प्राचीन ग्रीक संस्कृती भूमध्य समुद्राच्या आजूबाजूला तुर्कीपासून फ्रान्सच्या दक्षिणेपर्यंतच्या अनेक भूभागांमध्ये पसरली होती. ग्रीकांचे इजिप्शियन, सिरियन आणि पर्शियन यांसारख्या इतर लोकांशी जवळचे संपर्क होते. ग्रीक स्वतंत्र शहर-राज्यात राहत होते; परंतु भाषा आणि धार्मिक विश्वास एकसारखेच होते. आर्ष काळातील (इ.स.पू. ७०० ते इ.स.पू. ४८०) ग्रीसमध्ये कलाकारांनी इ.स.पू. सातव्या शतकापासून माती, हस्तिदंत, कांस्य आणि लाकडांतील छोट्या भरीव प्रतिमांसोबत मोठ्या स्मारकशिल्पांचीही निर्मिती केलेली दिसते. आर्ष काळातील लाकडासारख्या अपक्षरण होणाऱ्या माध्यमातील प्रतिमांपैकी फार कमी प्रतिमा अस्तित्वात राहिल्या आहेत. कांस्यपात्राला मोठ्या कढईप्रमाणे धरण्यासाठी कांस्यामधीलच प्रतिमा, जसे की मानवी शीर आणि ग्रिफीन (गरुड मुख व पंख असलेला ग्रीक पौराणिक प्राणी) यांचा जोडून वापर केलेला दिसतो. सुरुवातीच्या काळात तत्कालीन भौमितिक मृत्पात्रांवरील चित्रणाप्रमाणे लांबट हातपाय व त्रिकोणात्मक धड असलेल्या मानवाकृती शिल्पांची निर्मिती झालेली दिसते. प्राण्यांची शिल्पेही मोठ्या प्रमाणात तयार केलेली आढळतात. याव्यतिरिक्त ग्रीसमध्ये असलेल्या ऑलिंपिया (Olympia) व डेल्फाय (Delphi) येथील संकुलांमध्ये सापडलेल्या ऐच्छिक वा संकल्प पूर्ण केल्यावर अर्पणासाठी म्हणून असलेल्या प्राणीशिल्पांची निर्मिती केलेली आढळून येते.

पूर्वेकडील भूभागाच्या सांस्कृतिक अतिप्रभावामुळे आर्ष काळाच्या सुरुवातीला (इ.स.पू. सु. ७०० ते ६०० मध्ये) पौर्वात्यकाळ अथवा प्राच्यक्रांती काळ (Orientalising Period) असे ओळखतात. ह्या काळात निर्माण केलेल्या शिल्पांमध्येही पूर्वेकडील तांत्रिक आणि शैलीतील प्रभाव प्रामुख्याने दिसून येतो. याच काळात ग्रीक कलाकारांनी मातीच्या फरशांवर साच्यांच्या साहाय्याने उठाव शिल्पांचे निर्मिती तंत्र आत्मसात केलेले दिसते. ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या गेलेल्या ह्या तंत्राने मुक्तस्थायी प्रतिमा आणि साच्याशिवाय केलेल्या कोणत्याही प्रतिमा घडविण्यासाठीची परंपरा स्थापन करण्यास मदत केली. स्थायी प्रतिमांमध्ये दाबून बसविलेले केस व शैलीबद्ध पद्धतीने दाखविलेली वस्त्रे ह्या स्वरूपात पूर्वेकडील प्रभाव दिसून येतो. कलाकारांनी अंगिकारलेल्या या परंपरेला डेडॅलिक शैली (Daedalic style) म्हणून ओळखले जाते. ही शैली विशेषतः क्रीट येथे बहरली. तेथील डेडलस (Daedalus) या कलाकारावरून ही शैली ओळखली जाते.

लांब झगा घातलेली स्त्री प्रतिमा, पारीन संगमरवर

औक्झेर, फ्रान्स येथील संग्रहालयातील तळघरात इ.स. १९०९ मध्ये मिळालेली क्रीटमध्ये बनविली गेलेली डेडॅलिक शैलीतील इ.स.पू.सु. ६५० ते ६२५ या काळातील स्त्री प्रतिमा (The Lady of Auxerre) एक उत्तम उदाहरण मानली जाते. ही स्त्री प्रतिमा चुनखडकात बनविलेली असून तिची उंची ७६ सें.मी. इतकी आहे. ही आता पॅरिस येथील लूव्र संग्रहालयात जतन केलेली आहे. संपूर्ण शरीर झाकलेला उंच झगा, त्याखाली दिसणारे लांब पाय, लहान धड, त्यावर मोठे डोके अशा अप्रमाणित असलेल्या ह्या प्रतिमेची कंबर मिनोअन कलेमध्ये दिसणाऱ्या प्रतिमांसारखीच अरुंद व बारीक आहे. उजवा हात सरळ खाली व डावा हात छातीजवळ घेतलेली, सरळ खांदे, त्रिकोणी चेहऱ्यावर छोटे कपाळ, विणलेले आडव्या पट्ट्यांमध्ये दाखविलेले खांद्यापर्यंत आलेले लांब केस पौर्वात्य संस्कृतीचा प्रभाव दर्शवितात.

