द योग इन्स्टिट्यूट ही प्रामुख्याने योगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली जगातील पहिली योगसंस्था आहे. श्री योगेंद्र यांनी १९१८ साली सांताक्रूझ (मुंबई) येथे या संस्थेची स्थापना केली. प्राचीन भारतीय योगसाधनेचे ज्ञान योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावे हा या संस्थेच्या स्थापनेमागील मूळ हेतू होता.

द योग इन्स्टिट्यूट

श्री. योगेंद्र उर्फ मणी हरिभाई देसाई यांचा जन्म सन १८९७ मध्ये गुजरात येथे झाला. १९१६ मध्ये त्यांची परमहंस माधवदास यांच्याशी भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे श्री. योगेंद्रजी योगमार्गावर चालण्यास प्रवृत्त झाले. विशेषेकरून प्रपंच करणाऱ्या व्यक्तींसाठी योग उपयोगात आणला गेला पाहिजे, अशी श्री योगेंद्र यांची दृढ धारणा होती. योगाच्या ज्ञानामुळे आणि त्याचा सराव केल्याने संसारी व्यक्तींना प्रचंड लाभ होईल यावर त्यांचा विश्वास होता आणि त्याकरिता त्यांनी ‘सर्वांसाठी योग’ ही चळवळ सुरू केली. त्यामुळे त्यांना ‘आधुनिक योगप्रवर्तनाचे जनक’ असे देखील म्हटले जाते. श्री योगेंद्र यांनी योग शिकवण्यासाठी आधुनिक पद्धती शोधून काढल्या. विशेषत: योगचिकित्सा क्षेत्रामधील त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले. श्री योगेंद्र यांनी १९२४ मध्ये संस्कृत आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असलेले सुरेंद्रनाथ दासगुप्ता यांच्यासमवेत प्राणावरील पहिले संशोधन केले होते. योगिक जीवनशैलीद्वारे ताणव्यवस्थापन तसेच हृदयविकार इ. आजारांमध्ये आवश्यक उपचार केले जाऊ शकतात यावर देखील संशोधन करण्यात आले.

१९२७ मध्ये श्री योगेंद्र यांचा श्रीमती सीतादेवी यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर सीतादेवींनी महिला आणि बालकांना योगाभ्यास शिकविण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी या विषयावर अनेक पुस्तके व लेख लिहिले. त्यांनी लिहिलेले स्त्रियांसाठी शारीरिक व्यायाम हे पुस्तक जॉर्जिया येथील ‘क्रिप्ट ऑफ सिव्हिलायझेझन’ (Crypt of civilization) येथे सुरक्षित ठेवले आहे. श्री. योगेंद्रजी यांचे सुपुत्र डॉ. जयदेव योगेंद्र यांनीही त्यांचा वारसा चालू ठेवला. डॉ. जयदेव यांनी मुंबई विद्यापीठातून १९५२ मध्ये ‘सांख्य आणि योग’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९५५ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘मोक्षपर्व’ या प्रबंधासाठी त्यांना तत्त्वज्ञानातील डॉक्टरेट देऊन हरगोविंददास शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले. द योग इन्स्टिट्यूट संस्थेच्या मार्फत त्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रारंभ केला. तसेच योगशिक्षण आणि उपचार या विषयांत अग्रगण्य कार्य केले. त्यांच्या पत्नी श्रीमती हंसा जयदेव सध्या द योग इन्स्टिट्यूटच्या संचालिका आहेत. ‘योग फॉर बेटर लिव्हिंग’ या १९८० साली प्रथम प्रसारित झालेल्या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकेतील सहभागामुळे त्या घराघरात पोहोचल्या. त्यांनी महिलांच्या आरोग्याविषयी दिलेल्या योगदानामुळे त्यांना स्पार्क (SPARC) या संस्थेने पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यांनी भारतासह युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पाकिस्तान, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांतील अनेक परिषदांमध्ये सहभाग घेऊन व्याख्याने दिली आहेत. त्यांनी योगविषयक अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत. श्रीमती हंसा यांना डॉ. जयदेव यांच्यासह राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेने (National Council for Education Research and Training) देशभरातील शाळांसाठी योगशिक्षणविषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आमंत्रित केले होते. योगाच्या क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल आणि उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना २०१९ मध्ये प्रतिष्ठेचा भारतगौरव पुरस्कार देण्यात आला. श्रीमती हंसा जयदेव या आंतरराष्ट्रीय योगमंडळाच्या (International Board of Yoga) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

श्री योगेंद्र (मणी हरिभाई देसाई)

१९३३ मध्ये द योग इन्स्टिट्यूट या संस्थेचे योग हे पहिले नियतकालिक प्रकाशित झाले. १९५१ मध्ये भारत सरकारने या संस्थेच्या सहकार्याने योगावरील पहिला सांस्कृतिक माहितीपट तयार केला. तसेच १९५७ मध्ये भारतातील योग सर्वेक्षणाची जबाबदारी या संस्थेकडे देण्यात आली होती. १९७० मध्ये या संस्थेद्वारे सायकोसोमॅटिक आणि मानसिक रोगांवरील संशोधनासाठी वैद्यकीय संशोधन केंद्र सुरू करण्यात आले. १९९७ मध्ये या संस्थेद्वारे जागतिक योग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डिसेंबर २००८ मध्ये, या संस्थेने मुंबईत शास्त्रीय योगावर आधारित पहिले योग संग्रहालय सुरू केले. या योग संग्रहालयामध्ये चित्रे, साहित्य, प्राचीन पत्रांच्या प्रती आणि जुन्या उपकरणांच्या माध्यमांतून सुमारे ५,००० वर्षांचा योगसंदर्भातील वारसा संग्रहित केला आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, इटली, जपान, दक्षिण अमेरिका, स्वित्झर्लंड, युगोस्लाव्हिया आणि युनायटेड किंगडम येथे योग संस्था केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

द योग इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे योगशिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम, विविध आरोग्यविषयक कार्यशाळा तसेच नियमित योगवर्ग आयोजित केले जातात. आंतरराष्ट्रीय योगमंडळ (International Board of Yoga) ही या संस्थेची धर्मादाय शाखा असून त्याअंतर्गत अनेक सामाजिक कल्याणकारी उपक्रम राबविले जातात. या संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना ‘मुदिता’ असे म्हणतात. द योग इन्स्टिट्यूट या संस्थेला २०१८-१९ मध्ये योगाचा प्रचार आणि प्रसारवृद्धी या कार्यासाठी केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा प्रधानमंत्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

 

  • संदर्भ : https://theyogainstitute.org/

समीक्षक : राजश्री खडके