ॲफ्लेक, बेन : (१५ ऑगस्ट १९७२). हॉलिवुडमधील सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक. त्यांचे पूर्ण नाव बेंजामिन गेझा ॲफ्लेक-बोल्ट असे आहे. ॲफ्लेक यांचा जन्म कॅलिफोर्निया येथील बर्कलेमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव ख्रिस्तोफर ॲन ‘ख्रिस’ बोल्ट, तर वडिलांचे नाव टिमोथी बायर्स ॲफ्लेक आहे. ६० च्या दशकात त्यांनी ‘थिएटर कंपनी ऑफ बॉस्टन’ या नाट्यसंस्थेत व्यवस्थापक, दिग्दर्शक, लेखक अशा विविध भूमिका पार पाडल्या. तसेच त्यांनी काही नाटकांत अभिनेता म्हणूनही काम केले. बेन ॲफ्लेक यांचे लहान भाऊ केसी ॲफ्लेक हे देखील अभिनेते आहेत.
बेन यांचे प्राथमिक शिक्षण, केंब्रिज रिंग्ज अँड लॅटिन हायस्कूल येथे झाले. याच शाळेत त्यांची मॅट डेमन यांच्याशी मैत्री झाली. मॅट पुढे जाऊन हॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेते झाले. बेन यांचे बालपण केंब्रिज शहरातील सेंट्रल स्क्वेअर या भागात गेले, तेथे नेहमीच कला क्षेत्रातील लोकांची उठबस असे. बेन आणि केसी ॲफ्लेक यांच्या कलागुणांना त्यांच्या आईकडून नेहमीच वाव मिळाला. त्यांची आई या दोघा बंधूंना तिथे होणाऱ्या विविध नाटकांच्या प्रयोगांना नेहमी घेऊन जात असे, त्यातून दोघांमध्येही अभिनयाची आवड निर्माण झाली. तेथे चित्रित होणाऱ्या काही जाहिरातींसाठी बेन आणि केसी या दोघांनीही कामही केले होते.
बालकलाकार म्हणून वयाच्या सातव्या वर्षी बेन यांनी द डार्क एंड ऑफ द स्ट्रीट (१९८१) या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनय केला. ‘बँक स्ट्रीट कॉलेज ऑफ एज्युकेशन’ या संस्थेने माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणित या विषयात गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने द व्हॉएज ऑफ द मिमी (१९८४) आणि द सेकंड व्हॉएज ऑफ मिमी (१९८८) या लघुमालिकांची निर्मिती केली होती. यामध्ये बेन यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केली. ही त्यांची बालकलाकार म्हणून सर्वांत यशस्वी मालिका ठरली.
वयाच्या १८ व्या वर्षी बेन यांनी पुढील शिक्षणासाठी लॉस एंजेल्स येथील ‘ऑक्सिडेंटल कॉलेज’ या महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण घेत असताना त्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत काही चित्रपट दिग्दर्शित केले. शिवाय डॅडी (१९९१), द व्हँपायर स्लेयर (१९९२), स्कूल टाईज (१९९२) इत्यादी चित्रपटांतून काही लहान भूमिका केल्या. दिग्दर्शक रिचर्ड लिंकलेटर यांचा डेझ्ड् अँड कन्फ्युज्ड (१९९२) यामधील बेन यांनी साकारलेली फ्रेड ओ’बॅनियन ही भूमिका कौतुकास पात्र ठरली. हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीतील पहिल्या काही गाजलेल्या चित्रपटांमधील एक आहे.
