एपिक्यूरस : (इ.स.पू. ३४१—इ.स.पू. २७०). एक ग्रीक तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म आशिया मायनरमधील सेमॉस येथे ॲथीनियन पालकांच्या पोटी झाला. एपिक्यूरियन या संप्रदायाचा तो आद्य प्रणेता होय. तो गार्गेटसचा रहिवासी असल्याने त्याला ‘गार्गेटसचा मुनी’ म्हणत. त्याचे वडील नीऑक्लीझ हे शिक्षक होते. त्याची आई चरेस्ट्राट (Chaerestrate) ही धार्मिक प्रवृत्तीची स्त्री होती. आजार, पीडा आणि इतर आपत्ती परतवून लावण्यासाठी ती जादूटोणा आणि देवतांना प्रसन्न करण्याचे विधी करीत असे. एका आख्यायिकेनुसार एपिक्यूरस लहान असताना तो त्याच्या आईला या विधीसाठी मंत्र वाचून दाखविण्याचे काम करीत असे. मात्र जन्मभर त्याने अंधश्रद्धा व दांभिकता यांचा मनापासून तिरस्कार केला. बालपणापासूनच एपिक्यूरस हा एक विचारी मुलगा म्हणून प्रसिद्ध होता.

त्याचे बालपण गरिबीत गेले. इ.स.पू. ३२३ मध्ये तो अथेन्सच्या लष्करात दाखल झाला. त्याचे तत्त्वज्ञान मूलत: डीमॉक्रटिसच्या परमाणुवादावर (Atomism) आधारित आहे. सुख इष्ट असून दुःख अनिष्ट आहे, हा त्याच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. त्याने सुसंस्कृत अशा सुखवादाचा पुरस्कार केला आणि तो लोकप्रियही ठरला. इ.स.पू. ३१० मध्ये त्याने अथेन्समध्ये स्वतंत्र विद्यालय सुरू केले. त्याचे विद्यालय म्हणजे एक उपवन होते आणि तेथील वातावरण अत्यंत प्रसन्न-मनोहर होते. अनेक विद्यार्थी आणि अनुयायी त्याच्या संप्रदायाची धुरा सांभाळण्यासाठी हिरिरीने पुढे येऊ लागले. त्याच्या अनुयायांच्या मनात त्याचे स्थान ‘दैवी आदराचे’ निर्माण झाले. त्याचे अनुयायी ‘उपवनाचे तत्त्वज्ञ’/‘लताकुंजामधील तत्त्वज्ञानी’ म्हणून ओळखले जात. त्याचे व्यक्तिमत्त्व प्रभावी व आकर्षक असल्याने लोक त्याचे सहज मित्र बनत. त्याच्या संप्रदायात स्त्रिया आणि गुलाम यांची संख्या जास्त होती. त्याने पुष्कळ वाचन आणि लेखन केले. त्याने निसर्गाविषयी ३७ प्रबंध लिहिले. ऑन नेचर हे त्याचे महत्त्वाचे पुस्तक होय. कॅनॉन नावाच्या पुस्तकात त्याने स्वतःची ज्ञानविषयक उपपत्ती मांडली आहे.

तत्त्वज्ञान : अभिनियमशास्त्र (Canonic) : तत्त्वज्ञानाचा वापर प्रत्यक्ष जगण्यासाठी व्हावा, असे त्याचे मत होते. “सुखी जीवनाची प्राप्ती करून घेण्यासाठी दैनंदिन जीवनात विचार आणि वाणी यांच्या मार्फत यशस्वीपणे मदत करणारे ते तत्त्वज्ञान”, अशी त्याने तत्त्वज्ञानाची व्याख्या केली. यासाठी त्याने पदार्थविज्ञानावर भर दिला. ज्ञानप्राप्तीचे यथार्थ प्रमाण म्हणून त्याने प्रत्यक्षप्रमाणाचा पुरस्कार केला. वेदनांवाचून ज्ञानप्राप्ती होणार नाही, असे त्याने प्रतिपादन केले. म्हणजेच वस्तूंच्या प्रतिमांचे ज्ञानेंद्रियांद्वारे घडणारे संवेदन सत्य असते. त्याचप्रमाणे काल्पनिक प्रातिनिधनाचा अंतर्भाव त्याने ज्ञानाच्या निकषांमध्ये केला आहे. याबरोबरच भाव हाही एक निकष आहे. एखाद्या गोष्टीची निवड ही त्याच्या सुखद किंवा दु:खद भावावर अवलंबून असते. अशाप्रकारे संवेदन, संकल्पना आणि भावविकार हे ज्ञानाचे तीन निकष एपिक्यूरसने मांडले आहेत.

