गुर्ना, अब्दुलरझाक : (२० डिसेंबर १९४८). आधुनिक काळातील प्रसिद्ध टांझानियन-ब्रिटिश कादंबरीकार आणि नोबेल पारितोषिकाचे मानकरी. टांझानियातील झांझिबार बेटावर जन्म. बालपण झांझिबारमध्ये गेले. १९६४ च्या झांझिबार क्रांतीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना स्थलांतर करावे लागले. १९६८ मध्ये ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. क्राइस्ट चर्च कॉलेजमध्ये (आताचे कँटरबरी क्राइस्ट चर्च युनिव्हर्सिटी) शिक्षण घेतले. डोव्हर, केंट येथे माध्यमिक शाळेत काही काळ अध्यापन केले. कँटरबरी येथील युनिव्हर्सिटी ऑफ केंटमधून १९८२ साली पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता – “Criteria in the Criticism of West African Fiction” (पश्चिम आफ्रिकन कादंबरीच्या चिकित्सेसाठी निकष). पीएच.डी. संशोधन काळात (१९८० ते १९८२) ते नायजेरियातील बायेरो युनिव्हर्सिटी, कानो येथे अध्यापन करत होते. पुढे १९८५ साली ते युनिव्हर्सिटी ऑफ केंटच्या इंग्रजी विभागात रुजू झाले आणि तेथे निवृत्तीअखेर म्हणजे सन २०१७ पर्यंत अध्यापन केले. निवृत्तीनंतर पुढे इंग्रजी साहित्य आणि उपनिवेशोत्तर साहित्याचे गुणश्री प्राध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले.

गुर्ना यांचे आस्थेचे विषय म्हणजे उपनिवेशवादाचा वारसा, विस्थापन, निर्वासितांचे जीवन, स्मृती व ओळख, आणि सत्ता–हिंसा–विसंगती यांचे गुंतागुंतीचे संबंध. गुर्ना यांच्या कादंबरीलेखनात स्थलांतरितांचे दु:ख, वसाहतवादी हिंसाचाराचे परिणाम, तसेच संस्कृतींमधील संघर्ष यांचे तपशीलवार दर्शन घडते. स्थलांतरित आणि निर्वासित म्हणून त्यांना जो अनुभव आला, तो त्यांच्या साहित्याचा गाभा ठरला.
१९८० च्या दशकात त्यांनी लेखनास आरंभ केला. त्यांची पहिली कादंबरी ‘मेमरी ऑफ डिपार्चर’ (१९८७). यामध्ये एक तरुण आफ्रिकन नायक राजकीय अस्थिरता, दारिद्र्य आणि सामाजिक विषमता यांतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतो. ‘पिलग्रीम्स वे’ (१९८८) ही त्यांची दुसरी कादंबरी स्थलांतरितांच्या अनुभवांवर आधारित असून इंग्लंडमधील वर्णद्वेष आणि परकेपणाच्या जाणिवेचे चित्रण आहे. ‘डॉटी’ (Dottie) (१९९०) या कादंबरीमध्ये लंडनमध्ये वाढणाऱ्या आफ्रिकन वंशाच्या अनाथ मुलीचे जीवन चित्रित केले आहे.
गुर्ना यांची चौथी व सर्वाधिक गाजलेली कादंबरी ‘पॅराडाइज’ (१९९४) ही असून त्यांच्या लेखनाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारी ठरली. ही कथा पूर्व आफ्रिकेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घडते. युसूफ नावाच्या १२ वर्षांच्या मुलाची ही कहाणी. त्याच्या वडिलांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी, व्यापाऱ्याला गुलाम म्हणून त्याला विकलेले असते. त्या व्यापाऱ्यासोबत युसूफ आफ्रिकेच्या आंतरिक भागात प्रवास करतो. या प्रवासात त्याला विविध सांस्कृतिक समूहांचा परिचय होतो; आफ्रिकेतील स्थानिक जीवन, गुलामीची जीवघेणी प्रथा, तसेच जर्मन वसाहतवादी सत्तेची पकड याचा तो साक्षीदार होतो. या सगळ्या अनुभवांमधून वसाहतवादाचे होणारे पारंपरिक जीवनातील बदल, हिंसा आणि विस्थापनाची प्रक्रिया या कादंबरीतून उलगडते. ही कथा केवळ राजकीय-सामाजिक बदलांची नाही तर युसूफच्या वैयक्तिक प्रौढत्वाच्या प्रवासाची देखील आहे. निरागस बालपणातून जगाच्या कठोर वास्तवाशी त्याची होणारी टक्कर हीच कादंबरीची मुख्य धारा आहे. आफ्रिकन निसर्ग, व्यापारमार्गांवरील संघर्ष, वसाहतवादी हिंसा आणि सांस्कृतिक संघर्ष यांचा एकत्रित आलेख यात दिसतो. ‘पॅराडाइज’ला बुकर पारितोषिकाच्या अंतिम यादीत स्थान मिळाले आणि समीक्षकांनी त्याची तुलना आफ्रिकन मौखिक कथनपरंपरेशी केली. गुर्ना यांनी नोबेल पुरस्काराअगोदर बुकर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या लेखकांच्या यादीत स्थान मिळवले. आफ्रिकन इतिहास आणि स्मृती यांचे सौंदर्यपूर्ण तसेच वेदनादायी चित्रण करणारे लेखक म्हणून गुर्ना यांचे यशस्वी योगदान मानले जाते.
