ॲनॅक्सॅगोरस : (इ.स.पू.सु. ५०० — इ.स.पू.सु. ४२८). प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ. त्याचा जन्म आशिया मायनरच्या क्लाझॉमेनी (आयोनिया) या ठिकाणी झाला. त्यामुळे ‘क्लाझॉमेनीचा ॲनॅक्सॅगोरस’ या नावानेही तो प्रसिद्ध आहे. तत्त्वज्ञान हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी त्याने गृहत्याग केला. कालांतराने त्याने देशही त्यागला व अथेन्स येथे स्थायिक झाला.

ॲनॅक्सॅगोरस याने मन किंवा बुद्धी (नाउस) याच्या माध्यमातून या जगाला एका नवीन तत्त्वाची ओळख करून दिली आहे; कारण त्याच्या पूर्वीच्या कोणत्याही तत्त्ववेत्त्याने आपल्या विवेचनामध्ये मन या तत्त्वाची चर्चा केली असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ग्रीक तत्त्वज्ञानात ‘मना’ला स्वतंत्र पदार्थाचे स्थान देणारा हा पहिला तत्त्वज्ञ होय. त्याच्यानंतर पुढे सॉक्रेटिस आणि प्लेटो यांनी त्याची री ओढली. ॲनॅक्सॅगोरसवर पार्मेनिडीझ आणि एम्पेडोक्लीझ यांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. तो आपल्या पूर्वीच्या या दोन्ही तत्त्ववेत्त्यांप्रमाणे ‘सत’चा स्वीकार करतो. तो ‘सत’ला नित्य, अविकारी आणि उत्पत्ती व विनाशरहित मानतो. मात्र असे असले, तरीही तो एम्पेडोक्लीझच्या चार महाभूतांच्या संबंधीचा विचार जसाच्या तसा स्वीकारत नाही; कारण त्याच्या दृष्टिकोनातून पृथ्वी, अग्नी, वायू आणि जल ही चार महाभूते मूलतत्त्वे नाहीत, तर मूळ तत्त्वाच्या संयोगाचा परिणाम आहे. तेव्हा या ठिकाणी प्रश्न उपिस्थत होतो की, ॲनॅक्सॅगोरस मूलतत्त्व कशाला मानत असेल? तर या प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला ‘बीज’ (Seeds) असे उत्तर मिळते. म्हणजेच ॲनॅक्सॅगोरसने बीजला मूलतत्त्व म्हणून स्वीकारले आहे.
ॲनॅक्सॅगोरसच्या दृष्टिकोनातून बीज हे मूलतत्त्व आहे. ते अनंत आहे. ते संपूर्ण विश्वात पसरलेले आहे. या बीजांमध्ये गती उत्पन्न होते. ते आपल्यासारख्या इतर बीजांकडे आकर्षित होतात. एकमेकांशी संयोग पावतात आणि त्यातूनच सृष्टीची निर्मिती होत जाते. परंतु या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे की, बीजांमध्ये जी गती असते, ती त्यांच्यात अंतर्भूत नसते. ती गती दुसऱ्या एका तत्त्वाकडून त्यात आलेली असते. ते दुसरे तत्त्व म्हणजे मन होय. याच मनाला परमविज्ञान अर्थात सर्वोच्च कल्पना असेही म्हटले जाते. मन हे जीवनाचे मूलस्रोत आहे. मनाची गती दिसत नाही, म्हणून ते अमूर्त म्हटले जाते. त्याचे अस्तित्व सदैव आहे, म्हणून त्याला त्रिकालदर्शी म्हटले जाते. ॲनॅक्सॅगोरसच्या मते ‘मन’ हेही बीजांचेच बनलेले असते. ते अमर्याद स्वयंनियंत्रक व शुद्ध असे आहे. मन कशातही मिसळलेले नसते आणि मनातही काही मिसळलेले नसते.
ॲनॅक्सॅगोरसने विश्वातील विविधता आणि परिवर्तने ह्यांचे स्पष्टीकरण परस्परांहून भिन्न अशा अनेक बीजांच्या आधारे देण्याचा प्रयत्न केला आहे. आरंभी एकमेकांत मिसळून गेलेल्या आणि त्यामुळे विश्वाला साम्यावस्था प्राप्त करून देणाऱ्या ह्या बीजांना मन हे एखाद्या चक्री वादळाप्रमाणे विलक्षण गती देते. त्यामुळे आधी एकमेकांत मिसळून गेलेली ही बीजे एकमेकांपासून विलग होतात आणि ह्याचा परिणाम म्हणून विविध प्रकारच्या वस्तू निर्माण होतात. प्रत्येक वस्तूत सर्व प्रकारची बीजे अंशरूपांनी असतात, मात्र हे अंश प्रत्येक वस्तूत सारख्याच प्रमाणात असतील, असे नव्हे. एखाद्या वस्तूत काही बीजांश प्राधान्याने वा विशेष प्रभावी स्वरूपात असतात व त्यामुळे त्या वस्तूचे स्वरूप ठरते.
मन हे बीजाचे बीज आहे. त्यात गती आहे. बीजाला लागणारी गती मनाकडूनच येते. किंबहुना मनाकडून गती घेऊन बीज विश्वोत्पत्तीचे कार्य करतात, म्हणून मनाला विश्वाचा अधिष्ठाता म्हटले आहे. पण याचा अर्थ हे मन ईश्वरासारखे आहे, असा होत नाही; कारण ईश्वर हे उपादानाची निर्मिती करून त्यानंतर विश्वाला आकार देतो. मन हे केवळ एखाद्या कुंभारासारखे निमित्त आहे. ते मातीसारख्या द्रव्याची अर्थात उपादानाची उत्पत्ती करीत नाही. मनाचे हे कार्य केवळ एका व्यवस्थापकासारखे आहे.
संदर्भ :
- Curd, P. Anaxagoras of Clazomenae : Fragments, Text and Translation with Notes and Essays, Toronto, 2007.
- Graham, D. W. The Texts of the Early Greek Philosophers : The Complete Fragments and Selected Testimonies of the Major Presocratics, Cambridge, 2010.
- Lanza, D. Anassagora : Testimonianze e Frammenti, Florence, 1966.
- Sider, D. The Fragments of Anaxagoras : Edited with an Introduction and Commentary, 2nd Ed., Berlin, 2005.
समीक्षक : आनंद गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.