वेस्ट नाईल विषाणू फ्लॅव्हिव्हिरिडी कुळातील एक महत्त्वाचा विषाणू मानला जातो. मनुष्य, घोडे, पक्ष्यांच्या काही प्रजाती आणि कुत्र्यांसह इतर ३० प्रजातींना तो संसर्ग घडवू शकतो. त्याच्या कुलातील इतर विषाणू म्हणजे डेंग्यू/डेंगी, पीतज्वर, जपानी मस्तिष्कदाह, झिका विषाणू हे आहेत. वेस्ट नाईल विषाणू हा एक कीटकजन्य आजार आहे.

पार्श्वभूमी : वेस्ट नाईल विषाणूचा शोध त्याच्या कुळातील इतर सदस्यांच्या तुलनेने बराच अलीकडे लागला. युगांडामधील वेस्ट नाईल प्रांतामध्ये १९३७ मध्ये पीतज्वराच्या रुग्णाची चाचणी करतेवेळी अचानक हा वेगळा विषाणू सापडला. त्यामुळेच त्याला वेस्ट नाईल विषाणू असे म्हटले जाते. नाईल नदीचा त्याच्या नावाशी काहीही संबंध नाही. पुढील वीस वर्षांत काँगो, ईजिप्त व भारतासह अनेक देशांमध्ये लाखो लोकांच्या रक्तात वेस्ट नाईल विषाणूविरुद्ध प्रतिपिंडे दिसून आली. १९६० च्या दशकात या विषाणूने दक्षिण युरोप, ऑस्ट्रेलियामध्ये शिरकाव केला. १९९० च्या दशकात इझ्राएल, युरोप आणि उत्तर अमेरिकेत वेस्ट नाईल तापाच्या साथी वारंवार येऊ लागल्या. त्यानंतर या विषाणूची रोगकारकक्षमता आणि त्याचे साथीचा रोग म्हणून त्याचे गांभीर्य  विषाणुवैज्ञानिकांच्या लक्षात आले. २००० नंतर जगभर वेस्ट नाईल विषाणूचे लहानमोठे उद्रेक होऊ लागले आणि त्यामुळे त्याच्या अभ्यासाला गती मिळाली.

वेस्ट नाईल विषाणू : (१) सूक्ष्मदर्शीखालील चित्र आणि (२) अंतर्गत संरचना.

संरचना : इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले असता वेस्ट नाईल विषाणू पोकळ, बहुकोनी चेंडूसारखा दिसतो. त्याचे कवच २० त्रिकोणी पृष्ठभागाचे असून मुख्यतः प्रथिनांचे बनलेले असते. या कवचाला प्रथिनावरण (Capsid) असे म्हणतात तर अशा रचनेला विषंतिपृष्ठक (Icosahedral) असे म्हणतात. साधारण  ४५—५० नॅमी. व्यासाचे हे कवच जीनोमचे बाह्य घटकांपासून संरक्षण करते. बाह्यकवचावर वसा-प्रथिनांचे (Lipoprotein) आणखी एक गुळगुळीत वेष्टन असते. मुख्यतः आश्रयी पेशींच्या पेशीपटलापासून बनलेले हे वेष्टन म्हणजे विषाणूचे आवरण पेशींमध्ये घुसखोरी करण्यात आणि संसर्ग घडवण्यात आवरणातील विविध प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. विषाणू कणांच्या गाभ्यामध्ये त्याचा एकेरी ऋणपेड (Positive sense) आरएनए जीनोम असतो. ११,००० न्यूक्लिओटाइडे  असलेला हा आरएनए कवचाला एका प्रथिनांच्या साखळीने बांधलेला असतो. त्याला एकत्रितपणे  न्यूक्लिओ प्रथिनावरण (Nucleocapsid) असे संबोधतात. जनुकीय दृष्ट्या जपानी मस्तिष्कज्वर विषाणूशी त्याचा जवळचा संबंध आहे.

वेस्ट नाईल विषाणू : रोगप्रसार

रोगप्रसार : वेस्ट नाईल विषाणू हा एक संधिपादवाहित (Arthropod borne – arbovirus) आजार आहे.  क्युलेक्स डासांच्या चाव्यातून माणूस व अन्य प्राण्यांमध्ये या विषाणूचा संसर्ग होतो. क्युलेक्स टार्सॅलीस, क्युलेक्स पिपिएन्स, क्युलेक्स  रेस्ट्युअन्स, क्युलेक्स सॅलिनेरियस, क्युलेक्स क्विंकिफॅशिएटस, क्युलेक्स निग्रीपॅल्पस आणि क्युलेक्स एरॅटिकस या प्रजातीचे डास त्याचे सर्वांत महत्त्वाचे वाहक (Insect Vector) आहेत.