ईश्वरासंबंधी मते : एपिक्यूरस जडवादी आणि निरीश्वरवादी होता. त्याने ईश्वराबद्दलच्या पारंपरिक मताला विरोध केला. ज्या अर्थी ईश्वरावर सार्वत्रिक विश्वास ठेवला जातो, त्या अर्थी त्याचे वास्तविक अस्तित्व तो मान्य करतो. मात्र ईश्वराच्या अस्तित्वामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक भीतीचा निषेध त्याने व्यक्त केला. त्याच्या मते एकदा का ईश्वराचे अस्तित्व नाकारले की, त्यायोगे निर्माण होणारी, त्याच्या कृपा किंवा रागामुळे निर्माण होणारी, आसक्ती आणि भीती साहजिकच नाहीशी होते.

सुखवाद : एपिक्यूरसच्या मते सुख हेच जीवनाचे अंतिम ध्येय होय. तो स्वकेंद्रित सुखवादाचा (Egoistic Hedonism) पुरस्कर्ता आहे. म्हणजेच मनुष्याने कायम शाश्वत सुखाचा पुरस्कार करावा, असे त्याने प्रतिपादन केले. त्याच्या मते सुख म्हणजे दुःखाचा उपशम होय. वैयक्तिक सुखाचे अनन्यसाधारण महत्त्व त्याने मान्य केले. सर्व प्रकारचे सुख चांगले आणि सर्व प्रकारच्या वेदना वाईट असतात असे जरी असले, तरीही सर्व सुखे स्वीकारार्ह नसतात आणि सर्वच दुःख नाकारण्याजोगी नसतात, असे तो मानतो. त्याने ‘गतीशील सुख’ आणि ‘स्थिर सुख’ असे सुखाचे दोन प्रकार मानले. एखादे सुख प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत असते, तेव्हा ते गतीशील स्वरूपाचे असते. मात्र जेव्हा त्या सुखाची पूर्तता होऊन मनुष्य समाधानी होतो, त्या वेळी ते स्थिर स्वरूपाचे सुख असते. त्याचप्रमाणे त्याने भौतिक व मानसिक सुख-दुःख मानली आहेत. वर्तमानाशी निगडित असणाऱ्या सुखास तो भौतिक सुख-दुःख मानतो आणि भूतकाळ व भविष्यकाळाशी निगडित असलेल्या सुख-दुःखाला तो मानसिक सुख-दुःख मानतो. त्याच्या मते भविष्याबद्दलची चिंता, ईश्वराचे भय आणि मृत्यूबाबतचे भय या गोष्टी सुखाचा नाश करणाऱ्या आहेत आणि यातही मृत्यूविषयी वाटणारी भीती सर्वांत जास्त चिंताजनक असते.