गुड विल हंटिंग (१९९७) हा चित्रपट बेन यांच्या कारकीर्दीला निर्णायक वळण देणारा चित्रपट ठरला. प्रसिद्ध दिग्दर्शक गस व्हॅन सेंट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाची पटकथा ॲफ्लेक आणि मॅट डेमन या दोघांनी मिळून लिहिली होती. बॉस्टन शहरातील एमआयटी शिक्षण संस्थेमध्ये सफाई कर्मचारी असलेल्या; पण अतिशय बुद्धिमान आणि तितक्याच विक्षिप्त असलेल्या विल हंटिंग (मॅट डेमन) आणि त्याचे थेरपिस्ट शॉन मॅग्वायर (रॉबिन विल्यम्स) यांच्यातील नातेसंबंधांवर तरल भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात बेन यांनी मॅट डेमन यांच्या मित्राची, चक सलीवनची, भूमिका केली. हा चित्रपट तिकीटबारीवर अतिशय यशस्वी झाला. समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटासाठी रॉबिन विल्यम्स यांना सर्वश्रेष्ठ साहाय्यक अभिनेत्याचा तसेच बेन ॲफ्लेक आणि मॅट डेमन या दोघांना सर्वोत्कृष्ट पटकथाकार म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनासाठी अकादमी पुरस्कार मिळवणारे हे दोघे सर्वांत तरुण व्यक्ती ठरले. पुढील वर्षी बेन आर्मगेडन (१९९८) या चित्रपटात झळकले. अवकाशातून पृथ्वीकडे झेपावणारी उल्का आणि त्यातून उद्भवलेले संकट अशी या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटात त्यांनी समुद्र तेलविहिरीवर काम करणाऱ्या आणि संकटकाळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका तेलकर्मचाऱ्याची भूमिका केली होती. व्यावसायिक दृष्ट्या हा चित्रपट यशस्वी ठरला.
जॉन मेडन दिग्दर्शित शेक्सपिअर इन लव्ह (१९९८) या विनोदी-प्रेमकथेत बेन यांनी प्रतिथयश इंग्रजी नाटक कलाकार नेड एलन यांची भूमिका केली. या चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले. पुढील काही वर्षांत बेननी रेनडिअर गेम्स (२०००), बॉयलर रूम (२०००) अशा विविध चित्रपटांत भूमिका केल्या. २००१ साली आलेला बहुचर्चित युद्धपट पर्ल हार्बर हा मायकेल बे यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये बेन यांनी कॅप्टन रेफ मॅकॉले ही भूमिका साकारली. दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या समुद्रतळावर केलेल्या हल्ल्यावर हा चित्रपट आधारित होता. चित्रपटातील काही दृश्यांच्या तपशिलांची त्यावेळेस चर्चा देखील झाली. या चित्रपटाला समीक्षकांकडून विषम प्रतिक्रिया मिळाल्या; पण व्यावसायिक दृष्ट्या हा चित्रपट यशस्वी ठरला. २००० मध्ये बेन यांनी मॅट डेमन आणि इतर यांच्यासोबत मिळून लाईव्ह प्लॅनेट ही निर्मितीसंस्था काढली. याद्वारे त्यांनी नवीन चित्रपट बनविणाऱ्यांना प्रोत्साहनपर असा प्रोजेक्ट ग्रीनलाईट हा कार्यक्रम २००१, २००३ व २००५ या तीन शृंखलेत अमेरिकन दूरदर्शनवर प्रसारित केला. याला खूप प्रसिद्धी मिळाली.
सम ऑफ ऑल फिअर्स (२००२) या रहस्यपटात बेन यांनी मॉर्गन फ्रीमन यांच्यासोबत काम केले. हा चित्रपट गुप्तहेर संघटना, हेरगिरी, संरक्षण अशी पार्श्वभूमी आणि काल्पनिक पात्रांवर आधारित होता. त्यांपैकी सर्वांत प्रसिद्ध पात्र जॅक रायन ही व्यक्तिरेखा बेन यांनी साकारली. याचवर्षीचे त्यांचे गीगली आणि डेअरडेव्हिल हे चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या अपयशी ठरले. तसेच समीक्षकांनी देखील या चित्रपटांवर टीका केली. बेन यांनी गॉन बेबी गॉन (२००७) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांचे बंधू केसी ॲफ्लेक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. २००९ मध्ये ही इज जस्ट नॉट दॅट इन्टू यू या एक प्रेमकथा असलेल्या विनोदी चित्रपटात तर, २०१० मध्ये द टाऊन या थरारपटात वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका बेन यांनी साकारल्या. हे दोन्हीही चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी झाले.