वेस्ट नाईल विषाणूचे नैसर्गिक यजमान (Natural host) म्हणजे पक्षी होत. कावळे, मैना, डोमकावळा तसेच  कबुतर, पारवा, होला, गूस, कार्डिनल या पक्ष्यांसह इतर २५० प्रजातींमध्ये वेस्ट नाईल विषाणू संसर्ग घडवतो. यांपैकी अनेक प्रजातीचे पक्षी वेस्ट नाईल विषाणूमुळे आजारी व मृत्युमुखी पडतात.

निसर्गात वेस्ट नाईल विषाणूचे अभिसरण पक्षी आणि डासांमध्ये आळीपाळीने अखंड सुरू असते. विषाणूची लागण झालेले मादी क्युलेक्स डास जेव्हा पक्ष्यांना चावतात तेव्हा त्यांच्या लाळेतून विषाणू पक्ष्याच्या रक्तात प्रवेश करतो व वाढू लागतो. लागण झालेला पक्षी विषाणूचा संसर्ग बिंदू बनतो. जेव्हा इतर डास त्याचा चावा घेतात तेव्हा त्यांना विषाणूचा संसर्ग होतो. पाच ते सात दिवसांत विषाणू डासाच्या शरीरात सर्वत्र पसरतो. विषाणूग्रस्त क्युलेक्स डास जेव्हा पक्ष्यांना चावतात, तेव्हा त्यांच्या लाळेतून विषाणू पुन्हा पक्ष्याच्या रक्तात प्रवेश करतो. याशिवाय विषाणूग्रस्त पक्ष्यांमध्ये थेट संपर्कातून, रोगग्रस्त पक्ष्यांचे मांस खाल्ल्याने व दूषित पाण्यातून देखील इतर पक्ष्यांना वेस्ट नाईल विषाणूची लागण होऊ शकते. लागण झालेले मादी क्युलेक्स डास जेव्हा माणसांना किंवा प्राण्यांना चावतात तेव्हा त्यांच्या लाळेतून विषाणू रक्तात पोहोचतो. अशा प्रकारे होणाऱ्या संसर्गाला प्राणिजन्य संक्रमण (Zoonosis) म्हणतात. परंतु माणूस व इतर सस्तन प्राण्यांकडून डासांमध्ये उलट संक्रमण होत नाही आणि हे चक्र खंडित होते. त्यामुळे त्यांना अंतिम यजमान (Dead end host) असे म्हटले जाते.

लक्षणे  : वेस्ट नाईल तापाच्या साथी मुख्यतः पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये अर्थात जुलै ते सप्टेंबरमध्ये येतात. जागोजागी साठलेल्या पाण्यात मोठया प्रमाणात होणारे डास यासाठी कारणीभूत ठरतात. संसर्गानंतर ३ — १४ दिवसांनी आजाराची लक्षणे दिसू लागतात. संसर्ग झालेल्या ८० % रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. २० % रुग्णांमध्ये मरगळ येणे, थकवा, ताप, पुरळ, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना यांसह मळमळ, उलट्या-जुलाब ही लक्षणे दिसून येतात. या सौम्य अवस्थेला वेस्ट नाईल ताप म्हणतात. बहुतांश रुग्ण ताप कमी करणारी व वेदनाशामक औषधे, विश्रांती व चौरस आहार यांच्या मदतीने काही आठवड्यात पूर्ववत होतात.  केवळ १% पेक्षा कमी रुग्णांमध्ये तीव्र आणि आक्रमक स्वरूपाचा आजार उद्भवतो.  त्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे १५० मध्ये १ इतके अत्यल्प असते परंतु त्याचे परिणाम गंभीर आणि दीर्घकालीन असतात. अर्भके, वृद्ध, तसेच कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधी असलेले रुग्ण, अवयवरोपण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण व प्रतिकारक्षमता कमकुवत असलेल्या व्यक्तींना गंभीर आजाराचा धोका अधिक असतो. या अवस्थेमध्ये विषाणू मेंदू व चेतापेशींवर हल्ला चढवतो. वेस्ट नाईल आक्रमक चेताविकार (West Nile Neuroinvasive Disease, WNND) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अस्वस्थेमध्ये बहुतांश रुग्णांमध्ये मस्तिष्कशोथ (Encephalitis) आणि मेंदूआवरणदाह (Meningitis) दिसून येतो. अत्यधिक ताप, तीव्र डोकेदुखी, मानेतील ताठरपणा, ग्लानी, विभ्रम, फेफरे येणे, कंप, स्नायू दुर्बलता तसेच क्वचित प्रसंगी पक्षाघात ही त्याची लक्षणे आहेत. काही रुग्णामध्ये मेंदू व मज्जासंस्थेतील विशिष्ट भागांचे कार्य बाधित होते (Focal Neurological deficit) व हातापायांना मुंग्या येणे, बधिरता, स्नायूंमधील शिथिलता, दृष्टिदोष आणि वाचा दोष देखील उद्भवतात. पूर्वस्थितीत येण्यासाठी या रुग्णांना मदतीची गरज पडते. काही यापैकी केवळ १० % रुग्णामध्ये आजार आणखी पुढच्या अवस्थेत जातो आणि कायमस्वरूपी अपंगत्व,  निश्चेतनावस्था / कोमा आणि क्वचित मृत्यू होतो. एकदा संसर्ग झाल्यानंतर वेस्ट नाईल विषाणूविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होते आणि ती आयुष्यभर टिकते. त्यामुळे सहसा पुन्हा संसर्ग होत नाही आणि झाल्यास त्याची तीव्रता फार कमी असते.