थेरा (Thera) येथे इ.स.पू. सातव्या शतकाच्या मध्यातले सर्वांत जुने चुनखडकातले शिल्प सापडले. ह्या काळात कांस्यशिल्पांमध्ये पाया असलेल्या मुक्तस्थायी प्रतिमा नित्याच्या होत्या. यात वीर योद्धा, सारथी आणि वाद्यवादक असे महत्त्वाकांक्षी विषयही हाताळलेले दिसतात.

सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून जीवनमानापेक्षा मोठ्या आकारातील संगमरवरातील स्मारकशिल्पांची निर्मिती होऊ लागली. ह्या शिल्पांची निर्मिती कुणाच्या तरी स्मरणार्थ केलेली होती. ही शिल्पे संकुलांमध्ये देवतांना प्रतिकात्मकरित्या अर्पण करण्यात आली अथवा मृतांच्या स्मरणार्थ थडग्यांवर उभारण्यात आली.

ग्रीसमध्ये मोठ्या आकाराच्या दगडांतील शिल्पप्रतिमा इ.स.पू. ६१५ ते ५९० ह्या काळापासून घडविण्यात येऊ लागल्या. ह्यातील तरुण पुरुषांच्या अनावृत्त प्रतिमांना ‘कौरोस’ (kouros) तर वस्त्रधारी स्त्रीप्रतिमांना ‘कोरे’ (kore) असे संबोधतात. कौरोस शिल्पांमागे इजिप्तच्या स्मारकप्रतिमांप्रमाणे कोणताही स्पष्ट धार्मिक उद्देश नव्हता; परंतु ह्या प्रतिमा कधीकधी अपोलो देवाचे तर बऱ्याचदा स्थानिक वीरांचेही प्रतिनिधित्व करत.

‘क्लेओबिस’ व ‘बिटोन’ कौरोस प्रतिमा, संगमरवर.

सुरुवातीच्या काळातील कौरोस प्रतिमा ह्या इजिप्तच्या स्मारकप्रतिमांप्रमाणे फारच ताठर स्वरूपाच्या होत्या. पाया असलेल्या ह्या प्रतिमा एकाच अखंड दगडात कोरलेल्या असून, उभ्या स्थितीतल्या ह्या प्रतिमांचे पाय जवळ घेतलेले, दोन्ही हात बाजूला सरळ खाली सोडलेले, तर समोर बघत असलेले निर्विकार डोळे चेहऱ्यावर कोणत्याही हावभावाशिवाय कोरलेले दिसतात. ह्या स्थिरप्रतिमा काळानुसार विकसित होतांना दिसतात. हळूहळू त्यांचे केस व स्नायूंच्या दाखविण्यात आलेल्या तपशिलामुळे प्रतिमा अधिक जिवंत होत गेल्याचे आढळते. ह्या शैलीतील उत्तम उदाहरण म्हणजे डेल्फाय (साधारण इ.स.पू. ५८०) येथे समर्पित करण्यात आलेल्या अर्गोस (Argos) येथील ‘क्लेओबिस’ व ‘बिटोन’ (Kleobis & Biton) या दोन भावांच्या प्रतिमा होय. संगमरवरात केलेल्या या ६ फूट ४ इंच इतक्या उंचीच्या अनावृत्त प्रतिमांचे खांदे व चेहरा रुंद असून त्यांच्या खांद्यांच्या स्नायूंचा ताण दाखवून खांदे थोडे उतरते केलेले दिसतात. तसेच प्रतिमेला गतिशील हालचालीची जाण देण्याच्या उद्देशाने प्रामुख्याने डावा पाय पुढे उचललेला दाखविण्यात आलेला आढळतो. त्यांच्या खांद्यापर्यंत येणाऱ्या लांब कुरळ्या केसांच्या वेण्या सरळ रांगांमध्ये झालरीप्रमाणे दाखवलेल्या आहेत.

या कालावधीच्या शेवटीशेवटी या प्रतिमांमधील सुरुवातीचा ताठरपण जाऊन त्याची जागा स्वाभाविकतेने घेतलेली दिसते. ग्रीक शिल्पकारांना मानवी शरीरशास्त्रामध्ये प्रभुत्व यायला लागल्याचे दिसते. तसेच शिल्पातील संतुलनाची समस्या आणि त्याचे हावभाव व गतीमय हालचाल दाखवण्याचा दृष्टीकोन निर्माण झालेला आढळतो.

