पेंढारकर, लीलाबाई : (२४ ऑक्टोबर १९१० − ३ फेब्रुवारी २००२). भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील अभिनेत्री. मूक चित्रपटांद्वारा आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये लीलाबाईंचे नाव महत्त्वाचे आहे. लीलाबाईंचे मूळ नाव लीला चंद्रगिरी. कर्नाटकातील बेळगाव येथे एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरच्या जबाबदारीमुळे तसेच महाराष्ट्र फिल्म कंपनीचे व्यवस्थापक आणि अभिनेते बाबूराव पेंढारकर यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी कोल्हापूरमध्ये नव्याने आकार घेऊ लागलेल्या चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. लीलाबाईंच्या पूर्वी दुर्गाबाई कामत, कमलाबाई गोखले अशा स्त्री-कलाकारांनी मूकपटात भूमिका केल्या होत्या; पण ही अपवादात्मक नावे सोडली तर त्याकाळात चित्रपटक्षेत्रात स्त्रियांनी येणे निषिद्ध मानले जाई. अशा काळात लीलाबाईंनी हे धाडस केले हे विशेष होय. बेळगावसारख्या आडबाजूच्या गावातला जन्म, शिक्षणाचा गंध नसल्यामुळे लीलाबाईंच्या जिभेवर कानडीचा पगडा होता, तो पुसून टाकण्यासाठी त्यांनी मराठी, हिंदी भाषेची शिकवणी घेत, संस्कृत श्लोकांचे पाठांतर करत मराठी भाषेचे त्यांचे वळण प्रयत्नपूर्वक शुद्ध केले. त्या गायनही शिकल्या. लीलाबाईंच्या गाण्यावर शाळिग्रामबुवा, नत्थन खाँ, भूर्जीखाँ अशा शास्त्रीय संगीतातील दिग्गजांचे संस्कार झाले.
रुपेरी पडद्यावरील लीलाबाईंच्या कारकीर्दीचा आरंभ ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या उदयकाल या चित्रपटातल्या देवी भवानीच्या लहानशा भूमिकेद्वारा झाला (१९३०). त्यानंतर चंद्रसेना (१९३१) या पौराणिक मूकपटामध्ये त्यांना प्रमुख भूमिका मिळाली. तरतरीत नाक, बोलके डोळे, नाजूक जिवणी, हसरा चेहरा आणि सडपातळ बांध्याच्या लीलाबाई या भूमिकेत शोभून दिसल्या. चंद्रसेना हा प्रभातचा सर्वाधिक चाललेला मूकपट ठरला. पुढे बोलपटाचे युग अवतरले तेव्हा अग्निकंकण / जलती निशानी (१९३२, कल्पनारम्य चित्रपट), मायामच्छिंद्र (१९३२, पौराणिक) आणि सिंहगड (१९३३, ऐतिहासिक) अशा एकामागून एक येत गेलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. लीलाबाईंच्या या भूमिका गाजल्या. ‘मिस लीला’ या नावाने त्या प्रकाशझोतात आल्या. १९३३ मध्ये लीलाबाईंना भारतातल्या पहिल्या रंगीत चित्रपटात सैरंध्रीमध्ये मुख्य भूमिका साकारण्याचा बहुमान मिळाला. ‘प्रभात’च्या या पौराणिक द्विभाषिक चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केले होते. कलाकारांमध्ये मास्टर विनायक, लीला, प्रभावती, शकुंतला, जी. आर. माने, निंबाळकर आणि शंकरराव भोसले यांचा समावेश होता, तर याचे संगीत गोविंदराव टेंबे यांचे होते. हा चित्रपट ‘रंगीत’ करण्यासाठी व्ही. शांताराम जर्मनीला गेले; मात्र चित्रपटाची रंगसंगती खूप भडक झाली. म्हणून हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आला तो मूळच्या कृष्णधवल रूपात. तसेच या चित्रपटापासून भारतीय चित्रपटांच्या ध्वनिमुद्रिकांच्या निर्मितीची सुरुवात झाली.
मूकपटाच्या कालखंडात चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या लीलाबाईंनी बोलपटाच्या तंत्राशी जुळवून घेत त्यात नायिकेच्या भूमिका केल्या आणि स्वत:ची गाणी रूपेरी पडद्यावर साकार केली. सोज्वळ चेहरा, सात्विक देहबोली आणि गोड आवाजाची देणगी या वैशिष्ट्यांचा पुरेपूर वापर करीत लीलाबाईंनी त्या काळच्या पौराणिक, ऐतिहासिक आणि अद्भुतरम्य पोषाखीपटात भूमिका केल्या. गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या संगीतकाराच्या तालमीत शिकून त्यांनी प्रचलित असलेली नाट्यसंगीत संस्कृतीतली गायनशैली आणि लाईव्ह रेकॉर्डिंगचे तंत्र शिकून चित्रपटातील स्वतःची गाणी स्वतः गायली. आपल्या भूमिकेशी समरस होऊन अभिनय करताना, समोर बसलेल्या वाद्यवृंदाशी जुळवून घेत गाण्यातल्या जागा अचूक घेत जाणे आणि तंत्र सांभाळून रेकॉर्डिंग व्यवस्थित पार पाडणे हे एक किचकट काम होते; ते त्यांनी मेहनतीने आणि कौशल्याने साध्य केले. त्यांच्या गाण्यांच्या एच.एम.व्ही कंपनीने ध्वनिमुद्रिका काढल्या. त्यांच्या देवीदेवतांच्या रूपातल्या प्रतिमाही त्या काळात प्रसिद्ध होत्या.
