स्वित्झर्लंडच्या दक्षिण भागातील स्वित्झर्लंड व इटली यांच्या सरहद्दीजवळील पेनाइन आल्प्स व लिपाँटाइन आल्प्स पर्वतरांगांतील एक खिंड. ऱ्होन नदीची उत्तरवाहिनी उपनदी व टोचे नदीची दक्षिणवाहिनी उपनदी यांच्या जलविभाजकावर, समुद्र सपाटी (सस.) पासून २००८ मी. उंचीवर ही खिंड आहे. तेराव्या शतकापासून मध्य आणि दक्षिण यूरोप यांदरम्यानचा महत्त्वाचा व्यापारी मार्ग म्हणून या खिंडीला महत्त्व प्राप्त झाले. पहिल्या नेपोलियनने इ. स. १८०० – इ. स. १८०७ मध्ये जेव्हा गाँडो नदीच्या घळईतून वाहतुकीचा रस्ता बांधून घेतला, तेव्हापासून मध्य व दक्षिण यूरोपला जोडणाऱ्या इतर महत्त्वाच्या अल्पाइन खिंडीतील मार्गांबरोबर या खिंडीतून होणाऱ्या वाहतूक मार्गाची स्पर्धा सुरू झाली. या खिंडीलगतच्या एका शिखरावर आजारी व निराधार लोकांसाठी रुग्णालय सुविधा असलेली एक धर्मशाळा असून तिचा प्रथम उल्लेख इ. स. १२३५ मध्ये आढळतो. त्यावेळी ती ऑर्डर ऑफ सेंट जॉनच्या अखत्यारीत होती. सध्या ही धर्मशाळा ऑगस्टीयनांच्या ताब्यात आहे. त्या धर्मशाळेजवळच एक पोस्टकार्ड हॉटेल (अत्यंत सुखवस्तू हॉटेल) आहे.
एका जर्मन अभियांत्रिकी कंपनीने इ. स. १८९० च्या दशकात सिंप्लॉन खिंडीजवळच एक बोगदा खोदण्यास सुरुवात केली. त्या कंपनीने सस. पासून ७५० मी. उंचीवर २० किमी. लांबीचा सिंप्लॉन लोहमार्ग बोगदा खोदला. त्या काळातील हा जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा असून अभियांत्रिकी क्षेत्रातील ते एक आश्चर्यच मानावे लागेल. इ. स. १९०६ मध्ये हा बोगदा वाहतुकीस खुला करण्यात आला होता. या बोगद्याला समांतर असा दुसरा बोगदा असून तो इ. स. १९१२ – १९२१ या कालावधीत खोदण्यात आला. सिंप्लॉन बोगद्यातून जाणाऱ्या लोहमार्गाने स्वित्झर्लंडमधील ब्रीक व इटलीतील ईझेले ही दोन शहरे एकमेकांशी जोडली गेली आहेत. हिमाच्छादनामुळे खिंडीतून जाणारा रस्ता सामान्यपणे मध्य ऑक्टोबर ते एप्रिलच्या आरंभापर्यंत वाहतुकीस बंद असतो. त्यावेळी मोटारी बोगद्यातील लोहमार्गाने रेल्वेतून नेल्या जातात.
समीक्षक ꞉ माधव चौंडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.