अर्लिक, पॉल : (१४ मार्च १८५४ – २० ऑगस्ट १९१५).

जर्मन वैद्यक शास्त्रज्ञ. त्यांनी विशेषत: रक्तशास्त्र (Hematology), रोगप्रतिकारशास्त्र (Immunology),  रसायनोपचार (Chemotherapy) आणि उपदंशाच्या (syphilis) परिणामकारक चिकित्सेच्या शोधाबद्दल मूलभूत काम केले. प्रतिरक्षा विषयीच्या कार्याबद्दल १९०८ सालाचे शरीरक्रियाविज्ञान अथवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक त्यांना इल्या इल्यीच म्येच्‍न्यिकॉव्ह (Élie Metchnikoff) यांच्या सोबत विभागून देण्यात आले.

अर्लिक यांचा जन्म स्त्रेलम या गावात तत्कालीन प्रशियात एका सधन उद्योगी ज्यू कुटुंबात झाला. आई रोजा वेगर्ट (Rosa Weigert) आणि वडील इस्मर अर्लिक (Ismar Ehrlich) होते. वडील खाणावळ चालवित. शाळेत शिकत असतानाच ते त्यांच्या मामाच्या विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) प्रयोगशाळेत जात असत. तेथे त्यांना पेशींवर रासायनिक रंगद्रव्यांचा वापर करून पेशींचे बदलते रंग पाहण्याचा परिचय झाला. वैज्ञानिक भाषेत या प्रक्रियेला अभिरंजन (स्टेनिंग; Stainning) म्हणतात. या प्रकियेबद्दल त्यांच्या मनात रस आणि जिज्ञासा निर्माण झाली. पेशीतल्या विविध प्रक्रिया आणि क्रिया समजायला अभिरंजनाची मदत होते हे त्यांना समजले. पुढेले सारे आयुष्य त्यांनी अभिरंजनाच्या विविध प्रक्रिया आणि प्रयोग विकसित करून त्यांचा उपयोग वैद्यकीय उपचारासाठी केला. १८७८ मध्ये वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी बर्लिनमधल्या एका इस्पितळात चिकित्सक पदावर कामाला सुरुवात केली. रोगांची चिकित्सा करत असताना पेशी, जंतू आणि ऊतींचा अभ्यास आणि संशोधन त्यांनी सुरू ठेवले. त्याचवेळी त्यांनी मास्ट पेशी (सेल मास्ट; mast cell) सर्वप्रथम जगासमोर आणल्या.

अर्लिक यांनी उंदराच्या मादी रायसीन हे विष चढत्या मात्रेत दिले. त्यामुळे मादी उंदीर विषाचा प्रतिकार करू शकली, विष रोधक बनली. म्हणजेच या उंदरांमध्ये विषाबाबत रोगप्रतिकारशक्ती  (Immunity) निर्माण झाली. या मादीच्या दुधावर वाढवलेल्या पिलांमध्ये रायसिनचा प्रतिकार करणारी रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले. यावरून मातेच्या दुधामार्फत पिलांना प्रतिकारक द्रव्य मिळाल्याचे त्यांनी सिद्ध केले.काही काळ त्यांनी रॉबर्ट कॉख इन्स्टिट्यूटमध्ये काम केले. त्यावेळी रॉबर्ट कॉख (Robert Koch) यांनी क्षयरोगाच्या जंतूंचा शोध लावला होता. ते जंतू ओळखण्याची अभिरंजन प्रक्रिया (acid fast staining) अर्लिक यांनी शोधली. त्याच काळात रक्तातल्या लाल, पांढऱ्या पेशी ओळखून त्यांचे वर्गीकरण करण्याची पद्धत अर्लिक यांनी शोधली. येथून रक्तशास्त्राची सुरुवात झाली.

अर्लिक यांनी जिवंत ऊतींमधल्या पेशीही ओखळल्या. ऊतींना ऑक्सिजनची गरज असते आणि ऊतीच्या रूपानुसार ऊती कमी-अधिक ऑक्सिजन वापरतात. पेशींची जीवनशक्ती ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर अवलंबून असते हे त्यांनी सिद्ध केले.

