नदीच्या मुखाशी आढळणारी नरसाळ्याच्या आकाराची नदीमुख खाडी म्हणजे रिया किनारा होय. रिया हा शब्द पोर्तुगीज व स्पॅनिश शब्द रिओ (रिव्हर = नदी) या शब्दावरून आलेला आहे. महासागर, समुद्र किंवा मोठ्या सरोवरासारखा जलाशय यांचे पाणी आणि त्याशेजारची कोरडी जमीन यांमधील सीमारेषेला किनारा म्हणतात. सागरी लाटा, भरती-ओहोटी, किनाऱ्याजवळून वाहणारे सागरी प्रवाह व त्यांचे कार्य, किनाऱ्याचे समुद्रात होणारे निमज्जन किंवा समुद्रातून त्याचे होणारे उन्मज्जन, विशिष्ट प्रदेशातील खडकांचे प्रकार, त्यांची संरचना, तेथील जमिनीवर विदारण, वाहते पाणी, वारा, बर्फ इत्यादी क्षरणकारकांचे कार्य होऊन त्या भूप्रदेशाला आलेले स्वरूप इत्यादींवर किनाऱ्याचे स्वरूप अवलंबून असते. सागरी किनाऱ्यावर आढळणाऱ्या वेगवेगळ्या भूमिस्वरूपांपैकी रिया किनारा हे एक आहे.

टेकड्या व दऱ्याखोऱ्यांनी वेढलेल्या नदीच्या दरीच्या मुखाजवळच्या किनारी प्रदेशातील सखल भागाचे निमज्जन झाल्यामुळे रिया किनाऱ्याची निर्मिती होते. जेथे पर्वतरांगा किनाऱ्याला काटकोनात पसरलेल्या असतात, अशा सामान्यपणे खडबडीत, वेड्यावाकड्या, विषम, अनियमित व दंतुर स्वरूपाच्या किनाऱ्यावर रिया किनारे आढळतात. हा किनारा अगदी विषम व ठिकठिकाणी समुद्राचे लांब व खोल फाटे आत शिरलेले अशा स्वरूपाचा बनतो. निमज्जन व उन्मज्जन या दीर्घकालीन व सावकाश होणाऱ्या क्रिया आहेत. निमज्जनामुळे नद्यांची मुखे पाण्याखाली जाऊन तेथे खाड्या आणि आखाते तयार होतात. नदीखोऱ्याचा प्रदेश या प्रकारे पाण्याखाली गेला म्हणजे तेथे जवळच्या उपनद्यांतूनही अंतर्गत भागात जाण्यास जलमार्ग मिळतो. तेथील सागरतळ बहुदा सावकाश उतरता होत गेलेला असतो. किनाऱ्याजवळचा भूभाग सापेक्षत: अधिक रुंद असून तो व्यापारी दृष्ट्या सोयीचा असतो.

विस्तृत खंडीय प्रदेशातील हिमनद्या वितळल्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून जगातील अनेक रिया किनाऱ्यांची निर्मिती झालेली आहे; मात्र रिया किनारी भागात हिमानी क्रिया आढळत नाहीत. वृक्षसदृश प्ररूप किंवा शाखाकृती असणाऱ्या (अनेक शाखांनी वाहणाऱ्या) नद्यांच्या मुखाशी ते आढळत असून त्या सर्व शाखा म्हणजे सर्वसामान्यपणे लगतच्या भूप्रदेशातील प्रमुख नदीप्रणाली असते. त्यांचा रुंदावणारा नरसाळ्याचा आकार आणि समुद्राकडे हळूहळू वाढत जाणारी खोली याला मुख्यत: नदीमुख खाडीतील सागरी लाटांचा व भरती-ओहोटीचा वाढणारा प्रभाव हे कारण असते. रिया किनाऱ्याजवळ नैसर्गिकरित्या निर्माण झालेली बेटे आढळतात. ही बेटे म्हणजे तेथे पूर्वीच अस्तित्वात असणाऱ्या, परंतु अंशत: निमज्जन झालेल्या टेकड्यांचे माथे असतात. अशा प्रकारच्या किनाऱ्यावर अनेक समांतर रिया किनारे असतात. ते किनाऱ्यापासून भूभागावर अंतर्गत प्रदेशात पसरलेल्या कटक किंवा डोंगररांगांनी एकमेकांपासून अलग झालेले असतात. नैऋत्य इंग्लंडमधील डेव्हन परगण्यातील किंग्जब्रिज नदीमुखखाडी हे या प्रकारच्या किनाऱ्याचे उत्तम उदाहरण आहे. याशिवाय स्पेनमधील गॅलीशिआ किनारा आणि आयर्लंडचा नैऋत्य किनारा ही रिया किनाऱ्यांची उदाहरणे आहेत. काही रिया किनारे लांब, सरळ आणि कोणत्याही फाट्यांशिवाय असतात.

समीक्षक : शेख मोहम्मद बाबर

https://www.shutterstock.com/video/clip-1091231909-ubara-utopia-japan-beautiful-ria-coast-vol17