टेल अस्मार येथील प्रतिमा, इ.स.पू. २९०० ते २५५०.

मेसोपोटेमियन शिल्पकलेतील दुसरा महत्त्वपूर्ण कालावधी. प्रारंभिक कांस्य (ब्राँझ) युगात प्रारंभिक राजवंश काळा’मध्ये (इ.स.पू. २९०० ते २३३४) मेसोपोटेमियात सुमेरियन साम्राज्याचा उदय झाला. या काळाचे (१) इ.स.पू. २९०० ते २८००, (२) इ.स.पू. २८०० ते २६०० – गिलगामेश काळ व (३) इ.स.पू. २६०० ते २३३४ अशा तीन उपकाळात विभाजन केले जाते. प्रारंभिक राजवंश कालावधीत मेसोपोटेमियात सुमेरियन शिल्पकलेच्या दोन परंपरागत शैली प्रसिद्ध होत्या. यातील पहिली शैली इराक मधील ‘टेल अस्मार’ (प्राचीन ईशनुना Eshnunna) येथील इ.स.पू. २९०० ते २५५० मध्ये मिळालेल्या १२ प्रतिमांच्या एका समूहामध्ये भौमितिक आकारांचा वापर करून अतिशय हुशारीने व सौंदर्यात्मक दृष्टीने साकारलेली स्पष्ट आढळते. यामध्ये दहा पुरुष तर दोन स्त्री-प्रतिमा असून त्यांची उंची २१ सेमी ते ७२ सेमी इतकी आहे. यातील आठ प्रतिमा जिप्समच्या, दोन चुनखडकांतील आणि सर्वांत लहान असलेली एक प्रतिमा ॲलॅबॅस्टरमध्ये अशाप्रकारे बनविण्यात आलेल्या आहेत (चित्र. क्र. ०३). या प्रतिमा टेल अस्मार येथील चौकोनी मंदिरात अबू देवाला समर्पित केलेल्या होत्या. या संचयातील सर्व प्रतिमा उभ्या आहेत. तसेच त्यांचे दोनही हात प्रार्थनेच्या अविर्भावात छातीजवळ जोडलेले दाखवण्यात आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील शैलीमध्ये तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षमपणे कोरलेल्या प्रतिमा असून त्या वास्तववादी असलेल्या आढळतात. यात बऱ्याचदा व्यक्तिचित्रणही केलेले दिसून येते. थोड्या किरकोळ फरकाने या शिल्पप्रतिमा सुमेरियन रूढिबद्ध कला-वैशिष्ट्यांची ओळख करून देतात.

इबिह दुसरा याची शिल्पप्रतिमा, ॲलॅबॅस्टर

सुमेरियन शिल्पांचा उपयोग प्रामुख्याने मंदिरांच्या सजावटीसाठी व धार्मिक विधीचे साधन म्हणून केला गेला. एखाद्या संप्रदायाच्या वा धर्माच्या म्हणून ओळखता येण्याजोग्या देव-देवतांच्या शिल्पप्रतिमा यांत सापडत नाहीत. या  काळातील दगडांत बनविलेल्या अनेक समर्पित शिल्पप्रतिमा अस्तित्वात आहेत. यांतील पुरुष प्रतिमा उभ्या आणि हात समोरच्याशी मिळवण्याच्या आविर्भावात दाखवलेल्या दिसतात. सहसा कमरेच्या वरील भाग नग्न असलेल्या या प्रतिमांना खाली लोकरीतील नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा घागरा (kaunakes skirt) घातलेला दाखवला आहे. बऱ्याचदा अंगरख्यासारख्या वस्त्राने एक खांदा झाकलेला दिसतो. व्यवस्थित छाटलेले व काळ्या रंगात रंगविलेले लांब केस व दाट दाढी या पुरुष प्रतिमांना आहे. त्यांचे डोळे आणि भुवयांवर रंगीत जडावाचे काम करून विशेष महत्त्व दिलेले दिसते. याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणजे इ.स.पू.सु. २४०० मधील पारदर्शक ॲलॅबॅस्टरमध्ये बनविलेली इबिह दुसरा (Ebih- II) याची विणलेल्या टोपलीवजा उशीवर बसलेली शिल्पप्रतिमा. वस्त्रहीन धड असलेल्या या पुरुष-प्रतिमेची कंबर थोडी दाखवलेली आहे. तिचे दोन्ही हात प्रार्थना करत असेलल्या आविर्भावात छातीजवळ जोडलेले आहेत. प्रतिमेच्या कमरेखाली सुमेरियन पद्धतीचा घागरा आहे. प्रतिमेच्या चेहऱ्याला कोरीव दाढीमुळे उठाव आलेला दिसतो, तर सफाईदार ओठांमुळे किंचित हास्य दिसते. प्रतिमेचे लक्षवेधी निळे डोळे काळजीपूर्वक तयार करण्यात आलेले असून सुभाज, शिंपले व नीलाश्म (लॅपिस लॅझ्युली) यांच्या मिश्र वापराने डोळ्यांच्या पापण्या तसेच डोळ्यांतील बाहुल्या व बुबुळे दाखवलेली आहेत.

