श्रीनिवासरचित ‘हठरत्नावली’ हा हठयोगावरील एक महत्त्वाचा ग्रंथ असून ‘हठयोगरत्नसरणी’ आणि ‘रत्नावली’ ही त्याची अन्य नावे आहेत. या ग्रंथात वर्णन केलेला विषय चार प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. या विभागांना उपदेश अशी संज्ञा आहे. उपदेशांमधील श्लोकसंख्या पुढीलप्रमाणे आहे — प्रथम उपदेशात २३, द्वितीय उपदेशात ५३, तृतीय उपदेशात ४३, चतुर्थ उपदेशात १८ श्लोक आहेत. अशा रीतीने या ग्रंथात एकूण १३७ श्लोक आढळतात. प्रस्तुत ग्रंथावर स्वात्माराम लिखित ‘हठप्रदीपिका’ ह्या ग्रंथाचा प्रभाव दिसून येतो. तरीदेखील ग्रंथकर्त्याचे काही संकल्पनांच्या बाबतीत महत्त्वाचे योगदानही लक्षात घेण्यासारखे आहे.
प्रथम उपदेशामध्ये योगाच्या निरनिराळ्या व्याख्या उद्धृत करून पतंजलिमुनींनी केलेल्या ‘चित्तवृत्तिनिरोध’ ह्या व्याख्येत अभिप्रेत असलेला योग हाच ‘महायोग’ होय असे म्हटले आहे. मंत्र, लय, राज व हठ असे योगाचे मोक्षदायक चार प्रकार सांगून प्रत्येकाचे वर्णन केलेले आहे. त्याविषयी मतमतांतरे देखील या ग्रंथात समाविष्ट आहेत. शुद्धीकरणाच्या प्रचलित अशा धौती इत्यादी सहा क्रियांखेरीज गजकरिणी व चक्रि ह्या दोन क्रियाही सविस्तर वर्णिल्या आहेत. हठप्रदीपिकेत गजकरिणीचे वर्णन आढळते. परंतु, चक्रीचे वर्णन आढळत नाही. प्रस्तुत ग्रंथात शुद्धीकरणाच्या सर्व क्रियांमध्ये ह्या दोन क्रिया महत्त्वाच्या मानल्या आहेत (१.३१-३२,५३). नौलीच्या ‘भारी’ व ‘अंतरा’ अशा दोन नवीन प्रकारांचा उल्लेख ह्या ठिकाणी आढळतो (१.३३-३६). ह्या क्रियांचा शरीरातील विविध चक्रांच्या शुद्धीकरणासाठी कसा उपयोग होतो हे देखील येथे सांगितलेले आहे. योगसाधनेसाठी योग्य अशी कुटी, मिताहार, आहारातील पथ्य व कुपथ्य, तसेच साधनेच्या सफलतेसाठी उपकारक व हानिकारक घटकांची देखील चर्चा केलेली आढळते.
दुसऱ्या उपदेशामध्ये नऊ प्रकारचे कुंभक आणि दहा मुद्रा सविस्तर वर्णिल्या आहेत. सामान्यपणे आढळणाऱ्या आठ प्रकारच्या कुम्भकांखेरीज ‘भुजंगीकरण’ या नवव्या प्रकाराचे येथे वर्णन केले आहे (२.३१). मुद्रांच्या वर्णनात महामुद्रेची प्रक्रिया, वज्रोलीच्या क्रियेसाठी वापरावयाची नलिका इत्यादी त्याचप्रमाणे ‘उड्डियान’ बंधाचा ‘बाह्योड्ड्यान’ प्रकार व त्याचे लाभ यांचे वर्णन आढळते (२.५६). सुषुम्ना, इडा व पिंगला ह्या नाड्यांसाठी इतर अनेक समानार्थी संज्ञा सांगितलेल्या आहेत. उदा., सुषुम्ना नाडीचे ब्रह्मनाडी असे नाव आढळते (२.८, २५). इडेची चन्द्रा, सिनीवाली, गंगा आणि अमरबोधिता अशी तर पिंगलेची दम्भिनी, सूर्या, यमिना, काक्षरा, कालाग्नि, रुद्री आणि चण्डी अशी नावे आढळतात (२.१५५-१५६).
तिसरा उपदेश प्रामुख्याने आसनांचे विस्तृत वर्णन करतो. यात एकूण ८४ आसनांचा उल्लेख येतो. त्यात स्वस्तिकासन, गोमुखासन, पद्मासन, वीरासन, सिद्धासन, मयूरासन, कुक्कुटासन, भद्रासन, सिंहासन आणि मुक्तासन ही दहा आसने महत्त्वाची आहेत असे म्हटले आहे. त्यातही सिद्ध, पद्म, सिंह आणि भद्र ही चार आसने श्रेष्ठ मानली आहेत.
अहिंसा, ब्रह्मचर्य ह्यांचा मानस नियमांमध्ये समावेश केला आहे, तर सत्यकायिक नियमांमध्ये अंतर्भूत आहे (३.३-४). या उपदेशाच्या शेवटच्या भागात प्राणायामाचे महत्त्व, कृती व परिणाम ह्यांचा ऊहापोह केला आहे.
चौथ्या उपदेशात समाधि, नादानुसंधान, योगमार्गातील आरंभ, घट, परिचय व निष्पत्ति हे प्रगतीचे चार टप्पे वा अवस्था आणि त्यात येणारे अनुभव या विषयांचे वर्णन आढळते (४.७-२४). त्याअनुषंगाने पिंड व ब्रह्मांड ह्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. येथे सुषुम्ना, पिंगला, सरस्वती, कुहु, यशस्विनी, वरुणा, गांधारी, शंखिनी, पूषा, विश्वोदरी, जिह्वा, अलम्बुसा, हंसिनी आणि इडा या चौदा प्रमुख नाड्यांचे वर्णन आढळते.
हठरत्नावली या ग्रंथात सूतसंहिता, विष्णुपुराण, भगवद्गीता, हठप्रदीपिका या ग्रंथांमधील तसेच न्याय, वैशेषिक, सांख्य इत्यादी दर्शनांतील मते उद्धृत केली आहेत. ग्रंथाच्या शेवटी ग्रंथकार योगसाधनेची महती सांगताना म्हणतात की, शैव, शाक्त, पाशुपत इत्यादी पंथातील साधक हे ‘कृत्रिम’ शास्त्रांचे अनुसरण करीत असल्यामुळे सत्यापासून दूरच राहतात; फक्त ‘सिद्धीपद’ म्हणजे योग हाच ‘स्वाभाविक’ असून त्याचा नेहेमी अवलंब करावा.
एकूणच ह्या ग्रंथामध्ये पारंपरिक योग-क्रियांकडे पाहण्याचा लेखकाचा नवा व विश्लेषणात्मक दृष्टिकोन दिसून येतो. पूर्वसुरींच्या मतांचा आदर हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
समीक्षक : प्राची पाठक