डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडन यांदरम्यानचा समुद्र. त्याला स्कॅगरॅक सामुद्रधुनी असेही संबोधले जाते. उत्तर समुद्राचा हा एक आयताकार फाटा असून त्याच्यामुळे उत्तर समुद्र कॅटेगॅट व बाल्टिक समुद्रांशी जोडला गेला आहे. हा समुद्र डेन्मार्कच्या वायव्य भागात, उत्तरेकडील नॉर्वे देशाचा दक्षिण किनारा आणि दक्षिणेकडील डेन्मार्कचे जटलंड द्वीपकल्प यांच्या दरम्यान नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेला आहे. या समुद्राची लांबी सुमारे २४० किमी., तर रुंदी ११०–१४५ किमी. असून क्षेत्रफळ सुमारे ४,७०० चौ. किमी. आहे. डेन्मार्कचे स्कॅयन भूशिर आणि स्वीडनचा किनारा यांदरम्यान स्कॅगरॅक व कॅटेगॅट समुद्राच्या सरहद्दीवर हा समुद्र अरुंद झालेला आहे. या समुद्राचा डेन्मार्कलगतचा किनारा तुलनेने उथळ (सुमारे १८५ मी. पेक्षा कमी खोलीचा) असून त्या भागात वाळूचे दांडे असल्यामुळे जहाज नांगरणीच्या दृष्टीने तेथील किनारा विशेष सुरक्षित नाही. याउलट, नॉर्वेच्या किनाऱ्याकडे त्याची खोली वाढत जाऊन तेथे ती ६०० मी. पेक्षा अधिक झालेली आहे. डेन्मार्कच्या ईशान्य भागात जेथे हा समुद्र कॅटेगॅट समुद्राला मिळतो, तेथे याची खोली ७९० मी. आढळते. नॉर्वेचा किनारा खडकाळ आणि खूप दंतुर असल्यामुळे तेथे अनेक नैसर्गिक बंदरे विकसित झाली आहेत.
स्कॅगरॅक हे नाव डेन्मार्कच्या उत्तर भागातील स्केगेन या शहरावरून आले असावे. डच भाषेत ‘रॅक’ म्हणजे ’सरळ जलमार्ग’ असा होतो. स्कॅगरॅक हे नाव डच प्रवाशांनी दिले असावे. जर्मनीच्या उत्तर भागातील आयडर (ईडर) कालव्याची निर्मिती होण्यापूर्वी (इ. स. १७८४) उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र यांदरम्यानच्या सागरी वाहतुकीसाठी कॅटेगॅट समुद्राद्वारे स्कॅगरॅक समुद्राशिवाय दुसरा जवळचा मार्ग उपलब्ध नव्हता. दोन्ही जागतिक महायुद्धांच्या काळात जर्मनीच्या दृष्टीने याला सागरी हालचालीसाठी खूपच महत्त्व प्राप्त झाले होते.
स्कॅगरॅक हा गजबजलेला सागरी मार्ग आहे. मध्य जानेवारी ते मार्चअखेर हा हिमाच्छादनाचा अल्प कालावधी वगळता स्कॅगरॅक समुद्रातून मोठी सागरी जहाजे वाहतूक करू शकतात. नॉर्वेची ऑस्लो व क्रिश्चनसँड, तर स्वीडनची उदव्हाला व स्ट्रॉमस्टँड ही या समुद्र किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत. स्कॅगरॅक समुद्र सुमारे २,००० सागरी जलचरांच्या प्रजातींचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो. या समुद्रात ओबडधोबड खडकांबरोबरच प्रवाळ खडकही आढळतात. डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडन या तीनही देशांतील अनेक पर्यटनस्थळे स्कॅगरॅक समुद्रकिनारी विकसित झाली आहेत.
समीक्षक ꞉ मा. ल. चौंडे