तेल्लोह-इराक येथील उर-नानशे उठाव-शिल्प, चुनखडक.

लेखनशैलीचा शोध लागण्याच्या आधीपासूनच अगदी ओबडधोबड स्वरूपातील असले तरी दगडांमधील कोरीवकाम हे सुमेरियन कलाकारांचे अभिव्यक्त होण्याचे आवडते माध्यम होते. प्राथमिक राजवंश काळाच्या शेवटी ही शैली रूढिबद्ध झालेली दिसते. सर्वाधिक प्रचलित उत्थितशिल्पांमध्ये दगडातील साधारण १ फूट वा अधिक चौरस आकारांतील कोरलेल्या शिल्पांचा समावेश होतो. मंदिरांच्या भिंतींवर मध्यभागी भोक पाडून ही शिल्पे आडव्या रांगांमध्ये जोडलेली आहेत. या शिल्पांच्या विषयांमध्ये मेजवानी, बांधकाम क्रिया असे विषय प्रामुख्याने दिसतात. एखाद्या समारंभाच्या स्मृत्यर्थ ही शिल्पे केलेली आढळतात. या शिल्पांचा निश्चित वापर ज्ञात नसला, तरी प्रामुख्याने मंदिरांतून सापडली असल्याने त्यांची निर्मिती समर्पित शिल्पे म्हणून झाली असावी. प्राचीन सुमेरमधील गिरसु (आत्ताचे इराक मधील तेल्लोह शहर) येथे सापडलेल्या एका उत्थितशिल्प फरशीवर सुमेरियन पद्धतीचा घागरा घातलेल्या ‘उर-नानशे’ या प्रारंभिक तिसऱ्या सुमेरियन कालावधीतील लॅगॅशच्या पहिल्या राजवंशातील पहिल्या राजाचे (इ.स.पू. २५००) चित्रण केलेले आढळते. मध्यभागी छिद्र असलेली व कोरीवलेख असलेली ही फरशी चुनखडकातील आहे. यावर दोन भागात चित्रण केलेले दिसते. यात डावीकडे वरच्या भागात  सुमेरियन पद्धतीचा घागरा घातलेला उर-नानशे राजा एका मंदिराचे बांधकाम करणाऱ्याच्या भूमिकेत दर्शविलेला दिसतो, राजाच्या डोक्यावर विटांची टोपली दाखवलेली असून त्याच्यानंतर तसाच घागरा घातलेली त्याची राणी व नंतर मुले दाखवलेली आहेत. तर खालच्या भागात उजवीकडे राजाने तसेच वस्त्र परिधान केलेले दाखवलेले असून तो सिहांसनावर बसलेला आहे व त्याच्या सभोवताली न्यायालयीन सदस्य उभे असलेले दाखवले आहेत. दोन्ही भागातील चित्रणात राजा उर-नानशे व इतर पदानुक्रमित वर्गीकरणाप्रमाणे प्रमाणात दर्शविलेले असल्याने राजा इतरांपेक्षा मोठ्या आकारात कोरलेला दिसतो.

