गोपालकृष्णन, मायलापोर सुंदरम् : (१० जून १९३१—३ जानेवारी २०१३). आपल्या विशिष्ट वादनशैलीमुळे आणि कर्नाटक तसेच हिंदुस्थानी संगीतावरील प्रभुत्वामुळे विख्यात झालेले एक प्रसिद्ध व्हायोलीन वादक. त्यांना एमएसजी या नावानेही संगीतजगतात ओळखले जाते. त्यांचा जन्म चेन्नईमधील मायलापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव परूर सुंदरम् अय्यर आणि आईचे नाव भागीरथी असे होते. त्यांचे वडील परूर सुंदरम् अय्यर हे ही एक श्रेष्ठ व्हायोलिनवादक होते. त्यांची स्वत:ची परूर वादनशैली कर्नाटक संगीतात प्रसिद्ध होती. एम. एस. गोपालकृष्णन यांचे शिक्षण वयाच्या सहाव्या वर्षीच वडिलांकडे सुरू झाले. वडिलांच्या कडक आणि अनुशासनयुक्त देखरेखीखाली कठोर परिश्रम घेऊन गोपालकृष्णन यांनी लहानवयातच वाद्यावर प्रभुत्व मिळविले. गोपालकृष्णन यांचे मोठे भाऊ एम. एस. अनंतरामन हे ही प्रसिद्ध व्हायोलिनवादक होते.

परूर सुंदरम् अय्यर यांच्यामुळे प्रसिद्ध झालेल्या परूर वादन तंत्रामध्ये प्रगती करून स्वरांचा ओघ कायम ठेवू शकणारी आणि चार सप्तकामध्ये मींड-गमक आदी अलंकार घेऊ शकणारी अशी वाद्यतंत्रावरील हुकूमत गोपालकृष्णन यांनी मिळविली. तत्कालीन ज्येष्ठ कलाकार डी. वेंकटस्वामी नायडू यांच्याकडूनही त्यांनी स्फूर्ती घेऊन आपली कला वैशिष्ट्यपूर्ण बनविली. कर्नाटक संगीताबरोबरीनेच हिंदुस्थानी संगीताने देखील त्यांना भुरळ घातली आणि त्यासाठी त्यांनी पंडित कृष्णानंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्येदेखील भरीव प्रगती केली. थोर गायक ओंकारनाथ ठाकूर हे गोपालकृष्णनना साथीसाठी घेऊन जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावर अभिजात हिंदुस्थानी संगीताचे उत्तम संस्कार होण्यास मदत झाली. त्यांचे वडील काही काळ मुंबई येथे वास्तव्यास होते आणि ते जेव्हा चेन्नई येथे आले तेव्हा बरेच हिंदुस्थानी संगीताचे कलाकार घरी येत त्यामुळे त्यांचा हिंदुस्थानी रागदारीचा पाया अधिक समृद्ध झाला आणि ख्याल, गतकारी इ.चा समावेश आपल्या वादनात आणून त्यांनी त्यांचे वादन अधिक रंगतदार बनविले. कर्नाटक संगीताचा गाभा कायम ठेवून हिंदुस्थानी संगीतातील रसपरिपोषतत्व बेमालूमपणे मिसळता येते आणि असे करताना कर्नाटक संगीताचा कोणताही प्रभाव रसिकांना जाणवू न देण्याची किमया त्यांनी लीलया साधली होती.

एम. एस. गोपालकृष्णन यांच्या कारकीर्दीचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला. त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार (१९७५), तमिळनाडू राज्याचा ‘कलैमामणी’ पुरस्कार (१९७८), केरळ संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७९), कर्नाटक राज्याचा टी. चौडेय्या पुरस्कार (१९८०), केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८२), मद्रास म्युझिक अकादमीचा ‘संगीत कलानिधी’ पुरस्कार (१९९८), केरळ संगीत नाटक अकादमीची छात्रवृत्ती (२००७) आणि भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ (२०१२) इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

एम. एस. गोपालकृष्णन यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र सुरेशकुमार आणि कन्या नर्मदा व लता यांनी त्यांचा संगीतवारसा पुढे चालविला आहे. एम. नर्मदा याही उत्कृष्ट व्हायोलिनवादक आहेत. याशिवाय सी. एन. चंद्रशेखर आणि रत्नाकर गोखले या त्यांच्या शिष्यांनीही त्यांचा संगीतवारसा सांभाळला आहे.