बोधात्मक रूपक सिद्धांत :  रूपकांची निर्मिती ही मानवाच्या विविध अनुभूतींमधून झाली आहे. उदा. शेअर घसरला यामधील प्रतिमा ‘घसरणे’ या जीवनातील नित्य क्रियेशी जोडली आहे, तसेच शेअरमधील वृद्धीविरोधी संकल्पना व्यक्त करण्यासाठी वापरली आहे. अर्थात, शेअरमधील घट यापेक्षा ‘घसरणे’ या शब्दाद्वारे प्रकट होणाऱ्या  अर्थातील सूक्ष्म बदलही रूपकांमधून व्यक्त होतो. ज्याप्रमाणे रूपकांची निर्मिती विविध नित्य गोष्टींच्या अनुभूतींमधून होते, त्याचप्रमाणे रूपकांमध्ये स्थिर झालेल्या प्रतिमा नवीन अनुभूतीनुसार बदलतही जातात. उदा. स्वत:च्या पायावर कुऱ्हाड  मारणे यामध्ये नित्य जीवनातील कुऱ्हाड मारण्याचा प्रारंभी असलेला अर्थ कालौघात बदलून नुकसान करून घेणे हा दुसरा अर्थ अधिक व्यापकपणे चिकटला, त्यामुळे हा शब्दप्रयोग विविध ठिकाणी वापरणे शक्य झाले.

बोधात्मक किंवा सांकल्पनिक रूपक

बोधात्मक भाषाविज्ञानामध्ये एखादी विशिष्ट संकल्पना दुसऱ्या  संकल्पनेच्या माध्यमातून समजावून घेतली जाते. यास बोधात्मक किंवा सांकल्पनिक रूपक अशी संज्ञा वापरली जाते. उदा. जीवन म्हणजे प्रवास होय. याचा पुढीलप्रमाणे अधिक स्पष्ट खुलासा करता येईल. (१) प्रवास एका विशिष्ट ठिकाणी (उदा. पुणे) सुरू होऊन दुसऱ्या  एका ठिकाणी (उदा. बेळगाव) संपतो. त्याचप्रमाणे जीवन जन्म या ठिकाणी सुरू होऊन मृत्यू या ठिकाणी संपते. (२) ज्याप्रमाणे प्रवासात विविध टप्पे असतात, त्याचप्रमाणे जीवनातही विविध टप्पे असतात. (३) प्रवासात व जीवनात दिशा ही पहिल्या टप्याकडून दुसऱ्या  टप्प्याकडे अशीच राहते. अशा प्रकारे जीवन व प्रवास या दोन्ही बाबींमधील सांकल्पनिक पातळीवरील साम्यस्थळांचा विचार करून दोहोंची तुलना केली जाते, असे दिसून येते. जॉर्ज लेकॉफ आणि मार्क जॉहान्सन यांनी १९८० मध्ये प्रकाशित त्यांच्या मेटॅफर्स वी लिव्ह बाय या ग्रंथात बोधात्मक किंवा सांकल्पनिक रूपक सिद्धांताची प्रथमत: मांडणी केली. त्यांच्या मते, तत्कालीन स्थितीतील अर्थविषयक सिद्धांत अपुरे असल्याचे लक्षात आल्याने या ग्रंथाची निर्मिती झाली. पूर्वी रूपक ही संकल्पना अर्थनिर्मितीच्या दृष्टीने परिघाबाहेरची अथवा निरूपयोगी मानली जात होती. परंतु त्यांच्या मते मानवी बोधामध्ये रूपकाचे अनन्यसाधारण असे महत्त्व असून अर्थनिर्मितीच्या दृष्टीने तो केंद्रभागी असणारा महत्त्वपूर्ण घटक आहे.

रूपक

रूपक म्हणचे काव्यकल्पना वा काव्यालंकार की जो नेहमी बोलल्या जाणाऱ्या  भाषेपेक्षा वेगळ्या असणाऱ्या काव्यमय भाषेचा घटक आहे, असा सर्वसाधारणपणे लोकांचा समज आहे. त्याचबरोबर रूपक हा विचारप्रक्रियेपेक्षा शब्दाच्याच माध्यमातून व्यक्त होतो, असाही एक समज आहे. त्यामुळे आपण रूपकाशिवायही जगू शकतो असे लोकांना वाटते. मात्र लेकॉफ व जोहान्सन यांच्या अभ्यासानुसार रूपक हा आपल्या नियमीत जीवनाचा, भाषेबरोबरच मानवी विचार व क्रिया यांचा अविभाज्य भाग आहे. ज्याद्वारे आपण विचार व विविध क्रिया करतो त्या मानवी सांकल्पनिक संरचना अथवा भावविश्वही हे मूलत: रूपकात्मक असेच आहे. ज्या संकल्पनांद्वारे मानवी विचारांची निर्मिती होते, त्या फक्त बुद्धीपर्यंतच सीमित राहत नसून त्या आपले दैनंदिन व्यवहारही प्रस्थापित करतात/ ठरवितात.