निप्पूर येथील सुमेरियन स्त्री-प्रतिमा, चुनखडक.

सुमेरियन स्त्री-प्रतिमांची केशरचना वेगळी असून उल्लेखनीय अशी आहे. यांत एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत केसांची जाड गुंडाळी केलेली असून मागे केसांचा झुबका ठेवलेला आढळतो. तसेच बऱ्याचदा केस घडी केलेल्या तागाच्या शिरोभूषणामागे लपविलेलेही दिसतात. इनान्ना देवीच्या निप्पूर येथील मंदिरातील (इ.स.पू.सु. २६०० — २५००) एका तळघरामध्ये सुमेरियन देवींच्या अनेक शिल्पप्रतिमा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यातील साधारण ९.६ इंच उंचीची चुनखडकातील एक अखंड उभी स्त्री-प्रतिमा गिलावा केलेल्या मातीच्या विटांच्या बाकामध्ये सापडली. प्रतिमेचे कपडे डाव्या खांद्यावरून लपेटलेले दाखवलेले असून त्यावरील घड्या कपड्याच्या काठांवर दोन कोरीव रेघांनी दर्शविलेल्या दिसतात. पायांची बोटे व घोटा स्पष्टपणे कोरला असून प्रतिमेचे कुरळे केस चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी घेऊन मागे बांधलेले दिसतात. प्रतिमेचा फक्त एकच डोळा अस्तित्वात राहिलेला असून तो शिंपले व नीलमणी वापरून केलेला आहे. या स्त्री-शिल्पासारखी अनेक शिल्पे निप्पूर येथील मंदिराच्या अंतर्गत सजावटीसाठी केलेल्या बाकांमध्ये पुरलेली आढळतात. ही बुद्धिपुरस्सर केलेली समर्पित-शिल्पे असल्याचे लक्षात येते.

रानटी बोकड, संमिश्र धातू, उंची ४० सेमी., इ.स.पू. २६०० – २३५०.

सुमेरियन शिल्पकारांनी दगड उपलब्ध नसेल तेव्हा आयात कराव्या लागणाऱ्या धातूसारख्या पर्यायी माध्यमांचाही वापर केलेला दिसतो. उपलब्ध झालेल्या धातूच्या ओतीव शिल्पांवरून असे लक्षात येते की, येथील कलाकारांनी साच्यात मेण वितळवून धातूच्या ओतकाम तंत्राची (lost-wax technique) कला अवगत केली होती. सामान्यापेक्षा अर्ध्या तसेच आणखी छोट्या आकारातील आणि प्रमुख माध्यम तांबे असलेल्या संमिश्र धातूतील कितीतरी शिल्पाकृती सापडल्या आहेत. यांशिवाय सोने, चांदी, कांस्य, शिसे, सोने व चांदीचा मिश्र धातू इलेक्ट्रम व कथिल यांचाही वापर शिल्पनिर्मितीसाठी केल्याचे आढळते. ऊरूक काळापासूनच द्विघटकी, तृतीयक व चतुष्क मिश्रधातूंचा वापर करण्यात आलेला दिसतो. धातूंतील अनेक प्रकारचे दागिने, वाद्ये, कलश व जडावकाम असलेल्या व त्याशिवाय छोट्या शिल्पप्रतिमा मंदिरांतून व थडग्यांतून मिळालेल्या आहेत.

राणी ‘पू-अबी’च्या थडग्यातून मिळालेली बैलाचे शीर असलेली सारंगी, संमिश्र माध्यम.

