मेसोपोटेमियन शिल्पकलेमध्ये बॅबिलोनियन कलेला समकालीन असणारी तिच्यापेक्षा वेगळी पण प्रभावी ठरलेली ॲसिरियन कालावधीतील कला इ.स.पू.सु. १५०० पासून निर्माण झाली होती. प्रामुख्याने इ.स.पू. ९११ – ६१२ या काळात नव-ॲसिरियन साम्राज्यात उभारलेल्या मोठ्या प्रासादांमुळे उत्थितशिल्पांना जास्त वाव मिळाल्याचे आढळते. अस्तित्वात राहिलेल्या इतर कलाकृतींमध्ये बहुसंख्य असे दंडगोलाकार शिक्के, काही दगडांतील उत्थितशिल्पे, मंदिरातील प्रतिमा, दरवाज्यासाठी वापरलेल्या कांस्यातील उत्थित-पट्ट्या यांचा समावेश होतो. इराकमधील निनेव्ह येथील निमरूद येथून नव-ॲसिरियन काळातील (इ.स.पू. ९०० ते ७००) हस्तिदंतामध्ये केलेल्या छोट्या उत्थित-पट्ट्या, शिल्पप्रतिमा अशा कितीतरी कलाकृती उपलब्ध झाल्या आहेत. निमरूद येथील कलाकृतींमध्ये ‘माणसाला चावणारा सिंह’ या बारीक कलाकुसर केलेल्या उत्थित-शिल्पाचा विशेष उल्लेख केला जातो. या शिल्पावरती सोन्याची पाने व रंगाचा मुलामा दिलेला होता.
राजा सारगॉन दुसरा याच्या खोर्साबाद येथील प्रासादातून सुमेरियन राजा गिलगामेश याचे उत्थित शिल्प मिळाले. अकेडियन काळात गिलगामेश राजावर महाकाव्य लिहिण्यात आले होते, या काव्याच्या अनुसार हे शिल्प तयार करण्यात आल्याचे आढळते. जवळजवळ १६ फूट उंचीच्या या शिल्पामध्ये गिलगामेश राजाला प्राण्यांच्या नियंत्रकाच्या रूपात दर्शविलेले दिसते. त्याने त्याच्या डाव्या हातात सिंहाला दाबून धरलेले आहे, तर त्याच्या उजव्या हातात वक्राकार धारदार शाही शस्त्र पकडलेले दिसते. त्याचे शीर व चेहऱ्यावरील बारकावे जसे दाढी, डोळे, डोक्यावरील केस हे ॲसिरियन राजे वा अधिकाऱ्यांप्रमाणे दाखवलेले आढळतात. त्याच्या गुडघ्यापर्यंत सदरा असून त्यावरून शाल ओढलेली दाखवली आहे. शिल्पाच्या शैलीवरून ते इ.स.पू. ७१३ ते ७०६ या काळातील असावे.
ॲसिरियन काळातील राजांनी मोठमोठ्या प्रसादांची निर्मिती केली. या प्रसादांमधील भिंतीवर लावण्यात आलेल्या ॲलॅबॅस्टर व जिप्समच्या फरशांवर कमी उठावातील शिल्पचित्रे कोरलेली आढळतात. ॲसिरियन उत्थित-शिल्परचनांमधील विषय क्वचितच धर्माशी संबंधित असल्याचे दिसून येतात. त्यात पंखयुक्त मानवाकृतींच्या अथवा जिनीच्या रूपातील अंधश्रद्धावादी प्रतिके अधूनमधून आढळतात. एखाद्या सत्काराच्या समारंभाच्या दृश्यातून वा राजाच्या यशासंबंधित चित्रमय कथांवरून राजाचा गौरव करणे हेच या उठावचित्रांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे दिसून येते. यांतील सर्वांत लोकप्रिय विषयांमध्ये राजाची स्तुती करणारी शिकारीची दृश्ये, युद्धप्रसंगातील राजा आणि सैन्याच्या विजयाच्या तपशीलवार दृश्यांचा समावेश होतो. उत्थित-शिल्पातील प्राणी तसेच मानवाकृती काळजीपूर्वक निरीक्षणाअंती रेखाटल्याचे त्यांच्यातील नैसर्गिकतेतून लक्षात येते. ॲसिरियन शिल्परचनांमध्ये स्त्री-प्रतिमा व लहान मुलांच्या प्रतिमा क्वचितच दाखवल्याचे आढळते. पुरुषाकृतींना सहसा नग्न न दाखवता त्यांचे सर्वांग झाकणाऱ्या भरजरी-शाही कपड्यातच दाखवलेले असले तरी त्यांच्या उघड्या हातापायांच्या स्नायूंचे बारकावे लक्षणीय आहेत.
‘राजा अशुरबनिपालची सिंहाची शिकार’ (इ.स.पू. ६४५ ते ६३५) या उत्थित-शिल्पात अशुरबनिपाल (इ.स.पू ६६८ ते ६२७) हा शेवटचा ॲसिरियन राजा सिंहाबरोबर झुंज देत त्याची शिकार करत आहे. अशुरबनिपालने सिंहाच्या डोक्यात मारलेल्या बाणामुळे खवळून अंगावर आलेल्या सिंहाच्या पोटात उजव्या हाताने तलवार खुपसलेली दाखवलेली तर डाव्या हाताने सिंहाचा गळा पडकलेला दर्शविला आहे.