घळ हे पावसाच्या पाण्याच्या क्षरण (धूप) कार्यामुळे जमिनीवर, विशेषत: डोंगरउतारावर, नद्यांच्या पूरमैदानात किंवा पायऱ्यापायऱ्याच्या उतारावर तयार झालेले अरुंद, खोल, लांब व बहुदा वाकडेतिकडे भूमिस्वरूप आहे. धूप हे घळ निर्मितीचे प्रमुख कारण असून धूप ही वेगवेगळ्या कारणाने होत असते. खडक स्तर किंवा मातीचे अपक्षरण ही घळ निर्मितीची पहिली पायरी असते. घळी या प्रामुख्याने मृदु खडकांत आणि मृदेने व्यापलेल्या प्रदेशात निर्माण होतात. वनस्पतींची मुळे जमीन घट्ट धरून ठेवतात; परंतु मानवाने वेगवेगळ्या क्रियांसाठी मोठ्या प्रमाणावर केलेल्या जंगलतोडीमुळे वनस्पतींचे आच्छादन कमी झाले आहे. तसेच वनवे आणि हवामान बदल यांमुळेही जमिनीवरील वनस्पतींचे प्रमाण कमी झालेले आहे. या सर्वांमुळे जमिनीच्या धूपीचे प्रमाण वाढलेले असून त्यामुळे घळ निर्मितीचे प्रमाणही वाढलेले आहे. दीर्घकाळ पडणाऱ्या झीमझीम पावसाने धूप होत नाही; परंतु अल्पकाळ पडणाऱ्या मुसळधार वादळी पावसात किंवा ढगफुटीसारख्या पर्जन्याच्या वेळी पाण्याचे मोठाले लोट उतारावरून वेगाने वाहत येतात. त्यामुळेही जमिनीची प्रचंड प्रमाणात धूप होऊन मोठमोठ्या घळी निर्माण होतात. पाण्याबरोबर वाहत आलेल्या दगडगोट्यांच्या घर्षणामुळे घळ अधिकच खोल व रुंद होत जाते. पावसाळ्यानंतर घळ कोरडी पडते. ती शेवटी नदीनाल्यास जाऊन मिळते किंवा सपाटीवर संपते. घळीच्या बाजूंवर कधीकधी गवत किंवा झुडुपे उगवलेली दिसतात. वेड्यावाकड्या, कोरड्या घळीत आणि तिच्या कपारीत वन्य श्वापदांना किंवा एकांतप्रिय माणसांना आसरा मिळतो. गाळाच्या जमिनीत प्रवाहांमुळे खोल घळी तयार होऊन शेवटी उत्खातभूमी बनते. सपाट जमिनीवरही वनस्पतींचे आच्छादन नसेल, तर पावसाच्या पाण्याने मातीचे कण वाहून जाऊन तिच्यावर लहानसहान नाळी पडतात. शेजारच्या नाळी एकत्र होऊन घळ बनते. तिच्याकडे दुर्लक्ष झाले, तर ती खोल व अरुंद होत जाऊन शेतजमिनीची नासाडी होते. घळी बुजवून, त्यांच्या तोंडाशी भक्कम ताली घालून किंवा माती धरून ठेवणारी झुडुपे लावून ही नासाडी थांबविता येते. तसेच उताराच्या प्रदेशात धूप नियंत्रणासाठी जमिनीची मशागत व पिकांची लागवड उताराला आडवी करावी, जेणेकरून पाण्याचा वेग कमी होऊन धूप नियंत्रित करता येते. मरुप्रदेशात एकाएकी येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरींमुळे मोठमोठ्या घळी झालेल्या दिसून येतात. मृदेचा प्रकार, तिचे थर, जमिनीचा उतार, पर्जन्यमान व त्याचे स्वरूप आणि जलविभाजकाचा आकार व आकृती यांवर घळीचा आकार व आकृती अवलंबून असतात.
समीक्षक : शेख मोहम्मद बाबर