प्राथमिक राजवंश कालावधीतील (साधारण इ.स.पू. २६५० ते २४००) उल्लेखनीय शिल्पांमध्ये अर येथील राजेशाही दफनभूमीमध्ये मिळालेल्या ‘झाडामधील मेंढ्यांची जोडी’, ‘तांब्यात बनविलेला बैल’ आणि ‘सारंगीवरील बैलाचे शीर’ यांचा समावेश होतो. इ.स.पू.सु. २६०० मधील राणी ‘पू-अबी’च्या अर येथील थडग्यातून बैलाचे शीर असलेली सारंगी प्राप्त झाली.  खऱ्या बैलाचे शीर वापरून तयार केलेल्या या शिल्पाच्या सजावटीसाठी नीलाश्म, शिंपले, लाल चुनखडक यांचा वापर केलेला आढळतो. या बैलाच्या डोळ्यांसाठी नीलाश्म व शिंपले, केस व दाढी साठीही नीलाश्म, तर पूर्ण चेहऱ्यावर व शिंगांवर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. ही संपूर्ण सारंगी ४४ इंच उंचीची असून त्या सारंगीचा आकार त्या बैलाचे शरीर असल्याप्रमाणे केलेला आहे.

झुडपांत उभा असलेला मेंढा, अर, संमिश्र माध्यम.

मेंढ्यांच्या जोडीतील एक मेंढा सोन्याचा मुलामा दिलेल्या झाडाच्या फांदीवर पुढील दोन पाय ठेऊन उभा आहे. मेंढ्याचे पाय व डोके यांवर सोन्याचा मुलामा दिलेला आहे, तर कान तांब्यामध्ये; शिंगे, डोळे आणि खांदे व त्यांवरील लोकर नीलाश्मात, बाकी संपूर्ण शरीरावरील लोकर पांढऱ्या शिंपल्यात केलेली आढळते. हा मेंढा व झाड एका छोट्या आयताकृती पायावर बसविलेले असून त्यांवर शिंपले, लाल चुनखडक व नीलाश्म यांचे कुट्टिमचित्रण केलेले आढळते. या मेंढ्याच्या पूर्ण शिल्पाची उंची ४५.७ से.मी. इतकी आहे.

दंडगोलाकार शिक्के व त्यांचा वापर करून केलेल्या छपाईचा नमुना.

लेखनशैलीचा शोध लागण्याच्या आधीपासूनच वापरात असलेले विविध प्रकारचे दंडगोलाकार शिक्के या काळात खूप मोठ्या प्रमाणात वापरात होते. इतर मुद्रा चिन्हांप्रमाणे यांचा वापर होत असला तरी उत्कीर्ण छपाई करण्याकरता मातीवर गोल फिरवण्यासाठी तयार केलेल्या या दगडांवरील दंडगोलाकार शिक्क्यांच्या वर केलेल्या कोरीव कामाचा सुमेरियन कलेतील सर्वोत्तम नमुना म्हणून उल्लेख केला जातो. या शिक्क्यांवरील रेषांकित नक्षीकामाचे कौशल्य दाखवणाऱ्या बारीक कोरीवकामासाठी धावते प्राणी, पौराणिक कथा, धार्मिक विधी यांसारखे विषय वापरलेले दिसतात. प्राथमिक राजवंश कालावधी एक मध्ये शिक्क्यांवरती भौमितिक रूपचिन्हे आणि शैलीबद्ध चित्राकृती काढलेल्या आढळतात. नंतरच्या काळात वास्तविक प्राणी व पौराणिक प्राणी यांच्यातील लढतीच्या दृश्यांचा प्रभाव जास्त दिसून येतो.

संदर्भ :

  • Leick, Gwendolyn, Historical Dictionary of Mesopotamia, 2003.
  • Oppenbein, Leo, Ancient Mesopotamia portrait of a dead civilization, Chicago, 1977.
  • Seton, Lloyd, Art of the Ancient Near East, New York, 1961.
  • Steele, Philip, Eyewitness Ancient Iraq, London, 2007.