भारताच्या अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एक छोटेसे बेट. भारतीय उपखंडातील एकमेव जागृत ज्वालामुखी या बेटावर असल्यामुळे ते विशेष महत्त्वाचे आहे. बॅरन
बेटावर वस्ती नसल्यामुळे, तसेच तेथे आढळणारी राखेच्या संचयनातून निर्माण झालेली ओबडधोबड भूदृष्ये व विरळ वनस्पती यांमुळे त्याला बॅरन (ओसाड) बेट म्हटले जाते. अंदमान व निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर (श्री विजयपूरम) या शहरापासून ईशान्येस सुमारे १३८ किमी., अंदमान समुद्राच्या पूर्व भागात हे बेट आहे. या बेटाची लांबी ३.४ किमी., रुंदी ३.१ किमी., समुद्रकिनाऱ्याची लांबी १२.३८ किमी. व क्षेत्रफळ ८.३४ चौ. किमी. असून समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंची ३५३ मी. आहे. प्रशासकीय दृष्ट्या हे बेट उत्तर व मध्य अंदमान जिल्ह्यात आहे.
नावाप्रमाणेच ओसाड असलेल्या या लहानशा बेटाचा बराचसा भाग ज्वालामुखी पर्वताने व्यापलेला आहे. बॅरन बेटावरचा हा ज्वालामुखी केंद्रीय पद्धतीचा असून त्याचे उद्रेक स्ट्राँबोलीयन ते हवाई प्रकारचे झालेले आहेत. मध्यवर्ती नळीतून बाहेर फेकल्या गेलेल्या लाव्हारसाच्या संचयनातून तेथे सागरतळापासून अंदाजे दोन हजार मीटर उंचीच्या शंकू पर्वताची निर्मिती झालेली आहे. प्रत्येक उद्रेकानंतर त्याची उंची वाढत जाते. शिखरावर साधारण दोन किमी. व्यासाचे ज्वालामुखी कुंड निर्माण झाले आहे. भारतीय भूपट्टाचे बर्मा भूपट्टाच्या खाली अधोगमन झाल्यामुळे बॅरन बेटाची निर्मिती झालेली असावी, असा अंदाज आहे. अलीकडच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, बॅरन बेटाच्या भूपृष्ठावरील ज्वालामुखी खडक सुमारे १.६ द. ल. वर्षांपूर्वी निर्माण झालेले असावेत; तर या बेटाच्या लगतचे महासागरी तळ सुमारे १०६ द. ल. वर्षांपूर्वी ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेले असावेत. यावरून बॅरन बेटावरील ज्वालामुखी लाखो वर्षांपूर्वीपासून जागृत स्वरूपात आहेत, हे स्प्ष्ट होते. गेल्या काही शतकांत झालेल्या उद्रेकांच्या नोंदींवरूनही हे सिद्ध होते. बॅरन बेटावरील ज्वालामुखीचा पहिला नोंदणीकृत उद्रेक इ. स. १७८७ मधील असून त्यानंतर अनेकदा उद्रेक झालेले आहेत. इ. स. १७८९, १७९५, १८०३-०४ व १८५२ मध्ये झालेल्या उद्रेकांचीही नोंद आढळते. त्यानंतर जवळजवळ दीडशे वर्षांच्या निद्रितावस्थेनंतर १९९१ मध्ये उद्रेक झाला. हा उद्रेक पुढे १९९३ पर्यंत अधूनमधून धुमसत होता. याचा १९९५ मध्ये पुन्हा एकदा मोठा उद्रेक झाला. या वेळी बाहेर फेकला गेलेला लाव्हा दीड किमी. पर्यंत वाहत जाऊन समुद्रात मिसळला होता. या लाव्हारसाची दीड किमी. लांबीची व ५० मी. रुंदीची मोठी नदीच तयार झाली होती. लाव्हा उत्सर्जनापाठोपाठ मोठा गडगडाट करीत राखेचे २०० मी. उंचीचे लोट, पाण्याची वाफ आणि वायूचे फवारे बॅरन ज्वालामुखीच्या कुंडातून बाहेर फेकले गेले. त्यामुळे बेटावरील पक्षी व प्राण्यांची संख्या बरीच कमी झाली. त्यानंतर २००५-०७, २०१७-१८ व जानेवारी २०२२ मध्ये झालेले उद्रेक त्यामानाने कमी तीव्रतेचे होते. सर्वांत अलीकडे १३ व २० सप्टेंबर २०२५ या दिवशी उद्रेक झाले आहेत. या उद्रेकाच्या वेळी बाहेर फेकलेली राख आकाशात ईशान्येच्या दिशेने सुमारे ३,००० मी. उंचीपर्यंत गेली होती.
राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेतर्फे (एनआयओ) या ज्वालामुखीच्या हालचालींचे निरीक्षण आणि विश्लेषण चालू आहे. ज्वालामुखी पर्वताच्या कडा जरी ओसाड असल्या तरी, शंकूच्या उतारांवर दाट झाडी आढळते. मानवी वस्ती नसली तरी कबूतर, शेळ्या, उडणारे खोकड, कृंतक यांसारखे पक्षी व प्राणी काही प्रमाणात येथे आढळतात. बेटावर संरक्षित वन्य जीव अभयारण्य आहे. स्कूबा डायव्हिगसाठी बॅरन बेटाच्या भोवतालचा सागरी भाग विशेष प्रसिद्ध आहे. ज्वालामुखी उद्रेक, बेसाल्ट शैलसमूह, पूर्वीच्या लाव्हा प्रवाहाचे भूमिस्वरूप, सभोवताली पसरलेले खोल समुद्राचे निळेशर पाणी, वेगाने वाढणाऱ्या प्रवाळ बागा ही येथे येणाऱ्या पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. पर्यटनास ऑक्टोबर ते एप्रिलच्या सुरुवातीचा काळ अनुकूल असतो. या काळात बॅरन बेटावरील हवामान आल्हाददायक असते. समुद्र शांत असतो. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या धुराच्या लोटांची दृश्यता उत्तम असते. वारे मंद गतीने वाहतात. मान्सून वाऱ्यांमुळे निर्माण झालेले सागरी प्रवाह सुरक्षित प्रवासाला साहाय्यभूत ठरतात. त्यामुळे या काळात अखंडपणे पर्यटनाचा आनंद घेता येतो. अर्थात त्यासाठी पोर्ट ब्लेअर येथील वन विभागाची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य असते. सुरक्षेच्या दृष्टीने फक्त दिवसाच पर्यटन करता येते. रात्री मुक्कामास परवानगी नसते. बेटावर जाण्यास पर्यटकांना मनाई आहे; परंतु सभोवतालच्या सागरी भागातून बोटींद्वांरे बेटावरील सौंदर्य अनुभवता येते. बॅरन बेटाच्या उत्तरेस, उत्तर अंदमान समुद्रात नारकोंडम (नरक कुंडम) बेट असून त्याच्यावर ७१० मी. उंचीचा एक निद्रिस्त ज्वालामुखी असून त्याच्या मुखाचा भिंतीसारखा भाग पार नाहीसा झाला आहे. नारकोंडम ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक इ. स. १६८१ मध्ये झाला होता. असे असले, तरी काही वेळा त्याच्यातून अल्प प्रमाणात वायू व धूर बाहेर आल्याचे आढळले आहे.
संदर्भ :
- Sing, R. L., Regional Geography of India, India, 1971.
- Spate, O. H. K.; Learmonth, Andrew T. A.; Farmer, B. H., India, Pakistan and Ceylon, Malton, 1972
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.