नायर, श्री के. : ( जानेवारी १९६३). भारतीय-अमेरिकन अभियंता आणि संगणक शास्त्रज्ञ. संगणकीय रेखांकन (प्रतिमादृष्टी), संगणकीय प्रतिमा आणि संगणक ग्राफिक्स या क्षेत्रांतील योगदानासाठी ते नामांकित आहेत. संगणकीय प्रतिमाकरण (computational Imaging) आणि संगणकीय रेखांकन (computer vision), नाविन्यपूर्ण कॅमेरे, भौतिकीच्या पायावर आधारित रेखांकन व प्रतिमांकन प्रतिकृती (models for vision and graphics) आणि प्रतिमा समजण्यासाठीची तर्कशुद्ध नियमावली (algorithm) ही त्यांच्या संशोधनाची प्रमुख क्षेत्रे आहेत.
नायर यांचा जन्म बंगळुरु येथे झाला. शालेय शिक्षण दिल्लीतून पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरामधून विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी संपादन केली (१९८४). त्यानंतर ते दिल्ली येथील टेलर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांनी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठातून विद्युत व संगणक अभियांत्रिकी मधील एम.एस. पदवी संपादन केली (१९८६). अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठातील रोबोटिक्स इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पीएच.डी पदवी मिळवली (१९९१). यादरम्यान जपानच्या योकोहामा येथे हिताची कंपनीत अभ्यागत संशोधक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी कोलम्बिया विद्यापीठाच्या संगणकीय विज्ञान विभागात शिकवण्यास सुरुवात केली तेथेच त्यांची नियुक्ती संगणक विभागाच्या अध्यासनावर झाली (२००९).
संगणकीय कॅमेऱ्यांची संकल्पना नायर यांचीच असून, स्मार्ट फोनमधील कॅमेऱ्याच्या गुणवत्तेत त्यांनीच क्रांतीच घडवून आणली. संगणकीय छायचित्रण (field of computational photography) शाखेची रचना त्यांनी सुचविलेल्या वर्गीकरणावर आधारित आहे. सभोवतालच्या पूर्ण 360 अंशांचे चित्रिकरण करणारा, उच्च गतिकी पल्ला असणारा (HDR), त्रिमित प्रतिमांकन करणारा इ. विविध प्रगत कॅमेरे त्यांनी संशोधित केले आहेत. बाह्य उर्जा न वापरता कॅमेऱ्यावर पडणाऱ्या प्रकाशापासून ऊर्जा निर्मिती करून चलच्चित्रिकरण करणाऱ्या कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखविले आहे. नायर यांनी वंचित वर्गातील मुलांना प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण देण्यासाठी बिगशॉट कॅमेऱ्याची निर्मितीसुद्धा केली (२००९).
प्रकाशाची सभोवतालच्या जगाबरोबर होणारी प्रक्रिया समजून घेण्यावर नायर यांच्या संशोधनाचा भर आहे. प्रकाशाचे पृष्ठभागावरून होणारे परावर्तन, पुन:परावर्तन (Interreflection) वातावरणातील विकिरण यासाठींच्या त्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा वापर संगणकीय रेखांकन आणि इतर अनेक क्षेत्रात केला जातो. त्रिमित वस्तूंच्या आकारमापनासाठी त्यांनी संशोधित केलेल्या पद्धती वापरल्या जातात.
नायर यांच्या नावावर ८० एकस्वे आणि ३००पेक्षा जास्त शोधनिबंध आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल पुढील अनेक मानसन्मान प्रदान करण्यात आले आहे : डेव्हिड मार पारितोषिक (१९९०, १९९५), हेल्महोल्ट्झ पारितोषिक (२०१९), नॅशनल सायन्स फाउंडेशनचे नॅशनल यंग इंव्हेस्टिगेटर (१९९१), कोलम्बिया ग्रेट टिचर ॲवॉर्ड (२००६), ओकावा पारितोषिक (२०२२) इत्यादी. त्यांच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल नॅशनल ॲकॅडेमी ऑफ इंजिनीयरिंग (२००८), अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायंसेस (२०११) नॅशनल अॅकेडेमी ऑफ इन्व्हेंटर्स (२०१४) आणि इंडियन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ इंजिनिअरींग (२०२२) या संस्थेचे सदस्यत्व देण्यात आले आहे. उत्कृष्ट शोधनिबंधासाठी अनेक पारितोषिके त्यांना प्रदान करण्यात आली आहे.
सध्या ते कोलंबिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरींगमध्ये संगणकविज्ञानाचे टि.सी. चांग प्राध्यापक, कॉम्पुटर व्हिजन अँड ग्राफिक्स सेंटरचे सह-संचालक, कोलंबिया इमाजिंग अँड व्हिजन लॅबोरेटरीचे (CAVE; केव्ह) संचालक आणि स्नॅपचे (पूर्वीचे स्नॅपचॅट) संशोधक संचालक म्हणूनही काम पाहतात.
कळीचे शब्द : #संगणकीय प्रतिमाकरण #संगणकीय रेखांकन #कॅमेरे #alogrithem
संदर्भ :
- https://ece.ncsu.edu/2023/ece-alum-shree-nayar-awarded-okawa-prize-for-contributions-to-digital-photography/#:~:text=He%20is%20honored%20with%202022%20Okawa%20Prize.&text=Shree%20K.,computer%20vision%20and%20computational%20imaging.
- https://en.wikipedia.org/wiki/Shree_K._Nayar
समीक्षक : सुधीर पानसे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.