गौतम : न्यायदर्शनाच्या परंपरेत गौतम या नावाचा उल्लेख दोन प्रकारे येतो. (१) मेधातिथी गौतम, (२) अक्षपाद गौतम. मेधातिथी गौतम हे इ.स.पू. सहाव्या शतकात होऊन गेलेले ऋषी व ‘न्यायशास्त्रा’चे प्रणेते मानले जातात. त्यांचे जन्मस्थान मिथिला नगरीजवळ होते. ‘रामायण’ व ‘महाभारता’त उल्लेखिलेले अहिल्यापती गौतम ते हेच असावे. गौतम हे त्यांचे गोत्रनाम होते. त्यांनी रचलेल्या ‘न्यायशास्त्रा’ला आन्वीक्षिकी म्हटले जाते. त्यांच्या ‘न्यायशास्त्रा’चे प्रतिबिंब इ.स. पहिल्या शतकातील ‘चरकसंहिता’ या आयुर्वेद ग्रंथातील विमानस्थान या प्रकरणातील (आठवा अध्याय) वाद पद्धतीच्या विवेचनात दिसून येते. पुढे मेधातिथी गौतमांच्या ‘न्यायशास्त्रा’ची सुव्यवस्थित मांडणी अक्षपाद-विरचित ‘न्यायसूत्र’ या ग्रंथात झालेली दिसून येते.
विख्यात भारतविद्यावंत सतीशचंद्र विद्याभूषण (१८७०–१९२०) यांच्या विवेचनानुसार ‘न्यायशास्त्रा’चे जनक मेधातिथी गौतम आणि ‘न्यायसूत्र’ ह्या ग्रंथाचे कर्ते अक्षपाद या दोन व्यक्ती एकच नसाव्यात. कालांतराने अक्षपादांना अक्षपाद गौतम अशी प्रसिद्धी मिळाली असावी. अक्षपाद या शब्दाची व्युत्पत्ती ज्याच्या पायाला (पाद) डोळे (अक्ष) आहेत अशी दिली जाते. या व्युत्पत्यर्थानुसार काही दंतकथाही प्रचलित झालेल्या दिसतात. एका दंतकथेनुसार तर्कशास्त्रात पारंगत असलेले अक्षपाद विचारात मग्न असताना चालता चालता विहिरीत पडले. तेव्हा परमेश्वराने त्यांना वर काढून पुन्हा तसे घडू नये यासाठी त्यांच्या पायाला नेत्र दिले. काठेवाडमधील प्रभासक्षेत्र हे अक्षपादांचे कार्यक्षेत्र सांगितले जाते. विद्याभूषण यांच्या मते ‘न्यायसूत्र’कार अक्षपादांचा काळ इ.स.सु. दुसरे शतक हा असावा.
अर्थात, पारंपरिक विद्वानांचा कल मेधातिथी गौतम आणि ‘न्यायसूत्र’कार अक्षपाद (गौतम) ही एकच व्यक्ती होती असे मानण्याकडे दिसतो.
अक्षपादप्रणीत ‘न्यायसूत्र’ या ग्रंथाचे महत्त्व एकूण भारतीय तत्त्वज्ञानात अनन्यसाधारण आहे. या ग्रंथाने प्रमाणमीमांसा या विषयाचा पाया घातला आणि एका प्रकारे अन्य दर्शनांपुढे एक आव्हान उभे केले. त्यामुळे ‘न्यायसूत्रा’नंतर इतर दर्शनांच्या आचार्यांना न्यायदर्शनातील प्रमाणविचाराची दखल घ्यावी लागली व स्वत:चा प्रमाणविचार पुढे मांडावा लागला. दुसरीकडे ‘न्यायसूत्रा’वर अनेक टीकाग्रंथ रचले गेले. उदा., वात्सायनांचे ‘न्यायभाष्य’ (इ.स. चवथे शतक), उद्योतकरांचे ‘न्यायवार्तिक’ (इ.स. सातवे शतक), वाचस्पतिमिश्रांची ‘न्यायवार्तिकतात्पर्यटीका’ (इ.स. नववे शतक) तसेच जयन्तभट्टांची ‘न्यायमञ्जरी’ (इ.स. आठवे शतक), भासर्वज्ञांचे ‘न्यायभूषण’ (इ.स. नववे व दहावे शतक) आणि उदयनाचार्यांची ‘न्यायवार्तिकतात्पर्यटीकापरिशुद्धि’ (इ.स. दहावे शतक). या टीकाग्रंथांच्या माध्यमातून न्यायदर्शनाचा उत्तरोत्तर विकास झाल्याचे दिसून येते. उदयनाचार्यांच्या नंतर गंगेशोपाध्याय (इ.स. तेरावे शतक) यांनी न्यायतत्त्वांची नव्याने चिकित्सक मांडणी केली. त्यामुळे न्यायसूत्रांचे मध्यवर्ती स्थान बाजूला पडले. अर्थात, ‘न्यायसूत्र’कार गौतमांचे महत्त्व अबाधित राहिले.
‘न्यायसूत्रा’त एकूण सोळा तत्त्वांचे प्रतिपादन व चिकित्सक विवेचन केले आहे. ते म्हणजे प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टान्त, सिद्धान्त, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितण्डा, हेत्वाभास, छल, जाति आणि निग्रहस्थान. या तत्त्वांच्या विवेचनातून मुख्यत: तीन विषय पुढे मांडले आहेत – (१) यथार्थज्ञान (प्रमा) कोणते व त्याची साधने (प्रमाणे) कोणती? (२) या प्रमाणांच्या माध्यमातून विषयाचे स्वरूप कसे निश्चित केले जाते? (३) आपल्या मताची सिद्धता व विरोधी मताचे खंडन यासाठी वादपद्धती कोणती? वादाचे प्रकार व जयपराजयाचे नियम कोणते?
संदर्भ :
- Satishchandra, Vidyabhushan, ‘A History of Indian Logic’, Calcutta University, 1921.
समीक्षक : नागोराव कुंभार
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.