लीलाबाई प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. तेव्हा त्याआकाशवाणी (१९३४) चित्रपटात देवकीची भूमिकाही करीत होत्या. कोल्हापूर सिनेटोनच्या या बोलपटाचे लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर होते. नटवर्य नानासाहेब फाटक, बाबूराव पेंढारकर, मा. विनायक आणि स्वतः भालजी यात प्रमुख भूमिकांमध्ये होते. पुढे भालजींच्या दिग्दर्शनाखाली पुण्यातल्या ‘सरस्वती सिनेटोन’ निर्मित कालिया मर्दन (१९३५) मधील यशोदा, सावित्री (१९३५) मधील सावित्री, तसेच कोल्हापूरच्या ‘शालिनी सिनेटोन’च्या कान्होपात्रा (१९३७) मधील कान्होपात्रा या प्रमुख नायिकेच्या भूमिका त्याशिवाय राजा गोपीचंद (१९३८), गोरखनाथ (१९४०), नवहंसच्या भक्त दामाजी (१९४२) या चित्रपटांतील भूमिकांद्वारा त्यांनी आपली कारकीर्द चालू ठेवली. हे सगळे चित्रपट गाजले आणि त्यामुळे लीलाबाईंना खूप लोकप्रियता मिळाली.
पुढे भालजींनी आपले बस्तान कोल्हापूरला कायमचे हलवले आणि ‘प्रभाकर पिक्चर्स’ या स्वतःच्या चित्रपट निर्मितीसंस्थेची स्थापना केली. याद्वारा भालजींनी दिग्दर्शित केलेल्या महारथी कर्ण (१९४४) आणि महर्षी वाल्मिकी (१९४६) या द्विभाषिक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका लीलाबाईंना मिळाल्या. यांत रंगभूमीवरील आणि चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. महारथी कर्णमध्ये लीलाबाईंनी तेजस्वी कर्णपत्नीची भूमिका केली होती. तर महर्षी वाल्मिकीमध्ये त्यांनी ऋषिकन्या संध्याची भूमिका केली. १९४५ मध्ये भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींकडून ‘कोल्हापूर सिनेटोन’ हे चित्रपटनिर्मितीगृह खरेदी केले आणि त्याचे नामकरण ‘जयप्रभा स्टुडिओ’ असे केले. येथून चित्रपटनिर्मिती चालूच होती. १९४८ मध्ये म. गांधींजींच्या हत्येनंतर उसळलेल्या जाळपोळीत हे चित्रपटनिर्मितीगृह पेटवले गेले. यामुळे संपूर्ण पेंढारकर कुटुंबियांवर मोठाच आघात झाला. अशा संकटसमयी लीलाबाई कुटुंबियांसोबत कणखरपणे उभ्या राहिल्या. १९४६ नंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे जवळपास चार ते पाच वर्षे लीलाबाईंनी चित्रपटात भूमिका केल्या नाहीत.
१९५२ मध्ये छत्रपती शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी तरुण, करारी आणि शिस्तशीर जिजाबाईंची भूमिका परिणामकारकतेने साकारली. त्यांची ही भूमिका पुढे अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींचे प्रेरणास्थान बनली. त्यानंतर मात्र त्यांनी रुपेरी पडद्याचा निरोप घेतला आणि त्या संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्या. यानंतर तब्बल एकोणतीस वर्षांनी त्या भालजींच्या अखेरच्या गनिमी कावा (१९८१) या चित्रपटात पुन्हा जिजाबाईंच्या भूमिकेत अवतरल्या. ही भूमिका मात्र वयोवृद्ध जिजाबाईंची होती.
कारकीर्दीच्या एका टप्प्यावर लीलाबाईंनी फक्त भालजींच्या चित्रपटात काम करण्याची मर्यादा घालून घेतल्यामुळे त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांची संख्या फारशी मोठी नाही; मात्र चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. १९९३ साली महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने त्यांना गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण पुरस्कार’, ‘राजमाता जिजाऊ’ तसेच भारतीय विद्याभवनच्या कलाकेंद्राचा पुरस्कार अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. कोकणातल्या खेडोपाड्यात विद्यादानासाठी आयुष्यभर कार्यरत असणारे जयसिंग पेंढारकर, ज्येष्ठ साहित्यिका माधवी देसाई आणि सदानंद पेंढारकर ही त्यांची तीन मुले. सुरुवातीच्या चित्रपटीय कारकीर्दीनंतर या त्यांच्या मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. नव्वदीच्या टप्प्यावर पोहोचल्यावर लीलाबाईंनी माझी जीवनयात्रा हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी त्यांचे बालपण आणि त्यांची चित्रपटीय कारकीर्द यांचे थोडक्यात विवेचन केले आहे. चित्रपटसृष्टीतून निवृत्त झाल्यानंतरही मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी आणि तंत्रज्ञाशी त्या स्नेह-आदराच्या सूत्रांनी जोडल्या होत्या. त्यांचे कोल्हापूर या त्यांच्या कर्मभूमीत वृद्धापकाळाने निधन झाले.
संदर्भ :
- पेंढारकर, लीलाबाई, माझी जीवनयात्रा, १९९७.
समीक्षक : अरुण पुराणिक