रूपकाची  वैशिष्टये

लायपिंग फॅन  या अभ्यासकाच्या मते, रूपकाची तीन वैशिष्टये आढळतात: (१) रूपकाची सार्वत्रिकता, (२) रूपकाचे सांकल्पनिक स्वरूप व (३) रूपकातील पद्धतशीरपणा. त्याच्या मते, रूपकाचे स्वरूप हे सार्वत्रिक असून ते ठराविक भागापुरते मर्यादित नाही. रूपक मौखिक व लिखित संस्कृतीबरोबरच विचारप्रक्रियेचाही भाग आहे. रूपक भाषालंकारापुरते मर्यादित नसून बोधात्मक रचनेचा अविभाज्य भाग आहे व भाषेद्वारे त्याचे प्रकटीकरण होत असते. सर्व रूपकामध्ये सुसूत्रता वा पद्धतशीरपणा आढळतो. रूपकाच्या अंतर्गत रचनेचा विचार करता प्रत्येक रूपकामध्ये मूळ/स्रोत-क्षेत्र व लक्ष्य-क्षेत्र असे दोन भाग असतात व लक्ष्य-क्षेत्राची मूळ/स्रोत-क्षेत्राशी तुलना केली जाते. उदा. जीवन म्हणजे प्रवास होय. यामधील प्रवास हे मूळ/स्रोत क्षेत्र असून जीवन हे लक्ष्य क्षेत्र आहे. यामध्ये प्रवास ही संकल्पना मूर्त स्वरूपाची आहे, त्यापेक्षा जीवन ही संकल्पना अमूर्त असून समजण्यास अधिक कठीण आहे. म्हणून जीवन ही संकल्पना समजून घेण्यासाठी प्रवास या संकल्पनेशी झालेली तुलना उपयोगी पडते. ही तुलना सांकल्पनिक पातळीवरची असते. आपणास दृश्य पातळीवरही मूळ/स्रोत-क्षेत्र व लक्ष्य-क्षेत्र यामधील साम्य पाहावयास मिळते. लेकॉफ व टर्नर या अभ्यासकांच्या मते, मूळ/स्रोत-क्षेत्रामधील घटकांची, संबंधाची व लक्षणांची लक्ष्य-क्षेत्रातील घटकांशी, संबंधाशी व लक्षणांशी तुलना होत असते.

बोधात्मक मिश्रण सिद्धांत

रूपक ही समग्र मानवी बोधप्रक्रियेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन करणारा सिद्धांत गायल्स फोकोनी व मार्क टर्नर यांनी १९९४ मध्ये मांडला. मानवी संकल्पनात्मक सामग्रीतील काही निवडक गोष्टींच्या संयोग प्रक्रियेला त्यांनी बोधात्मक एकीकरण किंवा बोधात्मक मिश्रण असे नाव दिले. रूपकाप्रमाणेच बोधात्मक मिश्रण हे ही मानवी विचारप्रक्रियेचाच भाग असून त्याचे नियमीतपणे भाषेद्वारे प्रकटीकरण होत असते. रूपकामध्ये ज्याप्रमाणे मूळ/स्रोत व लक्ष्य क्षेत्रे महत्त्वाची असतात, तशी बोधात्मक मिश्रणप्रक्रियेत चार प्रकारचे अवकाश कल्पिले आहेत: (१) मूळ/स्रोतावकाश, (२) लक्ष्यावकाश, (३) मिश्रणावकाश व (४) व्यापकावकाश (जो दोन अवकाशांना समान असतो). उदा. एखादा कलाकार मोनालिसाच्या चित्रास मोनिका लेविन्सकीचा चेहरा जोडून नवीन निर्मिती करत असेल तर (१) मोनालिसाचे मूळ चित्र म्हणजे मूळ/स्रोतावकाश, मोनिका लेविन्सकीचा चेहरा म्हणजे लक्ष्यावकाश, मोनालिसाचे उर्वरीत शरीर व मोनिका लेविन्सकीचा चेहरा जोडण्याची प्रक्रिया म्हणजे मिश्रणावकाश व स्मित करीत असलेली काळ्याभोर केसांच्या तरूणीची प्रतिमा व्यापकावकाश होय. अर्थात प्रत्येक वेळी उपरोक्त विविध अवकाश रूपकात्मक असतीलच असे नाही, तर काही वेळा फक्त त्यामधील गोष्टींची फक्त अदलाबदलही असते. बोधात्मक मिश्रण सिद्धांताचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे यात विश्लेषकाला दोन असमांतर गोष्टींचे  विश्लेषण करण्याची मुभा मिळते.

सदर रूपक सिद्धांताची व्याप्ती सतत वाढत आहे. कला, साहित्याबरोबरच विविध क्षेत्रात याचा विश्लेषणात्मक वापर होत आहे.

 

पाहा. बोधात्मक भाषाविज्ञान, बोधात्मक अर्थविज्ञान, बोधात्मक व्याकरण

परिभाषा 

मूळ/स्रोत-क्षेत्र – Source domain

लक्ष्य-क्षेत्र – Target domain

बोधात्मक एकीकरण किंवा बोधात्मक मिश्रण – Conceptual integration

संदर्भ :

1.Fan, LiPing, Literature Review on the Cognitive Approach to Metaphor, 2018.  www.sciencedirect.com/science/article/pii/S1877050918306045 2. Fauconnier, Gilles,Turner, Mark , Conceptual Projection and Middle Spaces, 1994. https://papers.ssrn.com/sol3/papers.cfm?abstract_id=1290862 3.Geeraerts,Dirk, Cuyckens,Hubert (Edi), The oxford handbook of cognitive linguistics (Oxford Handbooks), Oxford University Press, 2007.

  समीक्षक : सोनल कुलकर्णी