बोधात्मक व्याकरण: बोधात्मक भाषाविज्ञानाची उपयोजित शाखा. बोधात्मक भाषाविज्ञान ही भाषाविज्ञानाची एक शाखा आहे. लिओनार्द टाल्मी, रोनाल्ड लॅंगाकर व जॉर्ज लॅकॉफ हे बोधात्मक भाषाविज्ञानाचे तीन जनक मानले जातात. बोधात्मक व्याकरण ही शाखा विकसित होण्यामध्ये अमेरिकन भाषावैज्ञानिक रोनाल्ड लँगाकर याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. याची सुरूवात अवकाशीय व्याकरण या सदराखाली १९८१ मध्ये झाली व नंतर त्याचे बोधात्मक व्याकरण असे नामकरण झाले. विस्तारित स्वरूपात, लँगाकरने बोधात्मक व्याकरणाची मूलतत्त्वे (Foundations of Cognitive Grammar) या नावाने अनुक्रमे १९८७ व १९९१ मध्ये दोन खंड प्रकाशित केले. प्रथम खंडात त्यांनी बोधात्मक व्याकरणाचे सैद्धांतिक घटक विशद केले, तर दुस-या खंडात त्यांचा प्रत्यक्ष वापर केला.

खुल्या शब्दगटातील (आशयात्मक) घटकाप्रमाणेच मर्यादित शब्दगटातील (व्याकरणिक) घटकही मूलत: अर्थपूर्ण असतात, हे लिओनार्द टाल्मीप्रमाणेच लँगाकरही मानतो. टाल्मी हा  शब्दाचे दोन गट मानतो: खुला व व्याकरणिक शब्दगट. टाल्मीच्या मते, खुला शब्दगट हा सांकल्पनिक आशय व्यक्त करतो व व्याकरणिक शब्दगट सांकल्पनिक संरचना व्यक्त करतो (उदा. घराकडे मधील घर या शब्दातून – माणसाने प्रामुख्याने स्वत:च्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी व राहण्यासाठी बनविलेले ठिकाण – अशा प्रकारचा अधिक संपन्न आशय व्यक्त होतो, तर कडे या शब्दातून फक्त दिशा व्यक्त होते). मात्र लँगाकर शब्दांची अशी दोन गटात विभागणी करीत नाही.

लँगाकरच्या मते, बोधात्मक व्याकरण कोणत्याही इतर सैद्धांतिक मांडणीवरून निर्माण झाले नाही अथवा ते इतर सैद्धांतिक मांडणीशी फारशी जवळीक साधत नाही. उदा. जनकसूत्री अर्थविज्ञानाकडून बोधात्मक व्याकरणाने फक्त अर्थ हाताळण्याची पद्धती स्वीकारली आहे. रचनात्मक व्याकरण व बोधात्मक व्याकरण यातील समान गुणधर्म म्हणजे यामध्ये अर्थ, शब्द व व्याकरण या विविध घटकांचा एकत्रित विचार केला जातो. तसेच या दोन्ही सिद्धांतात व्याकरणाच्या वर्णनातील मुख्य घटक ‘नियम’ नसून ‘रचना’ आहेत. आशय व व्याकरण असे वेगळे स्तर नसून अर्थाच्या दृष्टीने त्यात अखंडता आढळते. रचना या विस्तृत जाळ्यात जोडलेल्या असूनही त्या आपले वेगळेपण दर्शवितात. बोधात्मक व्याकरणात महत्त्वपूर्ण असणारे व्यक्तिसापेक्ष बोधन हे रचनात्मक व्याकरणात दुर्लक्षित राहिले आहे. व्यक्तिसापेक्ष बोधनाचे उदाहरण म्हणजे दोन व्यक्ती एकाच दृश्याचे वर्णन ‘ग्लास पाण्याने अर्धा भरलेला आहे’ किंवा ‘ग्लास अर्धा रिकामा आहे’, असे करू शकतात. बोधात्मक भाषाविज्ञान हा कार्यलक्षी भाषाविज्ञान परंपरेतील एक दृष्टीकोन असून बोधात्मक व्याकरण हा बृहद बोधात्मक भाषाविज्ञान चळवळीचा एक भाग आहे, असे लँगाकर नमूद करतो.

बोधात्मक व्याकरणामध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना आढळतात. त्यामध्ये प्रातिनिधिक वर्ग, प्रोफाईल व बेस, ट्रजेक्टरी व लँडमार्क, इत्यादि. या संकल्पना पुढीलप्रमाणे सोदाहरण स्पष्ट करता येतील –  इंग्रजीत ‘रिंग’ शब्दाचा अर्थ गोलाकार वस्तू वा गोष्ट होतो. ‘रिंग’ म्हणजे गोलाकार असा दागिना. यामध्येही कानात, नाकात वा बोटात परिधान करावयाचा गोलाकार दागिना असे निकटचे अर्थ निष्पन्न होतात. तसेच इतरही संबधित अर्थ प्राप्त होतात. या सर्वांत प्रातिनिधिक प्रतिमा म्हणजे गोलाकार वस्तू वा गोष्ट होय. लँगाकरच्या मते बेस ही मोठी प्रतिमात्मक रचना असून प्रोफाईल ही त्यातील केंद्रीत अशी छोटी रचना होय. उदा. टोक या शब्दातून टोक असलेली लांबट वस्तू हा बेस असेल तर फक्त टोकाचा भाग हा प्रोफाईल असेल. लँगाकरची ट्रजेक्टरी व लँडमार्क या संकल्पना टाल्मीच्या आकृती व पृष्ठभूमी या संकल्पनांना समांतर अशा आहेत. उदा. ‘राम घरातून बाहेर पडला’ या वाक्यामध्ये ‘राम’ व ‘घर’ या बाबी अनुक्रमे ट्रजेक्टरी व लँडमार्क होत. लँगाकरच्या मते, अर्थ व व्याकरणविषयीची समस्या हाताळताना बोधात्मक व्याकरण अधिक सरस ठरते.

पाहा. बोधात्मक भाषाविज्ञान, बोधात्मक अर्थविज्ञान, बोधात्मक रूपक सिद्धांत.

नोंदीतील परिभाषा 

बोधात्मक भाषाविज्ञान – Cognitive Linguistics

बोधात्मक व्याकरण – Cognitive Grammar

अवकाशीय व्याकरण – Space Grammar

जनकसूत्री अर्थविज्ञान- Generative Semantics

रचनात्मक व्याकरण – Constructive Grammar

व्यक्तिसापेक्ष बोधन – Construals

कार्यलक्षी भाषाविज्ञान – Functional Linguistics

प्रातिनिधिक – prototypical

संदर्भ :

1 . Langacker, Ronald,  An introduction to cognitive grammar, University of California, San Diego, 1986. 2. Langacker, Ronald, Cognitive grammar: A basic introduction, Oxfoed University Press, 2008. 3. Langacker, Ronald, Foundations of cognitive grammar, Vol. 1 (1987), Vol.2 (1991), Stanford University Press.

समीक्षक : सोनल कुलकर्णी