मेसोपोटेमियातील अकेडियन साम्राज्याच्या काळातील शिल्पकला. अभिजात सुमेरियन काळाचा अस्त इ.स.पू.सु. २३०० मध्ये अकेडियन साम्राज्याच्या उदयाबरोबर झाला. सेमिटिक भाषा असलेल्या अकेडियन साम्राज्याने इ. स. पू. २२७१ ते २१५४ दरम्यान फक्त मेसोपोटेमियाच नाही तर लेव्हात प्रदेशातही आपले वर्चस्व स्थापित केले होते. त्यांच्या कलेमध्ये आधीपासून चालत आलेल्या सुमेरियन कलेचा प्रभाव दिसतो. गोलाकार आकारातील कोरीव काम आधीची मातीतील शिल्पांची आठवण करून देतात. तरीही अकेडियन शिल्पकला सुमेरियन कलेपेक्षा वेगळी आहे. अकेडियन शिल्पकारांनी प्रामुख्याने अकेडियन राजवंशातील राजांच्या प्रतिमा बनवण्यावर भर दिलेला आढळतो.
इराकमधील आधुनिक काळातील निनेव्ह येथे सामान्याइतक्या मानवाकृतीचे कांस्य धातूचे शीर मिळाले. या शिल्पातील दाढीचा बारकाईने दाखवलेला वळणदार कुरळेपणा व त्यातील गुंतागुंतीच्या केशरचनेतून हे शिल्प तत्कालीन समाजातील उच्च, सामर्थ्यशाली आणि संपत्ती असलेल्या आदर्श पुरुषाचे असल्याचे दिसून येते. धातूच्या पोकळ ओतीव शिल्पांमधील हे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. नंतरच्या काळात या शिल्पाची मुद्दाम केलेली तोडफोड चेहऱ्यावरील फाटलेल्या डाव्या डोळ्यावरून लक्षात येते. ३०.५ सेमी उंचीच्या या शिल्पाची घडण व साधारण काळ (इ.स.पू. २३०० ते २२००) पाहता तज्ज्ञांच्या मते हे सारगॉन राजाच्या पुतळ्याचे राहिलेले शीर असावे.
अकेडियन राजा सारगॉनचा नातू नरम-सिनच्या विजयाच्या स्मृतीशिळेमध्ये राजा नरम-सिन अकेडियन सैन्य घेऊन झॅग्रॉस पर्वतांतील लुलूबी या पर्वतीय लोकांवर विजयी चाल करून जात आहे, असे उत्थित-दृश्य दाखविलेले आढळते. ही इराणमधील सुसा येथे सापडलेली स्मृतीशिळा इ.स.पू.सु. २२५४ ते २२१८ या काळात केलेली व गुलाबी चुनखडकात असून सहा फूट उंचीची व सहा इंच जाडीची आहे. ही शिळा वर व खाली दोन्हीकडून थोडी तुटलेली व झिजलेली आहे. त्यावर दाखवण्यात आलेल्या पर्वतावर लेख कोरलेला आहे. शिळेमध्ये उजवीकडे असलेल्या पर्वतावर प्रतिपक्षातील सैन्य लढत देताना व मरणासन्न अवस्थेत तर डावीकडे नरम-सिनचे सैन्य प्रतिपक्षावर शिस्तमय चाल करून जाताना दिसते. युद्धाच्या वेळचे देवांचे अस्तित्व दर्शविण्यासाठी पर्वताच्या वरील भागात दोन तारे दाखवले आहेत व त्याखालीच पर्वतावर नरम-सिनने शत्रूच्या गळ्यात भाला खुपसलेला दिसतो. शिल्पात नरम-सिन देवत्व मिळालेल्या राजाच्या स्वरूपात दाखवलेला असल्याने त्याची आकृती इतर सर्व योद्ध्यांपेक्षा मोठ्या आकारात असून त्याने शिंग असलेले शिरस्त्राण परिधान केलेले आहे. त्याच्याकडे धनुष्यबाण व भाला ही आयुधे आहेत.
अकेडियन काळातील लेगॅश (आत्ताचे इराकमधील आश शत्रह) येथील राजा गूडेआ (इ.स.पू. २१४४ ते २१२४) हा नवीन मंदिरांचा पुरस्कर्ता व सरंक्षक होता. या राजाची डायोराइट या कठीण दगडांत केलेल्या लहान-मोठ्या आकारांतील उभ्या व बसलेल्या स्वरूपातील जवळजवळ २६ शिल्पप्रतिमा मंदिरांतून प्राप्त झाल्या आहेत. गूडेआ राजाच्या अनेक शिल्पांवर सुमेरियन भाषेतील लेख लिहिलेला आढळतो. आसनावर बसलेल्या गूडेआ राजाचे हात एकमेकांत जाणीवपूर्वक गुंफलेले असून डाव्या हातावरून वस्त्र खाली घागऱ्याच्या रेषेत सोडलेले आहे. राजाने प्रामुख्याने सुमेरियन पद्धतीचा घागरा (kaunakes) घातलेला दाखविलेला असून त्यावर सुमेरियन लिपीतील मजकूर आहे. डायोराइट सारख्या कठीण दगडांतही शिल्पांमध्ये स्नायूंचे, वस्त्र व मुखावरील बारकावे अतिशय निपुणतेने तसेच विशिष्ट शैलीत कोरलेले असल्याने तेथे जडावकामाची आवश्यकता वाटत नाही.
संदर्भ :
- Black, J., Gods, Demons and Symbols of Ancient Mesopotamia, 1992.
- Frankfort Henri, The Art and Architecture of the Ancient Orient, Pelican History of Art, 4th ed, Penguin, 1970.
- Frankfort Henri, Cylinder Seals, London, 1939.
- Hall, H. R., Babylonian and Assyrian Sculpture in the british museum, Paris and Brussels, 1928.
- Leick Gwendolyn, Historical Dictionary of Mesopotamia, 2003.