थुनेन, जोहान हेनरिक वॉन (Thünen, Johann Heinrich von) : (२४ जून १७८३ – २२ सप्टेंबर १८५०). एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध जर्मन अर्थशास्त्रज्ञ. जोहान यांचा जन्म उत्तर जर्मनीतील मेक्लेनबर्ग-स्ट्रेलिट्झ येथे झाला. त्यांनी ‘ग्रेनझोस्टन’ म्हणजे ‘किरकोळ खर्च’ हा शब्द सर्वप्रथम वापरला आहे. नंतर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राच्या तत्त्वज्ञानात तो शब्द लोकप्रिय केला.
जोहान यांनी किरकोळ खर्च हे प्रारूप सिद्धांताच्या स्वरूपात मांडला आहे. हे प्रारूप त्यांच्या जर्मनीतील रोस्टॉकजवळील मॅक्लेनबर्ग येथील संपत्तीच्या अर्थशास्त्रीय विश्लेषणावर आधारित आहे. त्यांच्या सिद्धांताची व्याख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतेक माहितीचा उपयोग व्यावहारिक अनुभवांद्वारे केला गेला. त्यांनी मॅक्लेनबर्गमधील शहरे आणि गावांची विशिष्ट व्यवस्था करून जमीन वापरण्याच्या पद्धतीची सैद्धांतिक प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न केला. कृषी जमीन वापरण्याच्या प्रारूपाची निर्मिती शेतकरी, जमीन मालक आणि जोहान यांनी इ. स. १८२६ मध्ये द आयसोलेटेड स्टेट नावाच्या पुस्तकात केली होती. हे प्रारूप औद्योगिकीकरणापूर्वी तयार केले गेले; मात्र ते विचारात घेतल्याप्रमाणे अस्तित्वात आणणे शक्य नव्हते. सर्वप्रथम असे गृहीत धरले की, त्यांचे काल्पनिक राज्य सर्व क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्ण असेल आणि त्याचे कोणतेही बाह्य प्रभाव दिसून येत नाहीत. हे राज्य वाळवंटाच्या सभोवती आहे. येथील जमीन पूर्णपणे सपाट आहे आणि येथे नद्या किंवा पर्वत आढळत नाहीत. या ठिकाणच्या मातीची गुणवत्ता आणि वातावरण हे सुसंगत आहे. या राज्यातील शेतकरी प्रवास करून आपला स्वत:चा माल थेट मध्यवर्ती शहरात वाहतूक करीत असतात; मात्र तेथे रस्ते अस्तित्वात नाहीत. असे असले, तरी येथील शेतकरी नफा वाढविण्यासाठी तर्कशुद्धपणे वागतात. जोहान यांचा हा सिद्धांत शेती पद्धतीच्या आसपास केंद्रित असणाऱ्या आदर्श योजनाची माहिती सांगते. शेतीविषयक जमीन वापरण्याचे स्थानिकीय विश्लेषण यात केले आहे. शेतीविषयक काही स्थानिक सिद्धांत आणि मुख्यत्वे त्यांच्या कृषी स्थानाचा सिद्धांत यावर लक्ष केंद्रित करतील. हे प्रारूप जमीन खर्च आणि वाहतूक खर्च यांतील समतोलाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून ओळखले जाते. जोहान यांच्या सर्वांत प्रसिद्ध कार्यांपैकी एक म्हणजे, जमिनीची किरकोळ उत्पादकता मोजण्यासाठी वापरल्या गेलेल्या गणितीय सूत्रांची स्थापना होय. अर्थशास्त्रात याला ‘थुनेन भाडे’ म्हणून ओळखले जाते.
ही योजना शेतकऱ्यांच्या कार्यपद्धतींच्या आसपास फिरते. त्याच बरोबर ज्यामुळे शेती सर्वांत फायदेशीर ठरेल, आशा योजनेवर लक्ष केंद्रित करते. जोहान यांनी या प्रारूपामधून एक सूत्र तयार केले आहे. ज्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना शेती तयार करण्यासाठी चांगल्या व योग्य पद्धतीचे स्थान निवडणे शक्य केले. यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात जास्तीत जास्त वाढ होऊ शकेल.
सूत्रानुसार वापरलेले समीकरण R = Y (p-c)-YFm असे आहे. R हे जमिनीचे मूल्य दर्शविते; Y हा उत्पादनाचे प्रतिनिधित्व करतो; p उत्पादनाच्या बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करते; c उत्पादनाच्या किमतीचे प्रतिनिधित्व करते; m बाजारपेठेतील शेतीचा विस्तार दर्शवितो आणि F बाजारपेठेतील वाहतूक खर्चाचे प्रतिनिधित्व करतो. जोहानसाठी हे सूत्र इतके महत्त्वाचे होते की, त्यांच्या मृत्यूच्या थडग्यावर ते लिहावे, अशी त्यांची शेवटची इच्छा होती.
