कलाम, ए.पी.जे. अब्दुल : (१५ ऑक्टोबर १९३१ – २७ जुलै २०१५) भारतीय शास्त्रज्ञ. त्यांचे संपूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली. ते २००२ ते २००७ पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते. त्यांच्या वैज्ञानिक कामगिरी आणि लोकप्रियतेमुळे त्यांना क्षेपणास्त्र मानव (missile man) आणि लोकांचे राष्ट्रपती (People’s President) ही उपाधी मिळाली.
कलाम यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम (धनुष्कोडी) येथे झाला. पाच भावंडांपैकी सर्वांत लहान असलेले कलाम त्यांच्या गरीब परिस्थितीतही शिक्षण घेत राहिले. त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून वैमानिक अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि १९५८ मध्ये ते संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत (डीआरडीओ; DRDO) सामील झाले. १९६९ मध्ये ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो; ISRO) ते एसएलव्ही-III चे प्रकल्प संचालक होते. एसएलव्ही-III हे भारतात आरेखन आणि उत्पादित केलेले पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन होते. १९८० मध्ये एसएलव्ही-III ने रोहिणी नावाचा उपग्रह पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वी रीत्या सोडला, त्यामुळे भारताचा अंतराळ कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. कलाम यांनी इस्रोमध्ये प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या पुढील विकासाचे निरीक्षण केले, ज्यामध्ये ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा समावेश होता.
कलाम यांनी डीआरडीओमध्ये पुन्हा सामील झाल्यानंतर (१९८२) एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची योजना आखली. त्यामध्ये त्यांनी अनेक यशस्वी क्षेपणास्त्रे तयार केली. त्यांपैकी भारताचे पहिले मध्यम-श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि, ज्यामध्ये एसएलव्ही-III चे पैलू समाविष्ट होते; ते प्रथम १९८९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. आणखी एक यश म्हणजे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे सामरिक क्षेपणास्त्र पृथ्वी.
कलाम भारताच्या संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते (१९९२ – ९९) आणि नंतर त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळवून सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले (१९९९-२००१) . या काळात त्यांनी सरकारच्या क्षेपणास्त्र प्रणालींच्या शस्त्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळे भारताला अणुक्षमता मिळाली. १९९८ मध्ये ते पोखरण-२ मालिकेतील अणुचाचण्यांच्या मुख्य समन्वयकांपैकी एक होते. त्या वेळी राजस्थान राज्यातील पोखरण शहरातील चाचणी रेंजवर पाच चाचणी बाँबस्फोट करण्यात आले. देशाच्या अणुचाचण्यांमध्ये त्यांच्या प्रमुख भूमिकेमुळे भारत अणुशक्ती म्हणून मजबूत झाला. १९९८ मध्ये कलाम यांनी टेक्नॉलॉजी व्हिजन- २०२० नावाची देशव्यापी योजना पुढे आणली, ज्याचे वर्णन त्यांनी २० वर्षांत भारताला कमी विकसित समाजातून विकसित समाजात रूपांतरित करण्यासाठी एक मार्गिका म्हणून केले. या योजनेत कृषी उत्पादकता वाढवणे, आर्थिक विकासाचे साधन म्हणून तंत्रज्ञानावर भर देणे आणि आरोग्य सेवा व शिक्षणाची उपलब्धता वाढवणे इ. समाविष्ट होते.
कलाम यांनी माजी क्रांतिकारी नेत्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचा पराभव करून राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. जुलै २००२ मध्ये त्यांनी भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते नागरी जीवनात परतले. भारताला विकसित देशात रूपांतरित करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यास ते वचनबद्ध राहिले आणि त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याता म्हणून काम केले. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अनेक विद्यापीठीय क्षेत्रात अभ्यागत प्राध्यापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (तिरुवनंतपुरम) चे संस्थापक कुलगुरू होते. मुलांशी संपर्क साधण्यात त्यांना मोठे यश मिळाले आणि तरुणांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि प्रेरणा देणे हे त्यांचे वैयक्तिक ध्येय बनले.
कलाम यांनी अनेक पुस्तके लिहिली : विंग्ज ऑफ फायर (१९९९- आत्मचरित्र; भाषांतरित – अग्निपंख ), इग्नाइटेड माइंड्स (२००२), इटर्नल क्वेस्ट (बालसाहित्य – कादंबरी). त्यांच्या असंख्य पुरस्कारांमध्ये देशातील तीन सर्वोच्च सन्मानांचा समावेश होता : पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०) आणि भारतरत्न (१९९७).
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग, भारत येथे व्याख्यान देत असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
कलाम यांच्या सन्मानार्थ अनेक रस्ते, इमारती आणि संस्था आहेत. २०१५ मध्ये ओडिशा राज्यातील एका क्षेपणास्त्र चाचणी स्थळाचे नाव व्हीलर बेटावरून अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले. २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आढळलेल्या जीवाणूच्या एका नवीन प्रजातीचे नाव सोलिबॅसिलस कलामी असे ठेवण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येताे.
समीक्षक : सरोजकुमार मिठारी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.