प्राचीन अभिजात ग्रीक कलेचा प्रभाव यूरोपीय कलाविश्वावर अत्यंत दीर्घकालीन आहे. तो साहित्य, तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्र या क्षेत्रांतही दिसून येतो. प्रमाणबद्धता आणि सुसंवाद या ग्रीक सौंदर्यकल्पना या प्रभावाच्या मुळाशी आहेत. ग्रीक कलेचा मुख्य आस्थाविषय माणूस हाच होय. त्याची दृश्य अभिव्यक्ती मूर्तिकलेत दिसते. लय व समतोल यांविषयीची ग्रीकांची स्वाभाविक ओढ वास्तुकलेत प्रकटली आहे, तर वास्तव जगाविषयीची त्यांची गाढ आसक्ती कलशचित्रणातून साकार झाली आहे. ग्रीक कलेची जडणघडण ज्या वातावरणात झाली, ते वातावरण प्राचीन ईजिप्तमधील वातावरणाहून सर्वस्वी भिन्न होते.
प्राचीन ग्रीक कला-संस्कृती भूमध्य सागरातील ग्रीसची मुख्य भूमी आणि इजीअन समुद्रातील बेटांवर व आजूबाजूच्या भू बेटांवर उदयास आली. ही संस्कृती अलेक्झांडर द ग्रेट याच्या अस्तापर्यंत म्हणजे इ.स.पू. ३२३ पर्यंत टिकली. इ.स.पू. ११०० च्या आधीच्या कालावधीस ‘इजीअन संस्कृती’ असे संबोधिले जाते. इजीअन कला-संस्कृती साधारण इ.स.पू. ३००० पर्यंत सिक्लाडीझ बेटांवरील सिक्लाडिक, सुमेरियन आणि मेसोपोटेमियन कलेचा प्रभाव असलेल्या क्रीट येथील मिनोअन संस्कृतीपर्यंत मागे जाते. इ.स.पू. सुमारे १५५०च्या काळात प्रलयंकारी भूकंपामुळे मिनोअन लोकजीवन उद्ध्वस्त झाले. नंतरच्या काळात इ.स.पू. सोळाव्या शतकापासूनच क्रीटच्या प्रभावाखाली आलेल्या तसेच ग्रीसच्या मुख्य भूमीवरील हेलेडिक (Helladic – हेलास जातीच्या लोकांवरून पडलेले नाव) संस्कृतीचे प्रमुख केंद्र असलेल्या मायसीनी येथील लोकांनी क्रीटवर वर्चस्व प्रस्थापित केले. यावरूनच या भूप्रदेशातील संस्कृती मायसीनीअन संस्कृतीच्या नावानेही ओळखली जाते. या मायसीनीअन संस्कृतीमध्ये प्राचीन ग्रीक संस्कृतीचा उगम असल्याचे संशोधक सांगतात.
ग्रीक शिल्पकला सामान्यतः मायसीनीअन काळ, अंधःकार काळ, भौमितिक काळ, आर्ष काळ, अभिजात काळ आणि ग्रीकांश वा हेलेनिस्टिक काळ या काळांप्रमाणे विभागली जात असली तरीही आर्ष काळापासून ग्रीकांच्या कलाकृतींमध्ये शिल्पकलेने एक आदर्श ओळख निर्माण केलेली दिसते. अभिजात काळात प्रथमच शिल्प प्रतिमांमध्ये मानवी शरीरशास्त्राप्रमाणे चित्रण करणे योग्य मानले जाऊ लागले. परिणामी दगड आणि कांस्यामध्ये घडविलेली या काळातील शिल्पे चिरस्थायी ठरली. मानवाकृतींमधील ताठर आणि गतिहीन अवस्था जाऊन त्यांची जागा अधिक स्वतंत्र व त्रिमितीय गतिमान हालचालींनी जागा घेतलेली दिसते. ज्यामुळे शिल्पे बघणारा त्याच्या सौंदर्याच्या मूल्यांकनासाठी मानवी शरीराशी तुलना करत असे. या काळात मानवी शरीर हे प्रथमच अभ्यासाचा विषय बनून त्याकडे देवाप्रमाणे बघण्याचा दृष्टीकोन निर्माण झाल्याचे दिसून येते.
अभिजात काळात संगमरवराचे महत्त्व अधिक वाढले. या माध्यमात सर्वच शिल्पकारांनी शिल्प घडविण्यासाठी प्रयत्न केलेला दिसतो. काही कालावधीतच ग्रीक शिल्पकारांनी संगमरवर या माध्यमावर प्रभुत्व मिळविले आणि मानवाचे स्वतंत्र अस्तित्व समजून घेत उल्हसित मुक्त हालचाली आणि भावमुद्रा त्यांनी शिल्पातून दाखविल्या. या काळातील मुक्त हालचाल दाखविणारे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मिरोन (Myron, इ.स.पू. ४८०-४४०) या शिल्पकाराच्या मूळच्या कांस्यामधील The Discus Thrower (म. शी. ‘थाळी फेकणारा खेळाडू’ – इ.स.पू. ४६०-४५०) या त्रिमित शिल्पाची संगमरवरातील रोमन प्रतिकृती. या शिल्पात कार्यरत खेळाडूच्या स्नायूंची गतीमान स्थिती एखाद्या छायाचित्रात पकडल्याप्रमाणे दाखवली आहे. थाळी फेकणाऱ्या या खेळाडूच्या शरीराला पडलेला पीळ अचूक दाखवलेला असून त्याच्या स्नायूंचे आकुंचन व प्रसरण यांचा शिल्पात अप्रतिम संयोग दिसतो.
