समुद्राचा जमिनीकडे घुसलेला इंग्रजी ‘यू’ आकाराचा, लांब, खोल आणि अरुंद फाटा किंवा दरी म्हणजे फ्योर्ड होय. हिमनदीच्या अपघर्षण (झीज) कार्यामुळे ‘यू’ आकाराची दरी निर्माण होते. त्यामुळे फ्योर्ड किनाऱ्याचा आकार ‘यू’ सारखा  असतो. हिमनद्या जेथे समुद्राला मिळतात, तेथे त्या आपल्या दरीच्या तळाची समुद्रसपाटी (सस.)पासून बऱ्याच खोलपर्यंत झीज करतात. त्यानंतर जेव्हा त्या हिमनद्या वितळतात, तेव्हा समुद्राचे पाणी त्या दरीतून आत घुसते. त्यांच्या दोन्ही बाजू कड्यासारख्या उभ्या असतात आणि त्यांवर उंच डोंगर असतात. बर्फ वितळून किंवा जमीन खचून अशा दऱ्यांमध्ये समुद्राचे पाणी खूप दूरपर्यंत आत शिरते. अशा त्या पाण्याच्या लांब, खोल व चिंचोळ्या फाट्यास ‘फ्योर्ड’ किनारा असे म्हणतात. अशा निमज्जन झालेल्या आणि समुद्रसपाटीपासून खूप खोल असणाऱ्या दऱ्या या केवळ हिमंद्यांमुळेच निर्माण होऊ शकतात. त्यांच्या मुखाजवळ लहान लहान बेटे असतात. फ्योर्डमधील पाणी खूप खोल असते. त्यांच्या काठावर सपाट जमिनीची अगदी चिंचोळी पट्टी असते व त्यामागे डोंगर असतात. समुद्रातून अंतर्भागाशी दळणवळण ठेवण्यास फ्योर्ड उपयोगी पडत नाहीत; परंतु मासेमारीला आणि जहाजांना सुरक्षित आसरा म्हणून त्यांचा चांगला उपयोग होतो. असे फ्योर्ड नॉर्वे, फिनलँड, स्कॉटलंड, कॅनडा, ग्रीनलंड, अलास्का (अ.सं.सं.), चिलीचा दक्षिण भाग व न्यूझीलंडचे दक्षिण बेट येथे विशेषेकरून आढळतात. नॉर्वेच्या किनाऱ्यावर  सुमारे १,२०० फ्योर्ड आढळतात.

हिमनद्या या खूप घन आणि अवजड असल्यामुळे त्या वितळून महासागरात तरंगायला लागण्यापूर्वी त्यांच्याकडून त्यांच्या दरीच्या तळाची समुद्रसपाटीपासून खूप खोलपर्यंत झीज केली जाते. त्यामुळेच हिमनदीने कोरलेल्या फ्योर्डच्या दऱ्या या समुद्रसपाटीपासून बऱ्याच खोल असतात. नॉर्वेमधील साँन फ्योर्डची खोली १,३०८ मी. आहे, तर चिलीमधील कॅनल मसीअर फ्योर्डची खोली १,२७० मी. आहे. अनेक फ्योर्ड हे लगतच्या समुद्रापेक्षाही खोल असतात. या निमज्जित दरींची समुद्रसपाटीपासूनची इतकी जास्त खोली ही त्यांची निर्मिती हिमनद्यांपासून झालेली असल्यामुळेच आढळते. सामान्यपणे किनारी भागापेक्षा अंतर्गत भागात हिमनदीतील बर्फ अधिक घट्ट असल्यामुळे तेथे त्यांची खणनक्षमता खूप जास्त असते. त्यामुळे किनारी भागापेक्षा अंतर्गत भागात फ्योर्डची खोली जास्त असते. अनेक फ्योर्डमध्ये साठलेले पाणी आणि हायड्रोजन सल्फाइडयुक्त काळा चिखल आढळतो. फ्योर्डच्या मुखाशी हिमोढ व तलशिला आढळतात.

समीक्षक : शेख मोहम्मद बाबर