(स्थापना – १९९६).

आरती हे ॲप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (Appropriate Rural Technology Institute) या संस्थेचे संक्षिप्त नाव आहे. १९९६साली वीस संशोधकांच्या गटाने स्थापन केलेली ही अशासकीय नोंदणीकृत विज्ञान संघटना आहे. ग्रामीण भागाच्या गरजा भागविण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानविकसित करण्याचे काम ही संस्था सातत्याने करते. ग्रीन ऑस्कर समजला जाणारा ॲश्डेन पुरस्कार (Ashden Award) या संस्थेस दोनवेळा मिळाला आहे. २००० साली शेतातील टाकाऊ कचऱ्यापासून कांडी कोळसा तयार करण्याची प्रणाली विकसित करण्यासाठी तर २००६मध्ये क्रांतिकारी बायोगॅस संयंत्राच्या निर्मितीसाठी दिला गेला. पुण्यातील डॉ. आनंद कर्वे हे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या प्रकल्पांना भारतीय व परदेशी संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळते.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा फायदा सुसंघटित औद्योगिक क्षेत्रालाच होत होता. तो पारंपरिक ग्रामीण उद्योगाला मिळावा यासाठी आरती ही संस्था कार्य करते. गावोगावी नवनवीन उद्योगधंदे उभे करण्यास तंत्रज्ञान पुरवीत आहे. ग्रामीण उद्योजक विकास केंद्र उभारून त्याद्वारे होतकरू उद्योजकांना तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. त्यांना त्याबरोबर मालाचे विक्री व्यवस्थापनाचे धडेदेखील दिले जातात. शेती व्यवसाय, पर्यावरण, ऊर्जा पुनर्वापर, ग्रामीण विकास, छोटे व्यवसाय; या क्षेत्रांत कार्यरत राहून बायोगॅस (Biogas), बायोमास (Biomass), सौरऊर्जा (Solar Energy), बायोचर (Biochar) निर्मितीच्या कामी तंत्रज्ञान पुरविण्याचे कार्य ही संस्था करते. खेडोपाड्यात उपयोगी ठरणाऱ्या, कमीतकमी प्रदूषण करणाऱ्या चुलींची रचना या संस्थेतील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. तसेच कोळशासारख्या इंधनातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड व घनकण यांसारख्या प्रदूषकाचे मोजमाप करणारी साधने वापरून खेड्यातील घरात प्रदूषण वाढणार नाही याची खबरदारी ही संस्था घेत असते.

भाजीपाल्याचा कचरा, उष्टे-खरकटे व खराब झालेले अन्न वापरून बायोगॅस तयार करण्याचे यंत्र विकसित केले. पारंपरिक बायोगॅस संयंत्रांपेक्षा याला कमी अन्न लागते आणि वायू तयार होण्यास कमी वेळ लागतो.

आरतीमधील संशोधनातून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात कमी खर्चाच्या ऊति संवर्धन (टिश्यू कल्चर; Tissue Culture) प्रयोगशाळा उभारल्या गेल्या आहेत व त्याद्वारे उत्कृष्ठ दर्जाच्या रोपवाटिका उभारल्या गेल्या आहेत. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बंधू स्वस्त हरितगृह उभारून, त्याद्वारे फुलांची व भाजीपाल्यांची लागवड करत आहेत. याशिवाय, बांबूवर रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून हरितगृह, भाज्यांचे मांडव, पाण्याच्या टाक्या, फर्निचर, हातगाड्या, ट्रेलर इ. उपयुक्त वस्तू तयार करून त्या परिसरात विकून शेतकरी कमाई करतात. बांबूपासून पाण्याची टाकी तयार करून त्यात पावसाचे पाणी साठवितात. ऑस्ट्रेलियन अकेशिया या वनस्पतीची लागवड करण्यास प्रोत्साहन देऊन त्यापासून मिळणाऱ्या शेंगापासून उत्कृष्ठ गुणवत्तेचा साबण तयार करता येतो.

आरतीने कृषि कचऱ्यापासून कांडी कोळसा निर्माण करण्याची वैज्ञानिक शक्कल शोधून काढली. हा कोळसा जाळताना धूर निर्माण होत नसल्याने प्रदूषण टळते.

कळीचे शब्द : अश्डेनपुरस्कार #कांडीकोळसा #बायोगॅस # बायोगॅस #Biogas #बायोमास #Biomass #सौरऊर्जा #SolarEnergy #बायोचर #Biochar

संदर्भ :

  • तुस्कानो, जोसेफ विज्ञानवेध पार्टनर पब्लिकेशन, विरार २०१०.
  • देशपांडे, अ. पां. विज्ञान आणि वैज्ञानिक मनोविकास प्रकाशन,पुणे.
  • http://www.arti-india.org/

समीक्षक – मोहन मद्वाण्णा