ग्रीकांच्या कलाविश्वात तात्कालीन, शाश्वत, क्षणिक असे अनेक विषय हाताळलेले आढळून येतात. ग्रीक शिल्पाकृती देव-देवता, वीर पुरुष, विविध प्रसंग, पौराणिक प्राणी आणि सामान्य ग्रीक संस्कृती यांबद्दल माहिती पुरवीत असल्याने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. खरेतर खूपशा मूळ ग्रीक शिल्पाकृती नष्ट होऊन आता ज्या अस्तित्वात आहेत, त्या रोमन शिल्पकारांनी तयार केलेल्या ग्रीक शिल्पाकृतींच्या प्रतिकृती आहेत. रोमनांवर ग्रीकांचा असलेला प्रभाव आणि त्यांना ग्रीक शिल्पांबद्दल असलेला आदर या प्रतिकृतींवरून लक्षात येतो. रोमन शिल्पकारांनी जर या प्रतिकृती निर्माण केल्या नसत्या, तर कितीतरी ग्रीक पुरावे प्राचीन काळीच नामशेष झाले असते. उदा., द डाइंग गॉल हे मूळ शिल्प आज अस्तित्वात नाही; परंतु त्याची सफेद संगमरवरातील रोमन प्रतिकृती रोममधील कॅपिटोलिन (Capitoline) या संग्रहालयात जतन केलेली आहे. मूळ कांस्यशिल्पाचा शिल्पकार जरी माहित नसला, तरी त्याची निर्मिती राजा अटालस पहिला (Attalus I) याने जेव्हा अनातोलियाच्या गलातियन (Galatian) लोकांवर विजय मिळवला, त्या कालावधीत (इ.स.पू. २३०-२२०) झाली असावी. मुळात रंगवलेल्या या करुणामय शिल्पात जखमी गॉलयोद्धा दाखवलेला आहे. खाली पडलेल्या ढालीवर तो मरणोन्मुख अवस्थेत पडलेला असून, त्याच्या बाजूला तलवार, पट्टा व एक वक्र कर्णा पडलेला दाखवलेला आहे. गॉलची ढाल, गळ्याभोवतीचा पिळीचा अलंकार, त्याच्या डोक्यावरील केसांचे पडलेले पीळ, मिशा यांतील बारकावे विशेष उल्लेखनीय आहेत. शिल्पकाराने अभिव्यक्त केलेल्या गॉलच्या शरीरावरील स्पष्ट दिसणाऱ्या जखमांवरून तो मरणयातना भोगत आहे, हे समजून येते. ग्रीक शिल्पकारांनी शिल्पनिर्मितीसाठी ग्रीसमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्रामुख्याने दगड, संगमरवर, चुनखडक अशा माध्यमांचा वापर केलेला दिसतो. ग्रीक कलेमध्ये एक विशिष्ट प्रकारचे स्वातंत्र्य तर दिसतेच; पण त्याबरोबरच नम्यता आणि सौम्यताही आढळते. ग्रीक कलाकारांसाठी त्यांच्या आजूबाजूचे दृश्य आणि भौतिक विश्व हेच सत्य असावे, हे त्यांच्या कलाकृतींवरून आढळून येते.
प्राचीन ग्रीसमधील, साधारण इ.स.पू. ७०० ते ३० या काळातील, शतकानुशतके ग्रीक कला-दृष्टिकोनामध्ये विकसित झालेल्या शिल्पकलेने इजिप्त आणि पूर्वेकडील स्मारक-कलांमधून प्रेरणा घेतल्याचे आढळते. या काळात ग्रीक कलाकारांनी त्यापूर्वी कधीही न घडविलेल्या मानवी शिल्पाकृतींची निर्मिती केली. त्यानंतर रोमनांनी त्या शिल्पाकृतींच्या प्रतिकृती तयार केल्या. इतकी ग्रीकांच्या कलाकृतींमध्ये कलात्मक उच्चता गाठलेली होती. ग्रीक शिल्पकार प्रामुख्याने मानवी शरीराची प्रमाणबद्धता, समतोल आणि आदर्श परिपूर्णता याबाबतीत नेहमी सजग असत. म्हणूनच त्यांनी निर्मिती केलेल्या दगड आणि कांस्य प्रतिमा या इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा जास्त कलात्मक म्हणून ओळखल्या जातात.
ग्रीक शिल्पकलेतील आर्ष काळापासूनच्या ग्रीक शिल्पाकृतींचा परामर्श कालक्रमानुसार यानंतरच्या नोंदींत घेतलेला आहे. त्या नोंदी पुढीलप्रमाणे दर्शविलेल्या आहेत.
१) ग्रीक शिल्पकला : आर्ष काळ
२) ग्रीक शिल्पकला : अभिजात काळ
३) ग्रीक शिल्पकला : ग्रीकांश काळ
संदर्भ :
- Burn, Lucilla, Hellenistic Art : From Alexander the Great to Augustus, London, 2004.
- Pollitt, J. J., Art in the Hellenistic Age, New York, 1986.
- Smith, R. R. R., Hellenistic Sculpture : A Handbook, London, 1991.