जोहान यांनी आदर्श शहरी योजनेची कल्पना केली. जेथे धान्य, दुग्ध, मांस आणि लाकूड यांसारख्या सर्व आवश्यक तरतुदींचा स्रोत एखाद्या शहराच्या आसपासच्या भागात उपलब्ध होतात. हे प्रारूप बनविताना शहरी केंद्रांच्या सभोवताली असलेल्या चार वर्तुळांच्या रूपात ते बनविले आहे. हे चार वर्तुळ भौगोलिक-आर्थिक अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य करतात, असे मानले आहे. या वर्तुळांच्या आधारे एक प्रभावी प्रणाली तयार करण्याची व्यवस्था केली. जेथे शहरी केंद्रामध्ये आवश्यक तरतुदींचे वाहतूक कार्यक्षम होते.
- सर्वांत आतील पहिले वर्तुळ हे ज्या प्रदेशामध्ये दुग्ध आणि बागकाम-शेती उपयुक्त असेल, त्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते. जोहान यांनी आपल्या युक्तिवादात असे म्हटले आहे की, या शेतामधील नष्ट होणाऱ्या वस्तुंची जागा शहरीभागाच्या जवळ असल्याने त्या जागेचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. जेणेकरून प्रवासाच्या काळात उत्पादन खराब होण्यापासून बचाव झाला पाहिजे.
- दुसऱ्या वर्तुळात लाकूड आणि त्याच्या निर्मितीसाठी आदर्श क्षेत्रांचा समावेश केला. एकोणिसाव्या शतकात बहुतेक उद्योगांसाठी तसेच घरगुती कामासाठी लाकूड हे इंधन म्हणून वापरले जात होते.
- तिसरे वर्तुळ हे मोठ्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना दिसते. ज्यामध्ये अन्नधान्याच्या शेतीचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. या वर्तुळात भाकरीसाठी धान्य म्हणून विस्तृत शेतीची पिके असतात. दुग्धजन्य पदार्थांपेक्षा धान्य जास्त काळ टिकते आणि ते इंधनांपेक्षा जास्त हलक्या असतात. वाहतूक खर्च कमी करते. ते शहरापासून दूर स्थित असू शकतात. अन्नधान्ये हे लवकर खराब होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याच्या वाहतूकीची समस्या निर्माण होत नाही.
- चौथ्या वर्तुळाच्या बाहेर निर्जन वाळवंट आहे, जे मध्यवर्ती शहरापासून कोणत्याही प्रकारच्या शेती उत्पादनासाठी फारच दूर अंतरावर आहे; कारण उत्पादनासाठी मिळालेल्या रकमेमुळे शहराला वाहतूक झाल्यानंतर उत्पादनाच्या खर्चाची किंमत मोजावी लागत नाही. या चारही वर्तुळासाठी जोहान यांनी वेगवेगळे रंग वापरले आहेत. काळा रंग हा शहरासाठी; पांढरा रंग दुग्ध आणि बागकामासाठी; हिरवा रंग जंगल व वन; पिवळा रंग धान्य आणि शेतातील पिके आणि लाल रंग हा पाळीव प्राण्यांचे प्रतिनिधित्व करते.
आधुनिक तंत्रज्ञान, कारखाने, महामार्ग आणि अगदी रेल्वेमार्गापूर्वी हे प्रारूप तयार केले असले, तरी हे अर्थशास्त्रीय भूगोलामधील एक महत्त्वाचे प्रारूप असल्याचे अभ्यासता येते. जोहान यांनी जवळ जवळ दोनशे वर्षांपूर्वी असे दाखवून दिले की, शेतीविषयक जमीन वापरण्याची भौगोलिक पद्धत अत्यंत नियमित आणि अंदाजदायक होती. त्यांनी प्रथम आपल्या स्वत:च्या मोठ्या मालमत्तेच्या आसपासच्या जमिनीच्या वापराचे वर्णन केले. एखाद्या शहराच्या जवळ असणाऱ्या जमिनीची किंमत ही जास्त असते. अशा भागातील शेतकरी वाहतूक, जमीन व नफ्याचा खर्च संतुलित करतात आणि बाजारपेठेसाठी सर्वांत जास्त खर्चिक उत्पादन देतात, असे जोहान यांना वाटते.
जगभरातील विद्वानांनी जोहान यांच्या शेतीविषयचा स्थान सिद्धांत तपासला आणि तो लागूही केला. हा सिद्धांत वास्तविकतेमध्ये असून या सिद्धांतामुळे विचारांना नवीन दिशा दिली आहे, हे सिद्धांताचे महत्त्व आहे. परिणामी त्याच्या अनुप्रयोगाच्या सुधारित मार्गाने एक नवीन योजना अस्तित्वात आली.
संदर्भ :
- Sage Journal, 1996.
- Taylor and Francis Journal, 1978.
- Wiley Online Library Journal, 1967.
समीक्षक : मंजूषा मुसमाडे