलेले आहेत.

चतुर्थ खंडामध्ये अंतर्लक्ष्याविषयी मतमतांतरे दिली आहेत. स्वकल्पिततत्त्वांचा त्याग करून जेव्हा जीवात्मा आणि परमात्मा यात कोणताही भेद नाही, असा निश्चय जेव्हा योग्याला होतो तेव्हा तो जीवन्मुक्त अवस्थेला प्राप्त होतो, असा उपदेश भगवान् आदित्य यांनी या खंडात केला आहे.

(२) द्वितीय ब्राह्मण : यामध्ये एकूण पाच खंड आहेत. प्रथम खंडामध्ये नाद, बिंदू, कला यांच्या पलिकडे अखंड मंडलाकार असून ते सगुण व निर्गुण स्वरूप आहे हे जो जाणतो त्यास मोक्ष प्राप्त होतो, असे वर्णन आहे. नासिकाग्र दृष्टीच्या अभ्यासाने अखंड मंडलाकार ज्योती दिसते, तीच सत्-चित्-आनंद ब्रह्म होय. या एकाग्रतेच्या अभ्यासाने मन, बुद्धी स्थिर होते.

द्वितीय खंडामध्ये प्रणवाचे अर्थात ओंकाराचे स्वरूप सांगण्यात आले आहे. प्राण (श्वास) आणि अपान (उच्छ्वास) यांचे ऐक्य करून कुंभक करून षण्मुखी मुद्रेने ओंकाराचा नाद श्रवण केल्यास मन त्यात लीन होते. अशा प्रकारे अभ्यास केल्याने कर्मनिवृत्ती होते आणि योगी अमनस्क (लक्ष नसलेला) होतो. या खंडाच्या शेवटी अमनस्क पूजा म्हणजे काय हे सांगून जो ती जाणतो, तो ब्रह्मस्वरूप होतो अशा प्रकारचे वर्णन आलेले आहे.

तृतीय खंडामध्ये ब्रह्माच्या अनुसंधानाने कैवल्यप्राप्ती सांगितली आहे. जागृती आणि निद्रावस्थेतही ज्याला अंतर्ज्ञानाचे भान राहते तो ब्रह्म जाणणारा असतो. जेव्हा ध्यानावस्थेत योग्याला (ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय) यापैकी कशाचेही भान राहत नाही तेव्हा त्याची समाधी परिपूर्ण होते. समाधीतून बाहेर आल्यावर त्याला प्रपंचाच्या मिथ्यात्वाची जाणीव होते, त्याचे सर्व तमोविकार नष्ट होतात, प्रपंचाचा लय होतो आणि मुक्ती प्राप्त होते.

चतुर्थ खंडामध्ये जाग्रत्, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय आणि तुरीयातीत या जीवाच्या पाच अवस्थांचे वर्णन आलेले आहे. जाग्रत् अवस्थेतील जीव प्रवृत्ती मार्गात आसक्त होऊन ‘पापाचे फळ नरक मिळू नये आणि शुभकर्माचे फळ स्वर्ग प्राप्त होऊ दे’ अशी इच्छा करतो. वैराग्याचा उदय झाल्यामुळे कर्माचे फळ असलेल्या जन्म व संसारबंधनातून मुक्त होण्यासाठी निवृत्तीकडे वळतो. अशा संसारात तरून जाण्यासाठी गुरूचा आश्रय स्वीकारून, काम-क्रोध इत्यादींचा त्याग करून, विहित कर्मे करून साधनचतुष्ट्य अर्थात विवेक, वैराग्य, षट्सम्पत्, मुमुक्षुत्व यांनी संपन्न होऊन एकमात्र भगवत्सत्तेला अंतर्लक्ष्य करून ‘मी एकच अद्वितीय आहे’ असा भाव ठेवून मोक्ष मार्गावर आरूढ होतो अशा प्रकारचे वर्णन या खंडात आले आहे.

