टॉमलिनसन, रेमंड सॅम्युएल (२३ एप्रिल १९४१—५ मार्च २०१६).

अमेरिकन संगणक आज्ञावलीकार (Computer Programmer). ते रे टॉमलिनसन (Ray Tomlinson) या नावानेही ओळखले जातात. त्यांना संदेशवहनात क्रांती घडवणाऱ्या ई-मेल प्रणालीचे जनक मानले जातात.

टॉमलिनसन यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यातील अॅम्‍स्टरडॅम या शहरात झाला. त्यांनी रेन्सिलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये (Rensselaer Polytechnic Institute) पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि त्यासोबत आय.बी.एम.च्या (I.B.M.) प्रशिक्षण कार्यक्रमात ते सहभागी झाले. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.एस. पदवी प्राप्त केली (१९६३). त्यानंतर मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी; Massachusetts Institute of Technology; MIT) येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरींग मध्ये एस.एम. पदवी मिळवली (१९६५).

टॉमलिनसन १९६७ मध्ये बोल्ट, बेरनेक आणि न्यूमन (आता रेथियॉन बीबीएन टेक्नॉलॉजी; BBN Technologies) या प्रसिद्ध संशोधन आणि विकास कंपनीमध्ये रुजू झाले. बीबीएनमध्ये त्यांनी अर्पानेट जालक नियंत्रण प्रोग्राम (ARPANET Network Control Program) आणि टेलिनेट (TELENET) प्रोटोकॉल कार्यान्वित करून टेनेक्स (TENEX) ही संगणक नियंत्रण कार्यपध्दत (ऑपरेटिंग सिस्टिम; Operating System) विकसित करण्यास मदत केली. १९७१ मध्ये त्यांनी एसएनडीएमएसजी (SNDMSG) आणि सीपीवायएनईटी (CPYNET) आज्ञावल्या (प्रोग्राम; Programme) एकत्र करून अर्पानेटच्या नेटवर्कवरील ई-मेल देव-घेवीसाठी पहिला आराखडा विकसित केला. त्यामुळे संगणक वापरकर्त्यांना इतर संगणकांवर संदेश पाठवण्याची सोय मिळाली. ई-मेल पत्त्यात, स्थानिक ई-मेल आणि जागतिक ई-मेल यांना विभक्त करण्यासाठी टॉमलिनसन यांनी कळफलकावरील ‘@’ या सहसा कमी प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या चिन्हाचा वापर केला. त्यांच्या या कामातून पुढे व्यक्तींच्या दरम्यान नेटवर्कद्वारे ई-मेल वहनाचा जन्म झाला आणि वापरकर्ता@यजमान (host) या प्रकारची पध्दत ई-मेल पत्त्यांसाठी मानक बनली. ती आजही रूढ आहे.

टॉमलिनसन यांच्या ई-मेल प्रोग्रॅमने संपूर्ण संप्रेषण (Communication) जगात क्रांती घडवून आणली. त्यामुळे व्यक्तीं-व्यक्तींमधील संवाद साधण्याचा एक नवा मार्ग अस्तित्वात आला आणि सर्व स्तरांवरील व्यवसाय पद्धतीत आमूलाग्र बदल घडून आला. ई-मेल हे सध्याजगातील लोकप्रिय संपर्क माध्यमांपैकी एक आहे. कोट्यावधी लोक वेळ आणि स्थान यांचे पारंपरिक अडथळे ई-मेलने पार करून एकमेकांशी तात्त्काळ संपर्क करतात.

टॉमलिनसन यांना त्यांच्या या योगदानासाठी बरेच पुरस्कार मिळाले. त्यात अमेरिकन संगणक संग्रहालयातर्फे ‘जॉर्ज आर. स्टीबझ्’ संगणक अग्रेसर (George R. Stibitz Computer Pioneer) पारितोषिक, इंटरनॅशनल अॅकेडमी ऑफ डिजिटल आर्ट्स अँड सायन्सेसकडून ‘वेब्बी’पुरस्कार (Webby Award; २००१), रेन्सिलर अॅलम्न्याय् हॉल ऑफ फेम (Internet Hall of Fame), इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स इंटरनेट अॅवॉर्ड (२००४), तांत्रिक व वैज्ञानिक संशोधनासाठी प्रिन्स ऑफ अस्टुरिअस पुरस्कार (Prince of Asturias Award Laureate; २००९). त्यांना एडवर्ड रेन कल्टूरपर्सिस सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (२०११), एमआयटीच्या पहिल्या १५० नवकल्पक आणि कल्पनांच्या यादीतील त्यांचा चौथा क्रमांक आहे.

संदर्भ :

समीक्षक – विवेक पाटकर

#ईमेल #अर्पानेट #टेलिनेट #नेटवर्कसंप्रेषण #@ #email #ARPANET # चिन्ह #TENEX # ऑपरेटिंगसिस्टिम #operatingsystem

प्रतिक्रिया व्यक्त करा