निदान : प्राथमिक लक्षणे व रक्तचाचण्यांधून वेस्ट नाईल तापाचे रोगनिदान केले जाते. परंतु त्यासाठी विशिष्ट विषाणूविरोधी औषधे व उपचारपद्धती अजून उपलब्ध नाही. वैद्यकीय उपचारांचा भर मुख्यतः लक्षणांची तीव्रता कमी करण्यावर (Symptomatic treatment) असतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना : डास चावण्यापासून बचाव करणे हा वेस्ट नाईल विषाणूचा संसर्ग टाळण्याचा उत्तम उपाय आहे. डास पळवणारी औषधे व तेलांचा वापर, मच्छरदाणीचा वापर करणे,  संध्याकाळी बाहेर पडताना हात-पाय  झाकणारे कपडे घालणे, या साध्या उपायांनी डास चावणे टाळता येते. याशिवाय डासांची पैदास रोखण्यासाठी आजूबाजूला पाणी साठू न देणे, कीटकनाशकांची नियमित फवारणी इत्यादी उपाययोजनांमुळे संसर्गाचा धोका कमी होतो.

पशुवैद्यक : वेस्ट नाईल विषाणू माणसांप्रमाणेच घोड्यांमध्येही गंभीर आजार निर्माण करू शकतो. त्याचे प्रमाण १०-४० % असते. ताप,अशक्तपणा, भूक मंदावणे,  विभ्रम, अडखळणे, हालचाल मंदावणे व क्वचित पक्षाघात ही त्याची लक्षणे आहेत. परंतु घोड्यांकडून माणसांना संसर्ग झाल्याचे आजवर आढळलेले नाही.

घोड्यांमध्ये संसर्ग टाळण्यासाठी चार वेगवेगळ्या प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. २००२ पासून उत्तर अमेरिकेत दर वर्षी घोड्यांचे लसीकरण केले जाते. या लसी अत्यंत सुरक्षित व कार्यक्षम ठरल्या आहेत परंतु मानवी लसी अजून उपलब्ध नाहीत. घोड्यांमधील लसीकरणाच्या यशानंतर विविध मानवी लसींवर संशोधन चालू आहे. त्यापैकी काही लसीचे नमुने प्रयोगशालेय चाचण्यापर्यंत पोहोचले आहेत. परंतु या लसी बाजारात येण्यापूर्वी त्यावर अजून संशोधन होणे आवश्यक आहे.

 

संदर्भ : 1. https://en.wikipedia.org › wiki › West_Nile_virus

  1. https://www.cdc.gov/west-nile-virus/index.html

3.https://www.hopkinsmedicine.org/health/conditions-and-diseases/west-nile-virus

4.https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/west-nile-virus Introduction to West Nile Virus, Methods Mol Biol,  2023:2585:1-7,                                  doi: 10.1007/978-1-0716-2760-0_1.

 

समीक्षक : मोहन मद्वाण्णा

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.