त्याच्या मते सद्गुणाला मूलत: महत्त्व नाही. त्याचे मूल्य त्याबरोबर मिळणाऱ्या सुखाने निश्चित केले जाते. सद्गुण हे साध्य नसून सुखप्राप्तीचे साधन आहे. सुख मिळविणे ही मनुष्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. सर्वश्रेष्ठ व व शाश्वत सुखाची अनुभूती म्हणजेच मनाची निर्विकार अवस्था यालाच एपिक्यूरस ‘ॲटॅरॅक्झिया’ म्हणतो. त्याच्या मते बौद्धिक सुख हे शारीरिक आणि इंद्रियजन्य सुखापेक्षा श्रेष्ठ आहे. हे. द. गोखले या विचारवंतांच्या मते “एपिक्यूरसचा सुखवाद हा केवळ वैयक्तिक स्वार्थाचा विचार करणारा नसून तो अभिजात स्वरूपाचा आहे. चार्वाकप्रमाणे एपिक्यूरस हा ऋण काढून सण साजरे करण्याची शिकवण देणारा आहे अशी जी टीका केली जाते, ती त्याच्यावर अन्याय करणारी आहे”. सुखवादाचे मूळ अराज्यवादात (Anarchism) असते. परंतु एपिक्यूरसने अराज्यवादाचा विरोध केला; कारण अराज्यवाद हा सामाजिक स्वास्थ्यास कायमच विघातक आहे.

मृत्यूविषयीचे विचार : एपिक्यूरसच्या मते मृत्यूविषयीच्या भीतीचे मूळ मृत्यूनंतर मिळणाऱ्या दुःखदायक अनुभवांच्या चिंतेत असते. मृत्यू ही वाईट गोष्ट नाही, असे प्रतिपादन करताना ती कोणासाठी वाईट नाही, हेही तो सांगतो. जर मृत्यू ही संकल्पना वाईट असेल, तर ती जीवंत व्यक्तींसाठी वाईट नाही; कारण ते जगात आहेत आणि मेलेल्या व्यक्तींसाठी वाईट नाही; कारण ते अस्तित्वातच नाहीत. म्हणूनच जर मृत्यूमुळे दुःख होणारच नसेल, तर भविष्यातील संभाव्य दुःखाच्या चिंतेमुळे वर्तमानात चिंताग्रस्त आणि दुःखी का व्हावे, असे त्याचे ठाम मत आहे.

परमाणुवाद : त्याने परमाणुवादाचा पुरस्कार केला. त्याच्या मते उत्पत्ती व विनाश म्हणजे केवळ अणूंचे एकत्रीकरण आणि विभक्तीकरण होय. त्याच्या या सिद्धांताला ‘विश्ववाद’ म्हणतात. कोणत्याही घटना दैवी किंवा आध्यात्मिक कारणांनी घडत नाही, तर नैसर्गिक कारणांनी घडतात. एपिक्यूरसचा अणुवाद भारतीय दर्शनातील वैशेषिकांच्या मताशी साधर्म्य साधणारा आहे.

एपिक्यूरियन तत्त्वज्ञानाचा दृष्टीकोन वास्तववादी आहे. व्यक्तिगत सुखाचे ध्येय त्याच्या नीतिशास्त्रात दिसून येते आणि त्याचमुळे त्याचे संपूर्ण तत्त्वज्ञान भौतिकताप्रधान आहे.

एपिक्यूरसचे विद्यालय सुमारे पाच शतके अस्तित्वात होते. त्याच्या संप्रदायाचे सदस्य एकमताने राहात. त्यांच्यात मतभेदाचा अभाव होता. त्यांचा गुरू एपिक्यूरस याविषयी त्यांना आधार होता. टिमोक्रेट्स आणि न्यूमेनियस यांव्यतिरिक्त इतर कोणी अनुयायी त्याच्या संप्रदायातून बाहेर पडले नाहीत. त्याची शिकवण प्रसिद्ध रोमन कवी लुक्रीशिअस याने आपल्या काव्यात मांडली आहे.

एपिक्यूरसच्या उत्तरकाळात त्याला संधिवात, जलोदर आणि मूत्राशयाचा विकार जडला. त्यातच त्याचे निधन झाले.

संदर्भ :

  • जोशी, ग. ना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, खंड पहिला, पुणे, १९७५.
  • दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर, २०१४.
  • वाडेकर, दे. द. संपा. मराठी तत्त्वज्ञान-महाकोश, खंड पहिला, पुणे, १९७४.
  • https://www.ancient.eu/Epicurus/
  • https://www.iep.utm.edu/epicur/
  • https://www.philosophybasics.com/philosophers_epicurus.html

                                                                                                                                                                     समीक्षक : हिमानी चौकर