अर्लिक यांना क्षयरोग झाल्यावर उपचारासाठी ते काही काळ इजिप्तमध्ये राहिले. पूर्ण रोग मुक्त झाल्यावर ते रॉबर्ट कॉख इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी गेले. त्यावेळेपर्यंत जिवाणू रोग कसा पसरवितात ते माहीत नव्हते. रोगाचा बंदोबस्त शरीरातली रोगप्रतिकारशक्ती कशा रीतीने करते तेही माहीत झालेले नव्हते. अर्लिक यांनी सहशृंखला (side chain) सिद्धांत मांडून शरीर रोगप्रतिकारशक्ती कशा रितीने तयार करते ते सिद्ध केले. त्यांचा शोध असा पेशींच्या आवरणावर अनेक अभिग्राहक (receptor) असतात. हे अभिग्राहक अनेक प्रकारच्या प्रथिनांना चिकटतात आणि त्या प्रथिनांना नाकारायचे की स्वीकारायचे ते ठरवतात. या अभिग्राहकांची सहशृंखला काही अभिग्राहक विषाणू शोधतात, विषाणूंना चिकटतात आणि त्यांना नष्ट करण्यासाठी प्रतिद्रव्य तयार करतात. हीच ती रोगप्रतिकारशक्ती. रोगप्रतिकारशक्तीचा हा सिद्धांत सर्वच बाबतीत खरा ठरत नाही, असे नंतर सिद्ध झाले तरी रोगप्रतिकारशक्तीच्या शोधाचा मार्ग मात्र कळला.

अर्लिक यांनी १८९४ मध्ये रॉबर्ट कॉख यांच्या सांगण्यावरून अर्लिक इन्स्टिट्यूट ऑफ इंफेक्शस डिसिजेसमध्ये एमिल बेरिंग (Emil Behring) यांच्याबरोबर काम करण्यास रुजू झाले. बेरिंगनी घटसर्पाचे प्रतिविष (anti serum) तयार केले होते. औषधाची योग्य मात्रा सापडली नसल्याने ते औषध प्रभावी ठरत नव्हते. अर्लिक यांनी प्रतिविषाची नेमकी मात्रा शोधण्याचे तंत्र शोधून काढले. त्यामुळेच घटसर्पावर (Diphtheria) उपयुक्त औषध तयार झाले. या औषधासाठी बेरिंग यांना १९०१ सालातील शरीरक्रियाविज्ञान अथवा वैद्यक नोबेल पारितोषिक मिळाला. अर्लिक त्या प्रयोगात असूनही त्यांना या पारितोषिकाने हुलकावणी दिली.

रक्ताची सीरममधून प्रतिविष तयार करण्याची क्षमता विशिष्ट जीवाणूंपुरतीच मर्यादित होती. आदिजीवांपासून होणाऱ्या रोगांवर प्रतिविष परिणामकारक ठरत नसत. निसर्गात निर्माण झालेली रोगप्रतिकारक्षमता उपयोगी  पडत नाही असे वाटल्यावरून अर्लिक यांनी कृत्रिम रसायनाचा वापर करायचे ठरवले. त्यांनी आर्सेनिक या विषारी धातूपासून अनेक रसायने तयार केली. या रसायन निर्मितीतले ६०६ वे रसायन आर्स्फेनामाइन (Arspheuamine) म्हणजेच साल्व्हार्सन (Salvarsan). हे रसायन गुप्तरोगावर प्रभावी ठरले. हे रसायन गुप्तरोग ग्रस्त पेशीतील नेमक्या रोगजंतूंना मारते. या औषधाच्या एका इंजेक्शनने रोग पूर्ण बरा झाल्याने या औषधाला जादुई गोळी असे नाव देण्यात आले. आर्सेनिक रसायनाच्या वापरापासून उपचारशास्त्रात रसायनोपचाराची सुरुवात झाली. अर्लिक यांनी वैद्यकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांची सांगड घातली. अर्लिक यांना रसायनोपचाराचा जनक मानले जाते.

जर्मनीतल्या सरकारांनी आणि विद्यापीठांनी अध्यापनासाठी व संशोधनासाठी अर्लिक यांना अनेक पारितोषिके दिली आणि त्यांचे मान-सन्मान केले. जर्मनीतल्या अनेक शहरांचे सन्माननीय नागरीकत्व त्यांना देण्यात आले, अनेक शहरांनी त्यांचे नागरी सत्कार केले, शहरांतल्या रस्त्यांना त्यांचे नाव दिले.‍

अर्लिक यांचे हँबर्ग येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Valent, Peter,  Schumacher, Udo et al Paul Ehrlich and the birth of molecular medicine The Hemotologist Vol 12,Issue 6, 2015.
  •  Ingraham, C. A. Introduction to Microbilogy, 2nd edition.
  • Stanier, R.Y., Adelberg, E.A., Ingraham, J. L., The Microbial World, 4th edition.

कळीचे शब्द – #रायसीन #प्रतिकारशक्ती #अभिरंजन #पेशी #रक्तशास्त्र #सहशृंखलेचा सिद्धांत #सीरम #नोबेल

समीक्षक – रंजन गर्गे