बेन ॲफ्लेक दिग्दर्शित आर्गो (२०१२) हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला. ८० च्या दशकात अज्ञातवासातून इराणमध्ये परतलेले धर्मगुरू अयातोल्लाह खोमेनी यांच्या राजवटीत तेहरानमधील अमेरिकी दुतावासावर हल्ला झाला व तेथील कर्मचाऱ्यांना बंदिवान केले होते. यावर हा चित्रपट आधारित होता. ॲफ्लेक यांनी यात सीआयए अधिकारी टोनी मेंडेझची भूमिका साकारली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर, गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा हे सर्वोच्च तीनही पुरस्कार मिळवले. २०१४ साली बेन गॉन गर्ल या मानसशास्त्रीय थरार-रहस्यपटात प्रमुख भूमिकेत होते. डेव्हिड फिंचर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. बेन यांच्याबरोबर रोझमंड पाईक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या. बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टीस (२०१६) यातून बेन पुन्हा एकदा सुपरहिरो चित्रपट प्रकाराकडे वळले. या चित्रपटात त्यांनी बॅटमॅनची भूमिका साकारली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेला प्रेक्षक-समीक्षकांची पसंती मिळाली असली, तरी चित्रपटाला मात्र मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. त्यांनी सुसाईड स्क्वाड (२०१६) आणि जस्टीस लीग (२०१७) या आणखी दोन चित्रपटांत बॅटमॅन ही भूमिका बजावली. या चित्रपटांना प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाली नाही. परिणामी त्यांनी बॅटमॅनच्या भूमिकेसाठी केलेला करार रद्द केला.
ट्रिपल फ्रंटियर (२०१९) या बेन यांच्या चित्रपटात अमेरिकन सुरक्षादलातून निवृत्त झालेले पाच मित्र एका अमली पदार्थ विकणाऱ्या टोळीला संपविण्यासाठी एकत्र येतात अशी कथा आहे. साहसी दृश्ये, रोमांचक आणि थरारक मांडणी यामुळे याला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्ध लेखक जॉन डिडीऑन लिखित राजकीय पटावरील कथा असलेल्या द लास्ट थिंग ही वॉन्टेड या कादंबरीवर आधारित याच नावाच्या या चित्रपटात बेन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली (२०२०). यानंतर त्यांनी द लास्ट ड्युएल (२०२१), द टेंडर बार (२०२१), डीप वॉटर (२०२२) इत्यादी चित्रपटांत महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. द टेंडर बार हा चित्रपट प्रसिद्ध कादंबरीकार व पत्रकार जे. आर. मोरिंगर यांच्या संस्मरणावर आधारित आहे. प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती असलेल्या लहान मुलाच्या भावविश्वात त्याचा मामा चार्ली एक आश्वासक, तरल आणि सकारात्मक अशा भावनेने वावरतो, त्यामुळे त्या लहानग्याच्या आयुष्यातील कमतरता भरून निघते. ही चार्लीची भूमिका बेन यांनी समर्थपणे पेलली आहे. बेन आणि डेमन यांच्या आर्टिस्ट ईक्वीटी या चित्रपटनिर्मिती संस्थेद्वारे निर्मित एअर (२०२३) हा चित्रपट नाईकी या विशेषत: खेळाडूंसाठी पादत्राणे बनविणाऱ्या कंपनीचा अधिकारी आणि प्रसिद्ध खेळाडू मायकल जॉर्डन यांच्यामधील तत्कालीन खळबळजनक आणि क्रीडाविश्वातील त्यावेळच्या मोठ्या आर्थिक कराराच्या यशस्वितेशी संबंधित आहे. हा चित्रपटही खूप गाजला. मोजक्या आणि विविध छटा असलेल्या भूमिका बेन यांनी विविध चित्रपटांतून प्रभावीपणे साकारल्या. तसेच त्यांचे दिग्दर्शकीय कौशल्य त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मोजक्या पण कलादृष्ट्या समृद्ध चित्रपटांतून दिसून येते.
समीक्षक : आशुतोष जरंडीकर