जुने महाबळेश्वर. महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेल्या महाबळेश्वर या प्रसिद्ध पर्यटनस्थळानजीकच क्षेत्र महाबळेश्वर हे  हिंदूंचे पवित्र धार्मिक व सांस्कृतिक ठिकाण, तसेच एक पर्यटनस्थळ आहे. महाबळेश्वर हे त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण, तसेच थंड हवेचे निसर्गरम्य गिरिस्थान आहे. या महाबळेश्वर नगराच्या उत्तरेस सुमारे ४ किमी. अंतरावर, स. स. पासून १,३१६ मी. उंचीवर क्षेत्र महाबळेश्वर वसले आहे. त्याच्या नावरूनच या थंड हवेच्या ठिकाणास महाबळेश्वर हे नाव पडले आहे.

कृष्णाबाई (कृष्णामाई) हे हेमाडपंती शैलीतील मंदिर तेराव्या शतकातील यादवकालीन असल्याचे मानले जात असून तो स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर द्राविडी शैलीची आठवण करून देते. मंदिराची रचना अत्यंत साधी, पण प्रभावी आहे. ज्यात मोठा मंडप, विविध कलाकुसर केलेले स्तंभ आणि अनेक लहान देवळे आहेत. मंदिराच्या बाह्य रचनेवर वेगवेगळ्या प्रकारचे शिल्पकलाकार्य केले आहे. ज्यात देव-देवता, राक्षस आणि पौराणिक दृश्यांची चित्रे आहेत. स्तंभांची जडणघडण, शिखरे आणि सजावट यांची सुंदरता अत्यंत आकर्षक आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या मंदिराच्या परिसरातील हिरवेगार वातावरण, शांतता आणि शीतलता भाविकांना व पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

कृष्णाबाई मंदिरात प्रवेश करताच तेथे तीन दालने पाहायला मिळतात. त्यांपैकी पुढील मोकळ्या जागेत दोन जलकुंड आहेत. मागील बाजूस असलेल्या भिंतीच्या मागेही दुसरी भिंत असून त्या दोन भिंतींच्या मध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा या पूर्ववाहिनी नद्या आणि गायत्री व सावित्री या कोकणात वाहत जाणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्या अशी पाच नद्यांची उगमस्थाने (पात्रे किंवा छोट्या पाटांच्या स्वरूपात) दर्शविली जातात. काही अंतरावरच या पाच नद्यांचे पाणी एकत्रित होऊन गोमुखातून एका कुंडात पडते व त्यातून दुसऱ्या कुंडात जाते. या कुंडांना अनुक्रमे ‘ब्रम्हकुंड’ व ‘विष्णूकुंड’ असे म्हणतात. उपरोक्त पाच नद्यांच्या दोन्ही बाजूंस दोन कोरडी पात्रे असून, ती दर १२ वर्षांनी प्रकटणारी भागीरथी व दर ६० वर्षांनी प्रकटणारी सरस्वती या दोन नद्यांची प्रतिके असल्याचे भाविक मानतात. गोमुखातून सतत वाहणाऱ्या पाण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. भाविक त्या गोमुखातील पाण्याचे तीर्थ पिऊन

शिव मंदिर

धार्मिक पुण्य प्राप्त करतात, अशी श्रद्धा आहे.

पंचगंगा मंदिराविषयी पौराणिक कथा अशी की, या ठिकाणी उगम पावलेल्या पाच नद्या भगवान विष्णूच्या इच्छेनुसार प्रकट झाल्या आहेत. या पाच नद्यांचे उगमस्थान हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोणातून एक महत्त्वाचे स्थान आहे. ‘पंचगंगा’ हा शब्दच या ठिकाणाची ओळख सांगतो; कारण येथे पाच नद्यांचा संगम मानला जातो. मान्यतेनुसार, कृष्णा नदीने महाबळेश्वर येथूनच आपला प्रवास सुरू केला आहे. या ठिकाणाचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये सापडतो, ज्यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढते.

क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णाबाई (पंचगंगा), महाबलेश्वर (महाबळेश्वर) व अतिबलेश्वर (अतिबळेश्वर) ही दोन महत्त्वाची मंदिरे असून ही नावे ‘महाबल’ व ‘अतिबल’ या दोन बलवान व शूर अशा राक्षस बंधूंवरून आली आहेत, अशी आख्यायिका आहे. यांशिवाय येथे केदारेश्वराचे मंदिर, मारुती मंदिर व राममंदिर ही मंदिरे आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे फाल्गुन महिन्याच्या वद्य पक्षात पाच दिवस कृष्णाबाईचा उत्सव, आश्विन महिन्याच्या वद्य पक्षात दहा दिवस नवरात्र व माघ महिन्यात सात दिवस शिवरात्री असे तीन उत्सव दरवर्षी होतात.

मंदिराजवळच एका बाजूने निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतात. ज्यामध्ये दऱ्या, धबधबे आणि आकाशाला भिडणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा दिसतात. येथून पुढे एलफिन्स्टन पॉइंट व प्रसिद्ध ऑर्थर सीट पॉइंट या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांकडे जाता येते.

समीक्षक ꞉ वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.