अन्विती : वाक्यांमधील काही शब्दांची रूपे अनेकदा त्याच वाक्यातील इतर शब्दांवर अवलंबून असतात. उदा., मराठी भाषेत वाक्यातील क्रियापदाचे रूप हे वाक्याच्या कर्ता किंवा कर्माच्या गुणधर्मांनुसार बदलते. एकाच पदसमूहातील, उपवाक्यातील किंवा वाक्यातील शब्दांच्या रूपांच्या अशा परस्परसंबंधाला ‘अन्विती’ म्हणतात. मराठीतील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुष या गुणधर्मांनुसार बदलते. उदा.,
१. ती अभ्यास करते. वि. तो अभ्यास करतो. (लिंग-अन्विती)
२. मी शाळेला जातो. वि. तू शाळेला जातोस. (पुरुष-अन्विती)
३. त्याने पुस्तक वाचले. वि. त्याने पुस्तके वाचली. (वचन-अन्विती)
(१) व (२) ही कर्ता-क्रियापद अन्वितीची उदाहरणे आहे. तर (३) हे कर्म-क्रियापद अन्वितीचे उदाहरण आहे. नाम किंवा सर्वनाम यांच्या लिंग, वचन आणि पुरुष या व्याकरणात्मक गुणधर्मांशी वाक्यातील क्रियापदाचा परस्परसंबंध असल्याचे जगभरातल्या अनेक भाषांमध्ये दिसून येते. लिंग, वचन आणि पुरुष यांना एकत्रितपणे ‘फाय फिचर्स’ (φ ग्रीक अक्षर) म्हणतात. नाम किंवा सर्वनामांना लागणारे विभक्तीप्रत्यय कर्ता/कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधांमध्ये अडथळा निर्माण करतात. अशा वेळी क्रियापद कोणताही विभक्तीप्रत्यय नसलेल्या नामाशी अन्वय साधते. उदा.,
४. राधाला आंबा आवडतो. वि. राधाला सफरचंद आवडते.
५. नेहाने वरुणला पुस्तक दिले. वि. नेहाने वरुणला वही दिली.
अशा प्रकारच्या अन्विती-विभक्तीप्रत्यय संबंधाचे स्वरूप भाषेगणिक बदलते. उदा., मैथिलीसारख्या भाषेत नामांवरील विभक्तीप्रत्यय अन्वितीमध्ये अडथळा निर्माण करत नाहीत. मराठी आणि इतर काही भाषांमध्ये क्रियापद वाक्यातील एकापेक्षा अधिक घटकांशी एकाच वेळी अन्विती साधू शकते. पुढील उदाहरणांमध्ये कर्म आणि क्रियापद लिंग-अन्विती साधतात तर, कर्ता आणि क्रियापद पुरुष-अन्विती साधतात.
६. तू पुस्तक वाचलंस.
७. तू कादंबरी वाचलीस.
वाक्यातील शब्दांच्या परस्परसंबंधाची व्याप्ती ही नाम, सर्वनाम आणि क्रियापद यांच्यापुरती मर्यादित नसून विशेषण, पूरक-दर्शक (complementizer), इ. शब्दप्रकारदेखील अशा परस्परसंबंधात भाग घेतात. अशा प्रकारचा परस्परसंबंध एकाच पदसमूहातील शब्दांमध्येही आढळतो. काही विशेषणांची रूपे ही विशेष्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलतात, उदा., हिरवा कुर्ता, हिरवी साडी, हिरव्या साड्या. एकाच पदसमूहातील शब्दांमध्ये आढळणाऱ्या अशा प्रकारच्या परस्परसंबंधाला सुसंवाद (concord) असे म्हणतात. अशा प्रकारचा सुसंवाद नाम, सर्वनाम आणि विशेषण यांच्या विभक्तीप्रत्ययाच्या पुनरावृत्तीमधूनही दिसून येतो, उदा. रक्तस्य पुष्पस्य नाम किं? (लाल फुलाचे नाव काय?) या प्रश्नार्थक संस्कृत वाक्यात विशेषणालाही विशेष्याचा विभक्तीप्रत्यय लागतो. अशा प्रकारचा एकाच पदसमूहांतर्गत असलेला परस्परसंबंध आणि वाक्यातील कर्ता/कर्म व क्रियापद अशा दूरस्थ पदांचा एकमेकांशी असणारा परस्परसंबंध यांची हाताळणी सैद्धांतिक पातळीवर कशा प्रकारे करावी यामध्ये भाषावैज्ञानिकांमध्ये मतभिन्नता आढळते.
अन्वितीद्वारे वाक्यातील एका घटकाचे गुणधर्म दुसऱ्या घटकावर प्रतिबिंबित होतात. मात्र, हे गुणधर्म वाक्यातील एका घटकात उपस्थित असताना ते दुसऱ्या घटकावर पुन्हा प्रतिबिंबित होण्यामागचे कारण भाषेच्या स्वरूपामध्ये दडलेले आहे. भाषा ही संदेशवहनाची एक पद्धत असल्यामुळे भाषेच्या वापराद्वारे अखंडितपणे दृश्य किंवा श्राव्य स्वरूपातील संदेश पाठवले जात असतात. इतर संदेशवहन पद्धतींप्रमाणेच इथेही संदेशवहनादरम्यान पाठवलेली माहिती गहाळ होण्याची किंवा अचूकपणे न पोहोचण्याची शक्यता असते. ही शक्यता टाळण्यासाठी भाषिक संदेशांमधील महत्त्वाची माहिती अन्वितीद्वारे वाक्यातील विविध घटकांवर पुन:पुन्हा प्रतिबिंबित केली जाते. म्हणजेच, अन्वितीद्वारे भाषिक संदेशवहन अधिक कार्यक्षम व बिनचूक होण्यास मदत होते.
संदर्भ :
-
- Baker, Mark, The Syntax of Agreement and Concord, Cambridge University Press, 2008.
- Corbett, Greville, Agreement, Cambridge University Press, 2006.
- Corbett, Greville, Features, Cambridge University Press, 2012.
समीक्षक : सोनल कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.