केळेकार, रवींद्र : ( ७ मार्च १९२५ – २७ ऑगस्ट २०१० ). कोकणी आणि मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक, पत्रकार, भाषातज्ञ आणि विचारवंत. त्यांचा जन्म गोव्यातील कुकळ्ळी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजाराम केळेकार. ते व्यवसायाने डॉक्टर होते. रवींद्र केळेकार यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पणजी इथे झाले. ते हायस्कुल मध्ये असतानाच १९४६ साली गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी झाले होते. त्याच कालखंडात ते राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात आले. राम मनोहर लोहिया ज्या पद्धतीने लोकांशी संवाद साधत असत त्यावरून केळेकार यांना भाषेतील ताकदीचा अंदाज आला होता. तेच संवादकौशल्य वापरून त्यांनी स्थानिक लोकांना संघटित करण्याचे काम केले.

रवींद्र केळेकार

रवींद्र केळेकार यांची साहित्य संपदा : रवींद्र केळेकार यांच्या लेखनाचे स्वरूप हे आशयाने वैचारिक आणि निवेदनाने ललित निबंधात्मक स्वरूपाचे आहे. कोकणी भाषेत त्यांची  जवळजवळ १०० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद मराठी, गुजराती आणि हिंदीतही उपलब्ध आहेत. उजावाडाचे सूर  (१९७३), सांगती (१९७७ ), महाभारत (अनुसर्जन,१९८५ ), समिधा (१९९६), तथागत ( चरित्र १९९८ ), अथांग (१९९९ ), सर्जकाची आंतरकथा (२०००), घुस्पल्ले जानवें (२०००), भारत वर्षाची संस्कृतायेची साधना  (२००५), अघळ पघळ ( २००५ ) इत्यादी त्यांची प्रसिद्ध पुस्तके होत. हिमालयांत  आणि जपान जसा दिसला  हे त्यांचे प्रवासवर्णनही प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी मीर्ग (१९५३, कोकणी पाक्षिक) , गोमंत भारती  (१९५५), जाग (१९८८ ) या तीन नियतकालिकांचे संपादन केले आहे. काका कालेलकर यांच्या अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन आणि अनुवाद केलेले आहेत.

रवींद्र केळेकार हे गांधी तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेले होते. ते १९४९ मध्ये महाराष्ट्रात आले. इथे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच कालखंडात ते शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार आणि स्वातंत्र्य सेनानी काकासाहेब कालेलकर यांच्या संपर्कात आले. त्यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्याचा त्यांच्या पुढील आयुष्यावर प्रभाव पडला असे दिसते. त्यांना ६ वर्ष वर्धा इथे राहण्याची संधी मिळाली. नंतर ते दिल्लीला गेले. तिथे त्यांना गांधी स्मारक संग्रहातील ग्रंथालयात अध्यक्ष म्हणून काम करता आले. त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनात उडी घेतली.

१९ डिसेंबर १९६१ ला जेव्हा गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला, त्यानंतर गोवा हा प्रदेश महाराष्ट्रात विलीन करावा अशा हालचाली सुरु झाल्या होत्या. त्या विरुद्धच्या आंदोलनात रवींद्र केळेकार यांनी  पुढाकार घेतला. त्यांनी  भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात, गोवा मुक्ती आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता.

कोकणी भाषा मंडळाच्या स्थापनेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. गोवा स्वतंत्र झाल्यावर त्यांनी आपले लक्ष साहित्य लेखनावर केंद्रित केले होते. ‘कोकणी’ भाषेला मराठीची बोली म्हणू नये आणि त्या भाषेला स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता देण्यात यावी म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले. अखेर १९८७ मध्ये गोवा विधानसभेने गोव्याची आधिकारिक भाषा म्हणून ‘कोकणी’ भाषेला मान्यता दिली.

रवींद्र केळेकार यांना ज्ञानपीठ हा साहित्यातील सर्वोच्य पुरस्कार २००६ साली विभागून देण्यात आला. त्यांच्या बरोबर संस्कृत साहित्यिक सत्यवत शास्त्री यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. साहित्यातील हा सर्वोच्च  सन्मान मिळाल्यावर तो स्वीकारताना रवींद्र केळेकार आपल्या भाषणात म्हणाले होते, “ एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. हा सन्मान अशा एका लेखकाला दिला गेला आहे, ज्याच्या भाषेला कालपरवापर्यंत मोठे मोठे लोक भाषाही मानायला तयार नव्हते. ज्या भाषेची लिपी नाही, व्याकरण  नाही, ज्या भाषेत साहित्य नाही असे म्हणून ही भाषा बोलणारे देखील या भाषेचा उपहास करीत होते. ही भाषा जर अकादमीची सदस्यता आणि ज्ञानपीठ या सारखा सन्मान मिळवू शकलेली आहे तर त्याचे सगळे श्रेय त्या लोकांना जाते जे भाषेला ‘भाषा’ बनवण्यासाठी मागील पन्नास साठ वर्षापासून कायम संघर्ष करीत आले आहेत. त्यांचे स्मरण करणे हे मी माझे कर्तव्य समजतो.”

केळेकार यांना रवींद्रबाब या टोपणनावाने ओळखले जात असे. त्यांनी एखाद्या वटवृक्षाप्रमाणे बौद्धिक दृष्टीने वाचकांच्या तीन पिढ्यांना आश्रय दिला असे मानले जाते. त्यांनी लिहिलेला प्रत्येक लेख, संपादकीय, आत्मीय संवादाप्रमाणे असे. त्यातील अनेक लेख हे ‘लाऊड थिंकिंग’ केल्याप्रमाणे लिहिलेले असत. जणू ते वाचकांचे बोट धरून त्याचा ज्ञानाच्या विश्वात फिरवून आणत असत. ज्ञानाच्या या तपस्वीने आपले सगळे जीवन ज्ञानमीमांसक म्हणून व्यतीत केले असेच म्हणावे लागेल. त्यांना प्रवासाची  आवड होती. त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला आहे . ते हिमालयात देखील गेले होते. त्यांनी जपान आणि अमेरिका या देशांना भेट दिली होती. त्यांनी हा सगळा प्रवास पुस्तकांतून शब्दबद्ध केला आहे.

रवींद्र केळेकार यांना  गोवा कला अकादमीचा ‘गोमान्त शारदा’ पुरस्कार (१९७४), साहित्य अकादमी पुरस्कार (१९७७ ), कोकणी साहित्यरत्न  पुरस्कार ( १९९४ ), उत्तरप्रदेशचा ‘सौहार्द पुरस्कार’ ( १९९९), भारतीय साहित्यातील सर्वोच्च ‘ ज्ञानपीठ पुरस्कार’ ( २००६ ) आणि कोकणी साहित्यातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार ( २००८ ) प्राप्त झालेला आहे.  ते कोकणी साहित्य परिषदेचे पूर्व अध्यक्ष, गांधी शांती प्रतिष्ठानच्या कार्यकारणीचे सदस्य, गांधी आश्रम नागालँडचे विश्वस्थ, आणि केंद्रीय साहित्य अकादमीचे सदस्य देखील होते.

अल्पशा आजाराने रवींद्र केळेकार यांचे मडगाव, गोवा इथे निधन झाले.

संदर्भ :  कामत , श्रीराम, पांडुरंग (संपादक), मराठी विश्वचरित्र कोश, खंड ६ ,  विश्वचरित्र संशोधन गोवा, २०१०.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.