आम ही आयुर्वेदातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. आम याचा शब्दश: अर्थ अर्धवट पचलेले किंवा कच्चे असा आहे. शरीराचे पोषण होण्यासाठी घेतलेल्या आहाराचे प्रथम रस धातूत रूपांतर होते. शरीराला मुर्त रूप देणाऱ्या घटकांमध्ये रस धातूचा क्रमांक पहिला येतो. अन्न पचविणाऱ्या अग्निची शक्ती कमी पडली तर हा धातू नीट तयार न होता कच्च्या स्वरूपात आमाशयात पडून राहतो. याला आम असे म्हणतात. अतिशय दुषित झालेले वात, पित्त, कफ परस्परात मिसळून गेले तरी आमाची उत्पत्ती होते. हा आम विषाप्रमाणे असतो.

आम तयार करणाऱ्या बाह्य कारणांचा उल्लेख करताना चरकाचार्य म्हणतात की, पूर्ण लंघन करणे, अपचनातही जेवणे, अधिक प्रमाणात खाणे, कधी कमी तर कधी खूप खाणे, जेवणाच्या सवयींमधील अनियमितता, आपल्या प्रकृतीला न झेपणारे अन्न खाणे, पचायला अतिशय जड असे जेवण घेणे, अतिशय थंड, अतिशय कोरडे व खराब झालेले अन्न खाणे यामुळे आमाची निर्मिती होते. विरेचन, वमन, स्नेहपान या उपक्रमांचा परिणाम अतिमात्रेत झाल्यास अन्न पचविणाऱ्या अग्निची शक्ती कमी होते. तसेच दीर्घ आजारामुळे आलेली कृशता, वातावरण व ऋतूत आलेली विषमता, शौच, मूत्र, जांभई, शिंका यांना वारंवार रोकण्याची सवय या सर्वांमुळे पाचकाग्नी मंद पडतो. मंद अग्नी थोडेही अन्न पचवू शकत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न सडते, आंबुसते विषमय बनते.

जेव्हा शरीरातील तिन्ही दोष, सात धातू व तीन मळ या आमाने संपृक्त होऊन काम करतात, तेव्हा त्यांना साम म्हणतात. यांमुळे होणाऱ्या रोगांनाही साम म्हटले जाते. शरीरात अशा साम दोषांचा व्यापार चालत असला, तर सामान्यपणे पुढील लक्षणे जाणवतात – शौचमूत्र बाहेर टाकण्याचे मार्ग दाटल्याप्रमाणे वाटणे, शरीरात थकवा, जडपणा, आळस, अपचन व मलबध्दता जाणवणे, शरीरातून वायूचा निचरा नीट न होणे, तोंडात वारंवार पाणी येणे, तोंडाला चव नसणे, सारखी झापड येणे ही आहेत.

पहा : धातु.

संदर्भ :

  • अष्टांग हृदय – सूत्रस्थान, अध्याय १३, श्लोक २४, २५, २६, २७.
  • चरक संहिता – चिकित्सास्थान,  अध्याय १५, श्लोक ४२, ४३, ४४.

 समीक्षक : जयंत देवपुजारी

This Post Has One Comment

  1. कृष्णकांत परब

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे

Comments are closed.