‘ॲडमायरींग सायलेंस’ (१९९६) मध्ये इंग्लंडमधील निर्वासितांचे आयुष्य व विस्कटलेल्या नात्यांचे चित्रण आहे. ‘बाय द सी’ (२००१) ही निर्वासितांच्या प्रश्नांवर आधारित भावस्पर्शी कादंबरी असून, आश्रयासाठी आलेल्या दोन टांझानियन व्यक्तींमधील गुंतागुंतीचे नाते यात उलगडले आहे. ‘डिझर्शन’ (२००५) मध्ये वसाहतवादाच्या काळातील प्रेमकथेच्या माध्यमातून सांस्कृतिक दुभंगलेपण आणि सामाजिक बंधनांचे चित्रण आहे. ‘द लास्ट गिफ्ट’ (२०११) मध्ये एका स्थलांतरित कुटुंबाची कहाणी असून स्मृती आणि विस्मृती मधील विलक्षण गुंतागुंतीचे चित्र आहे. ‘ग्रॅव्हल हार्ट’ (२०१७) मध्ये एका युवकाचे बालपण आणि कुटुंबातील तुटलेल्या नात्यांचे कथन आहे. ‘आफ्टरलाइव्हज’ (२०२०) ही त्यांची अलीकडील आणि सर्वाधिक गाजलेली कादंबरी असून जर्मन वसाहतवादाच्या काळातील आफ्रिकेतील लोकांचे जीवन व स्वातंत्र्यानंतरच्या हिंसक संघर्षांचे मार्मिक चित्रण यात आहे.
गुर्ना यांनी कादंबरी लेखनाबरोबरच आफ्रिकन साहित्यावरील समीक्षात्मक निबंध लिहिले आहेत. ‘एसेज इन आफ्रिकन रायटिंग’ (१९९५), ‘द केंब्रिज कंपॅनियन टू सलमान रश्दी’ (२००७) या ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले. ते ‘जर्नल ऑफ आफ्रिकन कल्चरल स्टडीज’ या नियतकालिकाचे संपादक होते.
गुर्ना यांना २०२१ साली साहित्यातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले. वसाहतवादाचे परिणाम आणि निर्वासितांच्या अनुभवांचे त्यांनी केलेले सहानुभूतिपूर्ण व निःपक्षपाती चित्रण या कारणास्तव त्यांना हा सन्मान देण्यात आला. या गौरवामुळे आफ्रिकन साहित्याला जागतिक व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळाली.
अगदी अलिकडे गुर्ना यांची ‘थेफ्ट’ (Theft) (2025) ही नोबेल पुरस्कारानंतरची कादंबरी. टांझानियातील १९८० ते २००० च्या दरम्यानचा काळ यात येतो. झांझिबारचे स्थलांतर आणि युरोपियन युनियनच्या निधीतून चालवलेला एक कार्यक्रम झांझिबारमध्ये सुरू होतो, ज्यातून मदतनीस आणि यूरोपियन पर्यटक तिथे दाखल होतात. मात्र, या हस्तक्षेपामुळे स्थानिक लोकांच्या दृष्टीने मदतीपेक्षा नुकसानच अधिक घडते, असे कादंबरीत दाखवले आहे.
गुर्ना हे स्थलांतरितांच्या वेदना, वसाहतवादी इतिहासाच्या जखमा आणि स्मृतींच्या ओझ्याखाली दबलेले जीवन या सर्वांचे संवेदनशील, प्रामाणिक व हृदयस्पर्शी लेखन करणारे लेखक म्हणून ओळखले जातात.
संदर्भ :
- Gurnah, Abdulrazzak, Theft, Bloomsbury Publishing (In), 2025.
- Steiner, Tina & Oluassen, Maria, Eds., English Studies in Africa, A Conversation with Adulrazak Gurnah, Vol. 56, Issue 13, Routledge, Page No. 1-3, 2013
- https://thebookerprizes.com/the-booker-library/features/the-booker-prizes-reaction-to-gurnahs-nobel-prize-in-literature
समीक्षक : गणेश सावजी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.