कोरे ह्या स्त्रीप्रतिमांचाही  (इ.स.पू. ६६० ते ५००) क्रमविकास कौरोस शिल्पांप्रमाणे झालेला दिसतो. ग्रीकमध्ये कोरे ह्या शब्दाचा अर्थ अविवाहित युवती वा कुमारी असा होतो. कोरे प्रतिमा अथेन्स, आयोनिया, सिक्लॅडीझ आणि कॉरिंथ इत्यादी ठिकाणी संपूर्ण ग्रीसमध्ये सापडल्या. अथेन्स येथील अक्रॉपलिस येथे सर्वांत जास्त प्रमाणात कोरे प्रतिमा सापडल्या. सुरुवातीच्या काळातील कोरे प्रतिमा ह्या अगदीच ठोकळ्याप्रमाणे केलेल्या असून त्यात स्त्रीत्व आणि नाजूकपणाचा अभाव दिसतो. कौरोस शिल्पांप्रमाणे पाया असलेल्या या उभ्या कोरे प्रतिमांच्या चेहऱ्यांवर आर्ष काळाचे ठराविक असे भावनाविरहित स्मित (archaic smile) दाखविलेले दिसते. बऱ्याचदा ह्या प्रतिमांचा एक हात पुढे घेतलेला अथवा हातात काही घेतल्याचे अविर्भाव दाखवलेले दिसतात. ह्या स्त्रीप्रतिमांनी जाड आणि कधीकधी अलंकारप्रचुर वस्त्रभूषा परिधान केलेली दाखवलेली दिसते. काळानुसार जसा पोषाखाच्या पद्धतीत बदल होत गेला. तसा ह्या कोरे प्रतिमांच्याही वस्त्रभूषेत बदल झालेला दिसून येतो; लांब जाड झग्याचे रूपांतर लोकरीच्या सैल अंगरख्यामध्ये झालेले आढळते. नंतरच्या काळातील काही कोरे प्रतिमा वस्त्रांच्या दृश्य परिणामासाठी रंगवलेल्या असून एकतर काठावर किंवा वस्त्रावर पुढील भागात एकाच मोठ्या दागिन्याप्रमाणे नक्षीकामाचे आकृतिबंध चित्रित केलेले दिसतात. त्यांची वस्त्रे वास्तववादी वाटतात. कौरोस शिल्पांप्रमाणेच कोरे शिल्पांचेही खांद्यापर्यंत आलेले कुरळे केस झालरीसारखे दाखविलेले असून बऱ्याचदा त्यांच्या डोक्यावर मुकुटही दाखवलेला दिसतो. उदाहरणार्थ, फ्रेजीक्लीया ही प्रतिमा(Phrasikleia).

गोर्गोन मेडुसा – पेडीमेंट

आर्ष काळातील अनेक थडग्यांमधून व मोठ्या इमारतींमधून उठावशिल्पे मिळाली आहेत. उल्लेखनीय उठावशिल्पांमध्ये इटलीतील पेस्तुम येथील संग्रहालयात जतन केलेली फोस डेल सेले (Foce del Sele) इथल्या इमारतीतील सुमारे इ.स.पू. ५५० व ५१० काळातील दोन डोरिक शिल्पपट्टीतील उठावशिल्पे; डेल्फाय येथील सिफनियन भांडारातील शोभेची पट्टी (इ.स.पू. ५२९ – ५२२) तसेच कॉर्फू येथील संग्रहालयात जतन केलेला इमारतीच्या दर्शनी भागावरील लहान त्रिकोणी भाग अर्थात पेडीमेंट (इ.स.पू. ५८०) यांचा समावेश होतो. मध्यभागी ९ फूट ४ इंच उंची असलेल्या ह्या पेडीमेंटमध्ये केंद्रस्थानी सापांचा कंबर पट्टा परिधान केलेली ग्रीक पुराणातील गोर्गोन मेडुसा ही देवता, तिच्या डावीकडे तिचा मुलगा ख्रिसॉर व तिच्या दोन्ही बाजूंना चित्ता दाखविलेला आहे.

आर्ष काळातील शिल्पकारांनी ह्या प्रतिमा अधिक स्वाभाविक आणि नैसर्गिक घडविताना वास्तविक आकार लक्षात न घेतल्याने ह्या प्रतिमांमध्ये, शीर व धड यांचे प्रमाण १:७ इतके असल्याचे आढळते. इ.स.पू. ५००च्या सुमारास ग्रीक शिल्पकारांनी आधीच्या पौराणिक कलेतील कठोर नियमांवर मात करून वास्तविक आयुष्यात बघितलेल्या गोष्टी शिल्पांत उतरविण्यास सुरुवात केलेली दिसते. त्यामुळे आधीच्या तुलनेत आर्ष काळाच्या अखेरच्या शिल्पप्रतिमा अधिक जिवंत वाटतात.

संदर्भ :

  • Boardman, John ed., The Oxford History of Classical Art, Oxford, 1993.
  • Boardman, J., Greek Sculpture : The Archaic Period, London, 2005.

समीक्षक : नितीन हडप