सेहगल, लक्ष्मी : (२४ ऑक्टोबर १९१४–२३ जुलै २०१२).

भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन. त्यांचा जन्म डॉ. एस्. स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दांपत्यापोटी चेन्नई येथे झाला. वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील होते. आई स्वातंत्र्यचळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या; लक्ष्मी आईबरोबर कलकत्ता (कोलकाता) येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या (१९२८). अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी दोनशे स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन करून घेतले होते. त्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा लक्ष्मी यांच्यावर प्रभाव पडला.

लक्ष्मी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला (१९३०). त्यांना अटक झाली; पण शाळा, महाविद्यालय यांवर बहिष्कार घालण्याची कृती त्यांना अमान्य होती. देशाच्या स्वातंत्र्याकरिता शिक्षण आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. महाविद्यालयात असताना त्यांचा बी. के. एन्. राव या विमानचालकाशी परिचय होऊन त्याची परिणती विवाहात झाली; तथापि रावांशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर त्या विभक्त झाल्या. पुढे त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून एम्. बी. बी. एस्. पदवी मिळविली (१९३८). तसेच स्त्रीरोग चिकित्सा व प्रसूतिशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले (१९३९). लक्ष्मी यांनी चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात अल्पकाळ नोकरी केली. एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला गेल्या (१९४०). तिथे त्यांनी भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना उघडला.

आझाद हिंद सेनेच्या संचलनप्रसंगी सुभाषचंद्र बोस यांच्यासमवेत लक्ष्मी सेहगल.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली (१९४३). २ जुलै १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर आले होते. त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी, अशी इच्छा व्यक्त केली. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या, शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले. सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली व लक्ष्मींना महिला व बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. १९४४ पर्यंत सु. एक हजार महिला जवान व पाचशे परिचारिका जवान अशी पंधराशेची पलटण झाली. जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले. ‘चलो दिल्ली‘ हे त्यांचे लक्ष्य होते; मात्र अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबाँब टाकला आणि जपानने शरणागती पतकरली (१९४५). तेव्हा आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. युद्धविरामापर्यंत कॅप्टन लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कर्नल झाल्या होत्या. त्या रंगूनमध्ये पकडल्या गेल्या. एक वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या (१९४६). भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर त्यांची सुटका झाली.

भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला (१९४७). कर्नल सेहगल यांनी कानपूरमध्ये नोकरी मिळवली व लक्ष्मी यांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले. त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या. पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली (१९७१). बांगला देश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकातामध्ये छावण्या सुरू केल्या, वैद्यकीय मदत केली (१९७१). भोपाळ वायु दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांसाठीही त्यांनी वैद्यकीय सेवा दिली (१९८४).

त्यांच्या देदीप्यमान कर्तृत्वाबद्दल भारत सरकारने पद्मविभूषण किताब देऊन त्यांचा गौरव केला (१९९८). अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध राष्ट्रपती पदाची निवडणूक त्या हरल्या (२००२).

कानपूर येथे त्यांचे वार्धक्याने निधन झाले.

सुभाषिणी अली व अनिसा पुरी या त्यांच्या सुविद्य कन्या, तर नातू शाद अली हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई (१९२८—२०१६) ह्या त्यांच्या धाकट्या भगिनी होत.

संदर्भ :

  • Majumdar, R. C. History Of Freedom Movement in India, Vol. 3, Calcutta, 1968.
  • Sahgala, Lakshmi, A revolutionary life : memoirs of a political activist, New Delhi, 1997.