पाचव्या खंडामध्ये सर्व प्रकारे परिपूर्ण असलेल्या तुरीयातीत अवस्थेमुळे (जाग्रत्, सुषुप्ती व स्वप्न यापलीकडील समाधिरूप चौथी अवस्था) योगी ब्रह्मरूप होतो, त्याची ब्रह्म म्हणून स्तुती केली जाते, तो सर्व लोकांमध्ये स्तुत्य होतो, सर्व लोकांत संचार करणारा होतो असे योग्याचे वर्णन आलेले आहे. हा योगी आपले मन परमात्मरूपी आकाशात विलीन करतो. शुद्ध, अद्वैत, जडतारहित, सहज प्राप्त आणि अमनस्करूपी योगनिद्रेमध्ये राहून योगी अखंडानंदाच्या प्राप्तीने जीवन्मुक्त होतो. अशा प्रकारे ब्रह्मानंद प्राप्तीचे वर्णन या खंडात आले आहे.

(३) तृतीय ब्राह्मण : यामध्ये एकूण दोन खंड आहेत. प्रथम खंडामध्ये हृदयाकाशात राहणाऱ्या परम ब्रह्माला आत्मरूपात अनुभवून, भाव-अभाव द्वंद्वाच्या पलिकडे जाऊन उन्मनी अवस्थेचा अनुभव कसा होतो याचे वर्णन केलेले आहे. गुरूच्या ‘तत्त्वमसि’ उपदेशानंतर ‘मीच तो एकमेव शुद्ध परमात्मा आहे’ असे योगी अनुभवतो.

द्वितीय खंडामध्ये ज्याचे मन परामाकाशात मग्न आहे, ज्याला उन्मनी अवस्था प्राप्त आहे, जो समस्त इंद्रियांपासून परावृत्त झाला आहे, अनेक जन्मात प्राप्त पुण्याच्या साठ्यामुळे कैवल्यरूपी फळ प्राप्त झाले आहे, अशा योग्याचे वर्णन आले आहे.

(४) चतुर्थ ब्राह्मण : यामध्ये आकाशाचे पाच प्रकार, शरीरातील नऊ चक्रे, सहा आधार, तीन लक्ष्य या सर्वांचे ज्ञान योग्याला असणे आवश्यक आहे असा उपदेश आदित्य मंडलातील पुरुषाने याज्ञवल्क्यांना केला आहे.

(५) पंच/पाचवा ब्राह्मण : यामध्ये विषयासक्त मन बंधास कारण तर विषयरहित मन मोक्षाचे कारण होते असे सांगितले आहे. मन हे उत्पत्ती, स्थिती व संहार करणारे कर्म करते. ते मन ज्या ठिकाणी लय पावते ते विष्णूचे परम पद होय. या परमपदामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. मनाच्या लयामुळे शुद्ध अद्वैत तत्त्वाची सिद्धी होते.

हे उपनिषद् साधनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून यामध्ये तन्त्र, योग आणि वेदान्त या तीन साधनेच्या परंपरांचा समन्वय दिसून येतो. यात साधनेच्या अनुषंगाने विविध ग्रंथांमध्ये वर्णिलेल्या अनेक पारिभाषिक शब्दांचे विवेचन केलेले आढळते. योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यावर साधकाला कशा स्वरूपाची अनुभूती येते हे जाणून घेण्यासाठी या उपनिषदातील विवेचन महत्त्वपूर्ण ठरते.

संदर्भ :

  • गाडगीळ, विभावरी, योगोपनिषद्, प्रकाशक सदानंद गाडगीळ, पुणे.
  • दलाई, बी. के., योगोपानिषद्, संस्कृतप्रगत अध्ययन केंद्र, पुणे, २०१५.
  • शर्मा, श्रीराम, १०८ उपनिषद्: (सरल हिंदी भावार्थसहित) ब्रह्मविद्याखंड, ब्रह्मवर्चस्, हरिद्वार, २००३.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर